Skip to main content
x

कुलकर्णी, अरविंद गणेश

आबासाहेब कुलकर्णी

     अरविंद गणेश कुलकर्णी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी इचलकरंजी येथे शालेय शिक्षण झाल्यावर सांगली तसेच पुणे शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयातून 1938 मध्ये रसायनशास्त्रातील बी. एस्सी. ची पदवी संपादन करून त्यांनी यंत्रमाग उद्योगामध्ये प्रवेश केला. या उद्योगात वावरत असतानाच त्यांना त्या व्यवसायाच्या निमित्ताने व्यावसायिक संघटनाबांधणी व सहकारी क्षेत्रातील जाणिवा आत्मसात करता आल्या.

     योग्य व्यवस्थापन व उत्तम आर्थिक शिस्त पाळली तर सहकारी क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त होऊ शकते, या विचारावर ठाम राहून कुलकर्णी यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यांनी इचलकरंजी येथे डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल ही देशातील पहिली सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी उभारून ती उत्तम रीतीने चालवून दाखविली. त्यांनी सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत वसंतदादा पाटील यांच्या बरोबरीने योगदान दिले. ते या कारखान्याचे संस्थापक संचालक होते. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स लि. ह्या देशातील स्पिनिंग मिल्सच्या सर्वोच्च संघटनेचे ते संस्थापक व अध्यक्ष होते. त्यांनी 16 वर्षे अध्यक्षपदावर राहून त्या पदाला योग्य न्याय दिला. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचेही ते 16 वर्षे चिटणीस होते. ते ‘इफको’चेही संचालक होते. त्यांचा भुईमूग उत्पादक सहकारी संस्थेशी चांगला संबंध होता.

      संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीडनमध्ये भरविलेल्या पर्यावरण परिषदेमध्ये व जपानमध्ये भरविल्या गेलेल्या जगभरातील सहकारी संस्थांच्या प्रमुख नेत्यांच्या महासभेमध्ये कुलकर्णी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघाने 1979 मध्ये भरविलेल्या महापरिषदेमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. ऐंशीच्या दशकात देशामध्ये कृषी आणि उद्योगधंद्यातील आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्या संदर्भात खत व कागद कारखान्यांबाबतच्या सहकार्याची चर्चा करण्यासाठी कुलकर्णी यांनी अमेरिका, युरोप, जपान त्याचप्रमाणे चीन, जपान, कोरिया आदी अतिपूर्वेकडील देशांचे अभ्यासदौरे केले.

     सहकार क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करीत असतानाच कुलकर्णी यांनी 1967 मध्ये काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेमध्ये प्रवेश केला. त्यांनी राज्यसभेमध्ये 1978 ते 1982 ह्या काळात संयुक्त उपाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून 25 वर्षे काम केले. राज्यसभेला सामोरे जाताना संसदीय कामकाजाचे वाचन व गृहपाठ करणे महत्त्वाचे असते. विषयाच्या पूर्वतयारीशिवाय लोकप्रतिनिधी ह्या बिरुदाला न्याय देता येऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी सभागृहात बेधडकपणे व अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची कला आत्मसात केली. त्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रात आदरयुक्त दबदबा होता. खंदा संसदपटू अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे तसेच व्यासंगामुळे राजकीय, सहकार तसेच कृषी क्षेत्राच्या उत्पन्नाच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याची दृष्टी कार्यकर्त्यांना दिली. काँग्रेस पक्षातर्फे लोकप्रतिनिधित्व करतानाच, त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस चळवळीला वैचारिक भूमिका दिली.

     या देशातील सामान्य उद्योजकालादेखील त्याच्या मेहनतीनुसार योग्य दर्जा व न्याय मिळाला पाहिजे हा कुलकर्णी यांचा नेहमी आग्रह असे. म्हणूनच त्यांचे लक्ष नेहमी छोट्या उद्योजक कारखानदारांकडे असायचे. आबासाहेब कुलकर्णी यांच्या रूपाने इचलकरंजी व परिसरातील छोट्या हातमाग, यंत्रमाग सूतगिरणी कारखानदारांना आधारवडच सापडला. त्यामुळेच छोट्या कारखानदारांचे मित्र तसेच इचलकरंजीचे सहकारमहर्षी म्हणून ते ओळखले जात. आबासाहेब कुलकर्णी यांनी सहकारी बँकांच्या पतपुरवठ्याला आर्थिक शिस्त लावण्याचे काम केले. छोट्या कारखानदारांवर त्यांचा जास्त विश्वास होता. सामान्य जनता, कारखानदार यांच्या प्रश्नांबद्दलची त्यांना सखोल जाण होती. सर्वसामान्यांच्या जीवनात जिव्हाळ्याचे स्थान मिळविलेल्या या लोकनेत्याचे वयाच्या 75 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.

- संदीप राऊत

कुलकर्णी, अरविंद गणेश