Skip to main content
x

कर्वे, चिंतामण श्रीधर

विज्ञान विषयावर मौलिक लेखन करणार्‍या कर्वे यांनी भौतिकशास्त्रातील एम.एससी. व पीएच. डी. या पदव्या संपादन केल्या. शालेय शिक्षण मुंबईत, उच्च शिक्षण फर्गसन महाविद्यालय, पुणे येथे झाले. पुणे व मुंबई येथील महाविद्यालयांतून शास्त्रविषयाचे अध्यापन केले. प्राध्यापक म्हणून लौकिक मिळवला. विज्ञान विषयावर लेखन करण्याची त्या काळात फारशी रूढी नसताना त्यांनी विज्ञान-लेखनास सुरुवात केली. तो काळ मराठीत ललित लेखनासाठी अनुकूल काळ होता. मात्र लेखनासाठी त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले. महायुद्धोत्तर काळात कर्वे यांना विज्ञान विषयावर लेखन करण्याची प्रेरणा मिळाली, त्यामागची घटना अघटित होती. १९४५ मध्ये जपान येथे झालेल्या अणूबॉम्बच्या स्फोटामुळे जग हादरून गेले, भयभीत झाले. या विनाशक, अणुबॉम्बची माहिती सर्वसाधारण माणसाला व्हावी यासाठी कर्वे यांनी व्याख्याने दिली. लोकजागरणाचाच तो प्रयत्न होता. विज्ञान विषयावर व्याख्याने देता-देता ते लेखनही करू लागले. सुरुवातीचे त्यांचे लेख ‘किर्लोस्कर’, ‘हंस’, ‘नवल’ इत्यादी मासिकांतून येऊ लागले. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ इत्यादी वृत्तपत्रांनीही ते प्रसिद्ध केले. त्यांना उत्तम वाचक प्रतिसाद मिळाला. विज्ञान विषयक विविध माहिती मिळावी यासाठी सर्वसामान्य लोक आसुसलेले होते. कर्वे यांनी सुबोध भाषेत ती सांगितली व त्यास शब्दरूपही दिले. हे त्यांनी मराठी साहित्याला दिलेले मोठेच योगदान होते. अणुशक्तीचे सामर्थ्य, तिचे फायदे-तोटे, अंतराळ, अंतराळ प्रवास अशा अनेक विषयांवरची सुबोध माहितीपूर्ण आणि रंजक अशी कितीतरी पुस्तके त्यांनी लिहिली. उदाहरणार्थ ‘निळे आकाश’ (१९५७), ‘बालचंद्र’ (१९६०), ‘अणुशक्ती शाप की वरदान?’ (१९६०), ‘नवविज्ञानाच्या परिसरात’ भाग १ व २ (१९५९), ‘चला चंद्राकडे’ (१९६१), ‘अणूतून अनंताकडे’ (१९६२), ‘अग्निबाण’ (१९६९) इत्यादी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहून प्रसिद्ध केली. अनेक लेख लिहिले.

कर्वे यांनी इंग्रजीतील अनेक विज्ञान ग्रंथांचे मराठीत नेटके अनुवाद केले आहेत. उदाहरणार्थ ‘विज्ञानाचे विधाते’, भाग १ व २ (१९६३), ‘वैज्ञानिकांची चरित्रे’ (मूळ लेखक फिलिप फेन), ‘तारकांची नवलनगरी’ (१९६४-मूळ लेखक अ‍ॅन व्हाइट), ‘ज्वालामुखी आणि भूकंप’ (१९६५- मूळ लेखक फेडरिक), ‘जीवन विज्ञान आणि तत्त्वज्ञान’ (१९६५- मूळ लेखक अल्फ्रेड व्हाइटहेड), ‘विराट विश्वाची निर्मिती’ (१९६६-  मूळ लेखक जॉर्ज गॅमाव). या लेखनाकरिता राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेने त्यांना सन्माननीय विज्ञान लेखक म्हणून गौरविले (१९७१). मराठीत विज्ञान-लेखनाच्या प्रवाहात कर्वे यांचे योगदान संस्मरणीय आहे. विज्ञान कथेचा व विज्ञान विषयक माहितीचा प्रवाह घरोघरी नेण्याची महत्त्वाची कामगिरी कर्वे यांनी बजावली. आज विज्ञान साहित्य अधिकाधिक लोकप्रिय होत आहे आणि मानवी जीवनातील विज्ञानाचे स्थान लोकांना समजू लागले आहे. या दृष्टीने कर्वे यांनी प्रारंभीच्या काळात केलेले काम मौलिक आहे, असे म्हणता येईल.

- संपादक मंडळ

कर्वे, चिंतामण श्रीधर