कुलकर्णी, भालचंद्र अ.
भालचंद्र अ. कुलकर्णी यांचा जन्म उस्मानाबाद येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथे झाले. त्यांनी १९५८मध्ये हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून पशुवैद्यकीय पदवी आणि मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९६२मध्ये शरीरक्रियाशास्त्र व जैवरसायनशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६२मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनकार्य सुरू केेले. त्यांनी १९७२मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. डॉ भालचंद्र कुलकर्णी यांचे संशोधन प्रामुख्याने गाय व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या उपजत आणि आनुवंशिक प्रतिकारशक्तीबाबत आणि अशी शक्ती निर्माण करणार्या रक्तातील घटकांसंबंधी आहे. त्यांनी वळू आणि रेड्यांच्या वीर्याच्या प्रद्रव्यातील प्रथिने वेगळी केली आणि त्यांची वैशिष्ट्ये निश्चित व प्रमाणित केली. त्यांनी स्थानिक (देशी), संकरित आणि विदेशी वळूंच्या तसेच रेड्यांच्या वीर्य प्रद्रव्यातील प्रथिनांबाबतही संशोधन केले. अशा प्रकारचे संशोधन करणार्या मोजक्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ.कुलकर्णी यांचा समावेश होतो. भारतीय पशुप्रजनन अभ्यासक संघटनेने १९७७मध्ये गुरांच्या प्रजननासंबंधी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी डॉ.कुलकर्णी यांना संघटनेचे सदस्यत्व दिले. पशू शरीरक्रियाशास्त्रातील उल्लेखनीय संशोधनासाठी २००२मध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रबोधिनीने डॉ. भालचंद्र कुलकर्णी यांना पारितोषिक प्रदान केले.
गुवाहाटी येथे २००६-२००७मध्ये आयोजित केलेल्या सार्क देशांतील शास्त्रज्ञांच्या मेळाव्यात डॉ.कुलकर्णी यांना जी.एन.निर्मले पारितोषिक देऊन गौरवले होते. भा.कृ.अ.सं.च्यावतीने त्यांच्या ‘गुरांचे रक्तजल आणि वीर्य प्रद्रव्यातील प्रथिने’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील शास्त्रज्ञांच्या विविध संघटनांचे डॉ.कुलकर्णी हे सदस्य आहेत. सध्या ते थायलंड येथील आंतरराष्ट्रीय नियतकालिक गटाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
- संपादित