Skip to main content
x

कुलकर्णी, पुरुषोत्तम एकनाथ

           पुरुषोत्तम एकनाथ कुलकर्णी यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवली आणि शल्यचिकित्साशास्त्र व क्ष-किरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कुलकर्णी यांची १९६४मध्ये  शल्यचिकित्सा विभागात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांना १९६५मध्ये केंद्र शासनाच्या युवक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत डेन्मार्कमधील प्रशिक्षणासाठी जागतिक अन्न व कृषी संघटनेकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९६९मध्ये त्यांना पीएच.डी. पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी डेन्मार्क येथील रॉयल पशुवैद्यकीय व कृषी विद्यापीठातून कासेवरील शस्त्रक्रिया या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.च्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान पदव्युत्तर संस्थेमध्ये डॉ.पुरुषोत्तम कुलकर्णी यांची शल्यचिकित्साशास्त्र व क्ष-किरणशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवड झाली. उत्कृष्ट प्राध्यापक व मार्गदर्शक म्हणून त्यांना लौकिक मिळाला.

            जनावरांच्या वाढीबाबत शस्त्रक्रिया हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डॉ.कुलकर्णी यांनी शस्त्रक्रियेच्या अनेक सोप्या व सहज करता येण्याजोग्या पद्धती पशुवैद्यांसाठी प्रसारित केल्या. कास व आचळांवरील शस्त्रक्रियेमुळे दूध काढण्याच्या अनेक समस्या दूर करता येतात, हे त्यांचे संशोधन अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे. ते या विद्यापीठातून सहयोगी अधिष्ठाता या पदावरून निवृत्त झाले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा यामुळे विद्यापीठाने सेवानिवृत्तीनंतरही त्यांची प्राध्यापक म्हणून पुन्हा नेमणूक केली. महाविद्यालयाबद्दल आणि व्यवसायाबद्दल असणार्‍या प्रेम व आपुलकीपोटी त्यांनी ही नेमणूक पत्करली आणि प्रतिमाहे फक्त रु. १/- या नाममात्र वेतनावर काम केले. पशुवैद्यकीय शिक्षण संशोधन आणि सेवा क्षेत्रात काम करणार्‍या शल्यक्रियाशास्त्रज्ञांची व्यावसायिक संघटना असावी, या संकल्पनेतून त्यांनी देशात प्रथम इंडियन सोसायटी फॉर व्हेटरनरी सर्जरी ही संघटना स्थापन केली. कुलकर्णी यांच्या निष्ठापूर्वक कार्याची आणि उत्कृष्ट योगदानाची दूरवर नोंद घेतली गेली आहे.

- संपादित

कुलकर्णी, पुरुषोत्तम एकनाथ