खंबाटा, एफ. एस.
एफ.एस. खंबाटा हे कृषी पदवीधर होते. नंतर त्यांनी पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांची मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुसंवर्धन विभागात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी पशुव्यवस्थापन, पशुस्वास्थ्य, गुरांसाठी गोठ्यांची बांधकामे, दुग्धोत्पादन, पशूंमधील अनुवंशिक सुधारणा इ. विषयांत अध्यापनाचे कार्य केले. त्यांची १९६५मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
डॉ. खंबाटा यांच्या कार्यकाळात शरीरक्रियाशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना प्रक्षेत्रावर प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देण्यास सुरुवात करण्यात आली.
डॉ. खंबाटा हे कृषी व पशुवैद्यक अशा दोन्ही शाखांचे पदवीधर होते. त्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयाची प्रगती कृषी विद्यापीठांतर्गत चांगल्या रीतीने होईल, अशी त्यांची विचारधारा होती. म्हणून त्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. योग्य वेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. शासनाने राहुरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन केले आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले.
- संपादित