Skip to main content
x

कुलकर्णी, चंद्रकांत किसन

चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांवर आपला ठसा उमटविणारे दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी यांचे नाव घेतले जाते. चंद्रकांत कुलकर्णी यांचा जन्म मराठवाडा जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील हमदापूर (पाथरी) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उषा. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले. औरंगाबाद येथून आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुरुवातीच्या काळात प्रायोगिक रंगभूमीवर काम केले. तेथून मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी काही काळ पत्रकारिता केली. त्यानंतर मराठी रंगभूमीवर पदार्पण केले आणि मग तेथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘ध्यानीमनी’, ‘रंग उमलत्या मनाचे’ यांसारख्या नाटकांमुळे ते प्रकाशझोतामध्ये आले. रंगभूमी गाजवल्यानंतर कुलकर्णी यांनी ‘बिनधास्त’ हा आपला पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले होते. ‘बिनधास्त’च्या यशानंतर कुलकर्णी यांनी दूरदर्शन या माध्यमासाठीही बरेच काम केले.

‘पिंपळपान’, ‘टिकल ते पोलिटिकल’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या. दरम्यानच्या काळात कुलकर्णी यांनी विख्यात अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ‘बनगरवाडी’ या चित्रपटामध्ये नायकाची व्यक्तिरेखाही साकारली होती. ‘काय द्याचं बोला’ या चित्रपटाद्वारे कुलकर्णी यांनी विनोदी विषयांमधील आपले कसब पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवून दिले. या चित्रपटामुळे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची कारकिर्द आकारास आली. ‘भेट’ आणि ‘कदाचित’ यांसारखे वेगळे विषयही त्यांनी हाताळले. ‘मीराबाई नॉट आऊट’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाखेरीज त्यांनी ‘कॅरी ऑन पांडू’ हा चित्रपटदेखील दिग्दर्शित केला. २०१२ मध्ये कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुकाराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत तुकाराम’नंतर कुलकर्णी यांनी तुकारामांच्या आयुष्यावर पुन्हा एकदा चित्रपट काढण्याचे धाडस दाखवले, हे विशेष उल्लेखनीय आहे. तर २०१६ मध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आधारित ‘दुसरी गोष्ट’ या नावाने चित्रपट काढला. चरित्रात्मक कल्पित पातळीवर असलेला हा चित्रपट समीक्षकांनी नावाजला होता.

काही जुनी नाटके पुनुरुज्जीवीत करत नव्याने रंगभूमीवर आणण्याचे धाडस चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. त्यातले एक नाटक म्हणजे ‘हमीदा बाईची कोठी’ आणि त्रिनाट्य धारा महेश एलकुंचवार लिखित नाटक वाडा 'चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' या नाटकांचे सलग ९ तास प्रयोग त्यांनी केला. हा प्रयोग ३ डिसेंबर,२०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात जेव्हा झाला तेव्हा पिंपरी चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कार केला होता.

 - मंदार जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].