Skip to main content
x

खोत, गौतम शशिकुमार

   ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी करणाऱ्या वीरांमध्ये लेफ्टनंट कर्नल गौतम शशिकुमार खोत यांचे नाव अग्रणी आहे. गौतम खोत यांचा जन्म पुणे येथे झाला. मुंबईच्या ‘आयईएस’ इंग्लिश मिडीयम शाळेत शालेय, तर रामनारायण रुइया महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत खोत यांनी शिक्षण घेतले.
    दि. ११ जून १९८८ रोजी ते हवाई दलात दाखल झाले. दि. ५ जुलै १९९९ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचा दिवस ठरला. या दिवशी ‘ऑपरेशन विजय’मध्ये ते सहभागी झाले. या मोहिमेत त्यांनी सुमारे ७० तास हेलिकॉप्टर चालवत आपल्या सहकाऱ्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची कामगिरी बजावली. त्या वेळी खराब हवामान आणि अति उंचीचीही त्यांनी तमा बाळगली नाही. शत्रूकडून जोरदार बॉम्बफेक होत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांना शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पोहोचविण्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. लढणाऱ्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम त्यांनी केले.
       दि. १९ जून १९९९ रोजी ‘तोलोलिंग टॉप’ येथील सैनिकांना आवश्यक ती साधनसामग्री पोहोचविण्याचे कठीण काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. शत्रूकडून जोरदार बॉम्बफेक होत होती.  आसपासच्या भागात थेट गोळीबाराचा आवाज येत होता.  या स्थितीत त्यांनी १४ हजार ५०० फुट उंचीवर हेलिकॉप्टर चालवत आणि केवळ २२ मीटरच्या हेलिपॅडवर सुरक्षितपणे हेलिकॉप्टर उतरविण्याची कामगिरी बजावली.
      बकारवाल येथे सामग्री पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मश्कोव्ह येथून चार जवानांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. मश्कोव्ह खोऱ्यात मोहीम पुढे नेण्यासाठी दि. ९ जुलै रोजी त्यांनी शत्रूच्या गोळीबाराचा मारा चुकवत हेलिकॉप्टरमधून दारुगोळा सैनिकांपर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली. हि धोकादायक मोहीन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपली सर्व कौशल्ये यशस्विरीत्या वापरली आणि दोन सैनिकांचे प्राण वाचवले. आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत दि. २६ जानेवारी २००० या दिवशी त्यांना ‘वीरचक्र’ देऊन गौरविण्यात आले.

-संपादित

खोत, गौतम शशिकुमार