Skip to main content
x

कुलकर्णी, सुकन्या एकनाथ

भिनयक्षेत्राची कोणतीही भक्कम पार्श्‍वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म झाला. जन्मापासूनच वास्तव्य असणाऱ्या दादर येथील अमृतकुंभ सोसायटीतील दीपोत्सवामध्ये त्या बालपणापासून नृत्ये सादर करत होत्या, तसेच अभिनयही करत  होत्या. याच कार्यक्रमांमधून त्यांना स्टेजवर वावरण्याचा आत्मविश्‍वास व सभाधीटपणा मिळाला. दादर येथील बालमोहन शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतले, तर पुढे त्यांनी रुपारेल महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. शालेय शिक्षणाबरोबरच नृत्याचेही शिक्षण घ्यावे, या आकांक्षेने त्यांनी सुचेता भिडे-चापेकर आणि स्मिता साठे-महाजन यांच्याकडे १२ वर्षे भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरी करावी किंवा शाळेत शिक्षिका म्हणून काम करावे, असे मनोमन वाटत असताना या दोन्हीपेक्षा वेगळा मार्ग त्यांची वाट पाहत होता. सुकन्या कुलकर्णी यांनी आपल्या मैत्रिणीसोबत सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार संस्थेमार्फत गुरू पार्वतीकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेमध्ये भाग घेतला आणि त्यांच्यावर कलेच्या वातावरणाची मोहिनी पडली आणि आपल्या घरातल्यांच्या प्रोत्साहनामुळे त्या या क्षेत्रात आत्मविश्‍वासाने वावरू लागल्या, पण याचे बाळकडू त्यांना शालेय जीवनातच विद्याताई पटवर्धन यांच्याकडून मिळाले होते. सुकन्या यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेशही अचानक झाला. सुलभा देशपांडे यांनी त्यांना ‘ईश्‍वर’ या हिंदी चित्रपटात एक भूमिका दिली. अनिल कपूर व विजयाशांती अभिनित या चित्रपटात सुकन्या कुलकर्णी यांनी ‘छुटकी’ची भूमिका रंगवली. यानंतर मात्र अभिनयक्षेत्रातील त्यांची वाट निश्‍चित झाली.

सुकन्या कुलकर्णी यांना वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ या नाटकात संधी मिळाली. सयाजी शिंदे या सहकलाकराबरोबरची या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. ‘झुलवा’मधील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक, तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेची दोन पारितोषिके व नाट्यदर्पणचेही पारितोषिक मिळाले होते. यानंतर त्यांना ‘गावाकडल्या गोष्टी’, ‘महानगर’, ‘कश्मकश’ या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान ‘जन्मगाठ’ नावाचे नाटक चालू असताना त्यांना अपघात झाला. या अपघातात त्यांची वाचा गेली व चार दिवसांचे अंधपणही आले. पण त्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या नसल्या तरी त्यांना नृत्य बंद करावे लागले. या आजारपणातून उठल्यानंतर त्यांनी पुन्हा नृत्याला सुरुवात केली. पण दुर्दैवाने १० जून १९९३ त्यांचा पुन्हा एकदा अपघात झाला. त्या वेळेस त्यांची वाचा गेली, सतत सहा महिने त्यांना बोलता आले नाही. तसेच उजवी बाजू पॅरालाइज्ड झाल्यामुळे त्यांना अनेक आजारपणांनी ग्रासले, पण त्यातूनही खचून न जाता त्यांनी धीराने व संयमाने एक वर्षाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर महेश भट यांच्या ‘जमीन आसमान’, ‘शांती’ या मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली.

‘झुलवा’ नाटकातील त्यांचा अभिनय पाहून बाबा पाठक यांनी ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटात त्यांना नायिकेची भूमिका दिली आणि नाटक आणि चित्रपट असा त्यांचा दुहेरी प्रवास सुरू झाला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर व फिल्मग्रोव्हर असे दोन पुरस्कार मिळाले. अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकरांनी ‘एकापेक्षा एक’ या हलक्याफुलक्या धाटणीच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका म्हणून त्यांना भूमिका दिली. अशोक सराफ, मधुकर तोरडमल, निशिगंधा वाड अशा अनुभवी कलाकारांबरोबर केलेला हा चित्रपट त्यांच्यासाठी एक चांगला अनुभव ठरला. त्यानंतर ‘चंबूगबाळे’, ‘ताईच्या बांगड्या’, ‘सौभाग्यकंकण’, ‘पुत्रवती’, ‘आई, थोर तुझे उपकार’, ‘वेन्टिलेटर’, ‘ती सध्या काय करते?’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, अशा चित्रपटातून विविधांगी भूमिका केल्या. ‘सरकारनामा’ या राजकीय पार्श्‍वभूमीवर आधारित चित्रपटामुळे यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, आशुतोष गोवारीकर, अजिंक्य देव, अश्‍विनी भावे, प्रतीक्षा लोणकर अशा अभिनयकुशल कलाकारांच्या यादीमध्ये सुकन्या कुलकर्णी हे नावही लक्षणीय ठरले. राजकारणाचा बळी पडलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याची भावी पत्नी म्हणून सुकन्या कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले. यासाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.

सुकन्या कुलकर्णी यांना ‘पुत्रवती’ आणि ‘घे भरारी’ या चित्रपटातील भूमिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘पुत्रवती’साठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन अ‍ॅवार्ड मिळाले. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केली. ‘जिगर’, ‘सरफरोश’, ‘परवाने’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील भूमिकांबरोबरच त्यांची ‘पतित पावनी’ या कानडी चित्रपटातील भूमिका नावाजली गेली. त्यातील उत्कृष्ट भूमिकेसाठी त्यांना कर्नाटक सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

चित्रपटात भूमिका करताना नाट्यक्षेत्रातही त्यांचा वावर स्वाभाविक होता. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकातील अद्वितीय अभिनयासाठी सुकन्या कुलकर्णी यांना अखिल भारतीय नाट्यपरिषद, नाट्यदर्पण, नाट्यनिर्माता संघ, नाट्यगौरव, कालनिर्णय अशी बक्षिसे मिळाली. विजया मेहता दिग्दर्शित ‘नागमंडल’ या हिंदी आणि ‘ती फुलराणी’ या पु.ल. देशपांडेलिखित नाटकांचे काही प्रयोग सुकन्या यांनी केले. ‘लेकुरे उदंड झाली’, ‘कुसुम मनोहर लेले’ ही त्यांची नाटकेही सर्वार्थाने गाजली. संजय मोने यांच्याबरोबर १९९८ साली त्यांचा विवाह झाला. नाटक-चित्रपटातील भूमिकांबरोबरच दूरदर्शनवरील ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘कथास्तु’, ‘मन वढाय वढाय’, ‘बंदिनी’, ‘आई’, ‘आभाळमाया’, ‘अग्निशिखा’ व ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमधील अभिनयामुळे सुकन्या लक्षवेधी ठरल्या.

मुलीच्या जन्मानंतर नाटक, चित्रपट आणि मालिका यांपासून त्या अल्पकाळ दूर राहिल्या, पण पुन्हा नव्या उत्साहाने सुकन्या कुलकर्णी यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. जवळपास १३ वर्षांनी ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला. लोकमत या वर्तमानपत्रात त्यांनी ‘शब्दांगण’ नावाचे सदर वर्षभर चालवले होते.

- नेहा वैशंपायन

कुलकर्णी, सुकन्या एकनाथ