Skip to main content
x

कोतवाल, सोहराब पेशतन

सोहराब पेशतन कोतवाल यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अगोदर नागपूरचे सेंट जोसेफ कॉन्वेंट आणि नंतर पाचगणीचे बिलिमोरिया हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. आणि नागपूर विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयातून एलएल.बी. या पदव्या संपादन केल्या.

त्यानंतर त्यांनी अगोदर नागपूरच्या न्याय आयुक्त न्यायालयात ज्युडिशिअल कमिशनर्स कोर्ट आणि १९३६मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाल्यावर त्या न्यायालयात, १९३२ ते १९५६ अशी चोवीस वर्षे वकिली केली. शिवाय ते फेडरल कोर्टात आणि १९५०मध्ये घटना अमलात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही खटले लढवीत असत.

१९५५मध्ये कोतवाल यांची नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

नोव्हेंबर १९५६मध्ये राज्यपुनर्रचना झाली; त्यानंतर कोतवाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  झाले. सुरुवातीस ते मुंबई  उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठावर होते. १९५८मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या पोलीस गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक-सदस्य आयोग म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या प्रकरणी त्यांनी सादर केलेला अहवाल महत्त्वाचा  मानला जातो.

जुलै १९६६मध्ये सरन्यायाधीश तांबे निवृत्त झाल्यावर न्या. कोतवाल  यांची मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांना सहा वर्षांची दीर्घ कारकिर्द मिळाली. २६सप्टेंबर १९७२ रोेजी ते निवृत्त झाले.

नोव्हेंबर १९६९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.पी.व्ही.चेरियन यांचे निधन झाले; त्यावेळी काही महिने न्या.कोतवाल यांनी कार्यवाहक राज्यपाल म्हणून काम पाहिले.

- शरच्चंद्र पानसे

कोतवाल, सोहराब पेशतन