Skip to main content
x

करंदीकर, विनायक रामचंद्र

विनायक करंदीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. मिरज येथील १९३५ मध्ये ते मॅट्रिक झाले. विलिंग्डन महाविद्यालयातून १९४७ साली मराठी हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९५० साली मराठी व संस्कृत या विषयांत पहिल्या वर्गात प्रथम क्रमांक व सर्व पारितोषिके मिळवून पुणे विद्यापीठाची एम. ए. ही पदवी त्यांनी संपादन केली. वामन पंडितांच्या ‘यथार्थदीपिका’ या ग्रंथाचा एक गीताभाष्य या दृष्टीने चिकित्सक अभ्यास करून १९५७ साली पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी त्यांनी मिळवली. विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे मराठीचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य या नात्याने सोसायटीचे सचिव म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा व निःपक्षपाती कार्यपद्धतीचा ठसा उमटविला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने सिद्ध व्हावयाच्या मराठी शब्दकोशाचे प्रमुख संपादक या पदावर ते चार वर्षे कार्यरत होते. १९८८ मध्ये पुणे विद्यापीठात स्थापन झालेल्या ज्ञानदेव अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. सुमारे साडेतीन वर्षे त्यांनी ते काम केले.

‘वामन पंडितांची यथार्थदीपिका’ (१९६३), ‘भगवद्गीतेचे तीन टीकाकार’ (१९७४), ‘ग्रंथवेध’ (१९७८), ‘रामकृष्ण संघः एक शतकाची वाटचाल’ (१९८९), ‘ज्ञानेश्वरी दर्शन’ (१९९२), ‘वेध ऋणानुबंधांचा’ (१९९३), ‘ज्ञानदेवांचा गीतासंवाद’ (१९९४), ‘ज्ञानदेव : विवेकानंद’ (१९९६), ‘तीन सरसंघचालक’ (१९९९), ‘विश्वमानव स्वामी विवेकानंद खण्ड एक ते तीन’ (२००१), ‘रामकृष्ण विवेकानंद आणि गुरुबंधू’ (२००२), ‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण’ (२००८), हे करंदीकर यांचे ग्रंथलेखन आहे. ‘समर्थ रामदास विवेकदर्शन’ हे रामदासांच्या निवडक साहित्याचे साहित्य अकादेमीसाठी त्यांनी संपादन केले. यांखेरीज आकाशवाणीवरुन ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदास यांच्या साहित्यातील निवडक वेचांचे विवरण करणारे भाष्य त्यांनी अन्यांच्या सहकार्याने सिद्ध केले. त्यामधून ‘एक तरी ओवी ज्ञानेशांची’ (हे. वि. इनामदार यांच्या सहकार्याने १९९२), ‘साक्षेप समर्थांचा’ (कल्याणी नामजोशी यांच्या सहकार्याने १९९४), ‘एका जनार्दनी’ (कल्याणी नामजोशी यांच्या सहकार्याने १९९७) अशी तीन पुस्तके तयार झाली. त्यांच्या ‘रामकृष्ण आणि विवेकानंद’, ‘रामकृष्ण संघ : एक शतकाची वाटचाल’ व ‘तीन सरसंघचालक’ या ग्रंथाची इंग्रजीत भाषांतरे अनुक्रमे म. द. हातकणंगलेकर (१९९१), पी. एस. सबनीस (२००३) यांनी केली आणि ‘समर्थ रामदास’ या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर झाले आहे. दे. द. वाडेकर संपादित ‘मराठी तत्त्वज्ञान कोश’, रा. श्री. जोग संपादित ‘मराठी वाङमयाचा इतिहास, खंड ३’ आणि ‘मराठी विश्वकोश’ या ग्रंथात करन्दीकरांनी मराठी वाङमय, तत्त्वज्ञान आणि भाष्यग्रंथ यांवर विस्तृत स्वरुपाचे लेख लिहिले आहेत. त्यांचे ‘विदेश संचार आणि मुक्त चिंतन’ (१९९८) हे प्रवासवर्ण इंग्लंड व अमेरिका या देशांत घडलेल्या प्रवासावर आधारित आहे. ‘कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद’ (२००३) हे करंदीकर यांचे साडेसहाशे पृष्ठांचे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची हकीकत विस्ताराने नोंदवते. ही नोंदकरंदीकरांचा स्वतःकडे व त्यांच्या आयुष्यात आलेल्या संबंधित इतरेजनांकडे पाहाण्याच्या दृष्टीकोण प्रतिबिंबीत करते.

गीताभाष्ये, संत साहित्य, रामकृष्ण - विवेकानंद आणि भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृती हे चार प्रमुख विषय करंदीकरांच्या उपर्युक्त लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. ‘वामन पंडितांची यथार्थदीपिका’ या ग्रंथात वामनांनी गीतेचा यथार्थ स्पष्ट करण्याच्या भूमिकेतून कर्म, ज्ञान,  योग आणि भक्ती या उपविषयांचे जे विवरण केले आहे त्याची साद्यन्त चर्चा करंदीकरांनी केली आहे. वामनांनी लावलेल्या गीतेच्या भक्तिपर अर्थाचे विश्लेषण व मूल्यमापन करंदीकर करतात. ‘गीतेचे तीन टीकाकार’ या ग्रंथात ज्ञानेश्वर, वामन पंडित व लोकमान्य टिळक या तिघांच्या गीताभाष्यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी सविस्तरपणे मांडला आहे. करंदीकरांनी केलेल्या ज्ञानेश्वरविषयक लेखनात ‘ज्ञानेश्वरी’ व ‘अमृतानुभव’ या दोन ग्रंथांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी मांडला आहे. ज्ञान, कर्म, भक्ती, योग, सगुण-निर्गुण, क्षराक्षर, उत्तम पुरुष या सर्वांची संगती ज्ञानेश्वरांनी कशा प्रकारे लावली आहे, सांख्य- योग- वेदान्त ही दर्शने आणि भगवद्गीता यांच्या संदर्भात ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान व त्यांचे वेगळेपण कशा प्रकारे समजावून घेता येते ते करंदीकरांनी सविस्तर स्पष्ट केले आहे. ‘ज्ञानेश्वरी’ हा विशाल सामाजिक पातळीवरून केलेला श्रोतृसंवाद, ‘चांगदेवपासष्टी’ हा व्यक्तिगत पातळीवरून साधलेला मित्रसंवाद, तर ‘अनुभवामृत’ हा ज्ञानदेवांचा आत्मसंवाद अशी करंदीकरांची या कृतींकडे पाहाण्याची दृष्टी आहे. जनकल्याणाच्या भावनेने सर्वसामान्यांनाही समजावे अशा स्वरुपात ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीत विशद केले आहे, ज्ञानेश्वरीच्या तुलनेने ‘अमृतानुभवा’ चे स्वरूप मात्र वेगळे आहे हे करंदीकरांनी आपल्या ग्रंथात सप्रमाण मांडले आहे. अमृतानुभवाचे आकलन वाचकांना यथामूल व्हावे, असा करंदीकरांचा प्रयत्न आहे.

या विश्वात ओतप्रोत भरून राहिलेले जे एकले एक स्वप्रकाश, स्वसंवेद्य असे वस्तुतत्त्व आहे, जेथे दुजेपणाची कोणतीच कल्पना टिकू शकत नाही, सत्, चित् वा आनंद ही लक्षणे जेथे पोचू शकत नाहीत, अज्ञान आणि ज्ञान या दोहोंच्या अतीत निखळ ज्ञानमात्र व केवळ असणेपणाने युक्त आहे अशा आत्मतत्त्वाचा ज्ञानदेवांना आलेला प्रत्यय ‘अमृतानुभवा’मधून ज्ञानेश्वरांनी सलगपणे उलगडून दाखविला आहे, असा ‘अमृतानुभवा’चा करंदीकरकृत अन्वयार्थ आहे. अन्य संतांपेक्षा रामदासांच्या साहित्याचे व कार्याचे वेगळेपण यथार्थपणे व्यक्त करणारे नॅशनल बुक ट्रस्टसाठी लिहिलेले ‘रामदासचरित्र‘, विवेकसंबद्ध विचारांना केंद्रवर्ती ठेवून रामदासांच्या निवडक वेच्यांचे केलेले संपादन व समर्थांच्या साक्षेपी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारी ‘आकाशभाषित’ ही करंदीकरांची निर्मिती त्यांच्या संत साहित्याच्या सूक्ष्म अभ्यासातून घडली आहे.

करंदीकरांचा ‘सांस्कृतिक संचित’ हा ग्रंथ महाराष्ट्राची धार्मिक परंपरा, मराठी संत मंडळाचे कार्य, मराठीतील तत्त्वविचार जोपासणारे वाङमय, मराठी समाजाचे एकंदर विचारविश्व आणि जीवनविषयक दृष्टीकोण, भारतीयांची नीतिकल्पना आणि जीवनादर्श यांचा सविस्तर व मर्मग्राही ऊहापोह करीत असतानाच पारंपरिक अध्यात्मविचार आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण यांची तौलनिक मीमांसा करणारा आहे. ‘रामकृष्ण आणि विवेकानंद’ हा त्यांचा ग्रंथ ख्यातनाम गुरुशिष्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा साधार परिचय करून देणारा आहे. विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र सिद्ध करण्यापूर्वी करंदीकरांनी विवेकानंदांसंबंधीचे सर्व महत्त्वाचे साहित्य अभ्यासले, विवेकानंद ज्या ज्या ठिकाणी गेले ती सर्व स्थाने पाहिली, आणि चरित्राला प्रामाण्य लाभेल याकडे लक्ष पुरविले. रामकृष्ण संघ व संस्थेसंबंधी लिहिलेल्या ग्रंथात करंदीकरांनी ‘रामकृष्ण मिशन’च्या स्थापनेपासून शंभर वर्षांत संपूर्ण जगभर मिशनने जे कार्य केले त्याचा इतिहास आणि त्या कार्याचे मर्म तपशीलवारपणे स्पष्ट केले आहे. करंदीकर प्रभावी वक्ते म्हणून सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. करंदीकरांचे अनेक महत्त्वाचे ग्रंथ हे त्यांनी संबंधित विषयावर दिलेल्या व्याख्यानातून निर्माण झाले आहेत. एक नामवंत वक्ता आणि व्यासंगी लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे.

समीक्षक या नात्याने ‘ग्रंथवेध’ आणि ‘ग्रंथशोध’ या दोन पुस्तकांत त्यांनी केलेली विस्तृत परीक्षणे आली आहेत. ही परीक्षणे त्यांच्या साहित्य विषयक आकलनाची, निर्भीड प्रतिपादनाची व समतोल मूल्यमापन शक्तीची द्योतक म्हणता येतील. यांपैकी काही परीक्षण लेखांतून न. र. फाटक, रा. चिं. ढेरे, म. वा. धोंड यांसारख्या नामवंत अभ्यासकांच्या विचारांचा परखड परामर्श त्यांनी घेतला आहे आणि तटस्थ अवलोकनातून हाती येणार्‍या निष्कर्षांची सुसंगत व समतोल मांडणी त्यांनी केली आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे करंदीकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचे कार्यक्षेत्र होय. अगदी तरूण वयापासून ते जवळपास पंचाहत्तरीपर्यंत करंदीकर संघाशी संबंधित होते. संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळेच ‘तीन सरसंघचालक’ हा डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या कार्याचे समालोचन करणारा त्यांचा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.करंदीकरांच्या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाची आठ पारितोषिके मिळाली आहेत परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे अखिल भारतीय दोन सन्मान त्यांना लाभले आहेत. त्यांपैकी एक ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ आणि दुसरा रामकृष्ण मिशनच्या वतीने दिला जाणारा ‘विवेकानंद पुरस्कार’ होय.

येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण या तीन विभूतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा परिचय परस्परांच्या प्रकाशात करून देणारा ‘खिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे व प्रासादिक लेखनशैलीचे नमुनेदार दर्शन घडविणारा म्हणता येईल. या ग्रंथानंतर वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी आपले लेखन थांबवले आहे. कोणतेही लेखन विस्ताराने करावे हा त्यांचा लेखन स्वभाव आहे त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या साहित्य निर्मितीची पृष्ठसंख्या साडेनऊ हजारांच्या आसपास पोचली आहे.   

- डॉ. विलास खोले

 

करंदीकर, विनायक रामचंद्र