Skip to main content
x

कल्ले, कृष्णा

 कृष्णा कल्ले यांचा जन्म मुंबईत झाला. परंतु, वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे वास्तव्य कानपूरमध्ये होते. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते आणि आत्या तारा कल्ले या एक प्रथितयश गायिका होत्या. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण दरभंगा घराण्याचे रामसेवक तिवारी आणि रामपूर घराण्याचे अफझल हुसैन निझामी यांच्याकडे झाले. नंतर सुगम संगीताचे शिक्षण त्यांनी कानपूरचे युनुस मलिक यांच्याकडे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तराच्या गायन स्पर्धांमध्ये पहिले स्थान पटकावले. कृष्णा कल्ले यांना १९५८ साली सैगल मेमोरिअलतर्फे होणार्‍या गायन स्पर्धेमध्ये  पहिले पारितोषिक व ‘गोल्डन व्हॉइस ऑॅफ इंडिया’ हा मानाचा किताब मिळाला.

कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून, लग्नानंतर त्या १९६४ साली मुंबईमध्ये आल्या. कानपूरमध्ये त्या आकाशवाणीवर ‘अ’ श्रेणीच्या कलाकार होत्या. मुंबईमध्ये आल्यावर परत परीक्षा द्यावी लागेल का? हे विचारण्यासाठी त्या आकाशवाणी केंद्रावर गेल्या. त्या वेळी संगीत विभागाचे मुख्य यशवंत देव होते. कृष्णा कल्ले यांचा आवाज आवडल्यामुळे यशवंत देव यांनी त्यांच्या आवाजात मराठी गाणे ध्वनिमुद्रित करायचे ठरवले. आपल्याला मराठी अजिबात येत नाही, आपण फक्त हिंदीमध्ये गाऊ शकतो, असे कृष्णा कल्ले यांनी नम्रपणे सांगितले. पण यशवंत देव यांनी त्यांच्याकडून मराठी गाणे गाऊन घेण्याची संपूर्ण जबाबदारी उचलली आणि त्यांच्याकडून ‘मन पिसाट माझे अडले रे’ हे पहिले मराठी गाणे आकाशवाणीसाठी गाऊन घेतले. 

एच.एम.व्ही.ने कृष्णा कल्ले यांच्या स्वरात या गीतासह आणखी तीन गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. ही सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यानंतर वंदना विटणकर यांचे ‘परीकथेतील राजकुमारा’ हे गीत संगीतकार अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून गाऊन घेतले. त्या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि अनिल मोहिले यांना संगीतकार म्हणून मान्यता मिळाली.

संगीतकार दत्ता डावजेकर यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून ‘पडछाया’ या चित्रपटासाठी ‘उठ शंकरा सोड समाधी’ हे शास्त्रीय बैठक असलेले गीत गाऊन घेतले. श्रीनिवास खळे यांनी ‘मैना राणी चतुर शहाणी’सारखी सुंदर गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली. अशा सर्व मातब्बर संगीतकारांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी गीते गाऊन घेतली. मराठी मातृभाषा नसतानाही अनेक मराठी गाणी गाणार्‍या गायिका म्हणून त्या यशस्वी झाल्या. हिंदीतील संगीतकारांनीही कृष्णा कल्ले यांच्याकडून अनेक हिंदी चित्रपटांसाठी गीते गाऊन घेतली. त्यांची १०-१२ वर्षांच्या काळात जवळपास ५०० गाणी ध्वनिमुद्रित झाली.

त्यांच्या पतीचे १९७९ मध्ये निधन झाले. त्याच सुमारास चित्रपट संगीत सृष्टीच्या राजकारणाच्या त्या बळी ठरल्या. वैयक्तिक आयुष्यात आलेले एकटेपण आणि संगीत क्षेत्रामध्ये आलेले दारुण अनुभव यांमुळे चित्रपटसृष्टीतून त्यांना निवृत्ती पत्करावी लागली. त्यांनी १९८५ साली संगीतकार मनोहर राय यांच्याशी विवाह केला. त्यांच्यासह सुगम संगीत, भजन आणि गझलचे अनेक कार्यक्रम केले. आकाशवाणीकरिता त्या शंभरहून अधिक रचना गायल्या. काही रचनांना त्यांनी स्वत:ही संगीत दिले.

त्यांना महाविद्यालयात असताना १९५६ ते १९६० च्या दरम्यान चित्रपट संगीताची कारकीर्द सुरू होण्याआधी डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते आकाशवाणीचे सुवर्णपदक, नभोवाणी मंत्री वसंत साठे यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी यांच्या हस्ते कानपूर येथील युवा महोत्सवात प्रथम पारितोषिक असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

‘‘अस्सल कोल्हापुरी उच्चार करून ग्रामीण लोकगीते, लावण्या, झगडे, नृत्यगीते आणि सवाल-जवाब असे सर्व गानप्रकार उत्तम प्रकारे हाताळणारी, तसेच गाण्याच्या अर्थाला धरून इतके इरसाल उच्चार करून गाण्यात ग्रामीण मराठी उच्चाराचा ठसका इतक्या सहजपणे आत्मसात करणारी आणि माझी सर्वाधिक गाणी गाणारी अमराठी गायिका म्हणजे कृष्णा कल्ले,’’ या शब्दांत गीतकार जगदीश खेबूडकर यांनी या गायिकेचे कौतुक केलेे.

त्यांना १९९० च्या सुमारास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यांची तब्येत खालावल्यामुळे १९९२ पासून त्यांनी कार्यक्रम बंद केले असून त्या पतींसह समाधानी आयुष्य व्यतीत करत होत्या.२०१४ साली त्यांनी महाराष्ट्र शासनाचा “जीवनगौरव” पुरस्कार प्राप्त झाला.  २०१५ साली त्यांचे निधन झाले.

        — वसुधा कुलकर्णी / आर्या जोशी

कल्ले, कृष्णा