Skip to main content
x

माने, सुरेश

हाराष्ट्रात किराणा घराण्याची गायकी रुजवणारे उ.अब्दुल करीम खाँ हे सुरेश माने यांचे पिता व गुरू होते. अब्दुल करीम खाँसाहेब बडोदा दरबारात काही काळ दरबारी गायक म्हणून चाकरी करीत असताना तेथील दरबार गायिका हिराबाई व सरदार माने यांच्या कन्या ताराबाई माने यांनी खाँसाहेबांचे शिष्यत्व पत्करले. हिराबाई माने यांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी खाँसाहेबांसोबत १८९८ साली विवाह केला व बडोदा सोडून ते दोघे मिरजेस येऊन स्थायिक झाले. तिथे सुरेश मानेंचा जन्म झाला. त्यानंतर हिराबाई बडोदेकर (१९०५), कमलाबाई (१९०७), कृष्णराव (१९१०) आणि सरस्वतीबाई राणे (१९१६) अशा एकूण पाच अपत्यांना ताराबाईंनी जन्म दिला.

सुरेश मानेंना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच किराणा गायकीचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. मानेंचा आवाज खाँसाहेबांसारखाच अतिशय गोड, पातळ आणि नाजूक होता. त्यांची  बुद्धी अतिशय तल्लख आणि संग्रहक असल्यामुळे  खाँसाहेबांची संपूर्ण गायकी त्यांनी आत्मसात केली. माने गायला बसले, की प्रत्येक स्वराबरोबर खाँसाहेबांची हटकून आठवण यावी, इतकी खाँसाहेबांची गायकी त्यांच्या नसानसांत भिनली होती. आठ/दहा वर्षे त्यांना प्रत्यक्ष गुरुमुखातून तालीम मिळाली. खाँसाहेब स्वतः बीन, दिलरुबा, जलतरंग, तबला, पेटी, सारंगी ही वाद्ये वाजविण्यात निपुण होते. त्यांनी मानेंनाही सर्व वाद्ये वाजवायला शिकविले.

खाँसाहेबांच्या जलशातून माने तबलातरंग वाजवीत असत. त्यांची लहानवयातील स्वरांची सुंदर कशिदेकारी ऐकून लोक आश्चर्यचकित होत असत. वयाच्या सोळा वर्षांपर्यंत त्यांना खाँसाहेबांची भरपूर तालीम मिळाली. त्यांच्या जलशांतून कधी पेटीची, कधी तबल्याची, तर कधी गायनाची साथ केल्यामुळे मानेंचे गाणे सर्वार्थानेच समृद्ध झाले.

ताराबाई माने या स्वतः एक उत्तम गायिका होत्या. विवाहानंतर त्यांना स्वत:ची कला वाढविण्यास आणि हिराबाईंना गाणे शिकण्यास खाँसाहेबांकडून विरोध झाल्यामुळे त्या दोघांचे पटेनासे झाले आणि खाँसाहेब म्हैसूरच्या दौर्‍यावर गेले असता, आपल्या पाचही मुलांना घेऊन त्या मुंबई येथे आल्या व तिथे त्यांनी बिर्‍हाड केले. हिराबाईंनी आपल्या आजीचे माहेरचे नाव बडोदेकर लावले, तर सुरेशबाबूंनी आजीचे माने आडनाव लावण्यास सुरुवात केली. या वेळी सुरेश १६ वर्षांचे होते.

मुंबईत आल्यावर सुरेशबाबूंनी हिराबाईंना गाणे शिकविण्यास सुरुवात केली आणि बहीण-भावंडे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपली प्रगती करीत होते. मुंबईत काही काळ वहीद खाँसाहेब (खाँसाहेबांचे भाचे) यांच्याकडे तालीम घेतल्यावर १९२० साली ‘गिरगाव टेरेसेस’ या इमारतीमध्ये ताराबाई व  सुरेश मानेंनी ‘नूतन संगीत विद्यालया’ची स्थापना केली. १९२३ साली मुंबई सोडून ते सर्वजण वास्तव्यासाठी पुण्यास आले.

मुंबई आकाशवाणीवरून दर महिन्याला  सुरेश माने यांचे कार्यक्रम प्रसारित होत असत. शिवाय ‘ऑल इंडिया रेडिओ’ची भारतात जिथे-जिथे केंद्रे होती, तिथे-तिथे कॉन्फरन्समध्ये सुरेशबाबूंना गायला बोलवीत असत. या निमित्ताने अमृतसर, जालंधर, दिल्ली, लखनौ, चंडिगढ, पतियाळा, अहमदाबाद, बडोदा, बंगलोर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या मैफली झाल्या. जालंधरला डिसेंबर महिन्यात संगीत महोत्सव होत असे, तिथे सुरेश माने हजेरी लावत असत.

ते दोन तंबोरे इतके सुरेल लावत, की अर्धी मैफल आधीच जिंकून जायचे. तीन-चार स्वरांचा गुच्छ घेऊन त्यांची वेगवेगळी रूपे दाखविण्यात मानेंचा हातखंडा होता. ही मेरखंड पद्धतीची रचना, मींडयुक्त आलापी, सरगम करणे ही त्यांच्या ख्यालगायकीची वैशिष्ट्ये होत. ख्यालाप्रमाणेच त्यांची ठुमरी वेगवेगळी रूपे घेऊन यायची. त्यांना ठुमरीचे बादशहा म्हणून ओळखले जायचे. उत्तरेकडे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ‘महाराष्ट्रीय ठुमरी’ विलक्षण लोकप्रिय झाली होती. ठुमरीतील बोलांच्या साहाय्याने उपज अंगांनी ते  नजाकती करीत.

माने हार्मोनिअम उत्कृष्ट वाजवीत व हार्मोनिअम वादनाच्या स्वतंत्र मैफलीही करीत असत. आफ्रिकेच्या दौर्‍यावर ख्यालगायनाबरोबरच जलतरंग वाजवून त्यांनी लोकांची वाहवा मिळविली होती.

सुरेशबाबू आणि हिराबाईंनी १९२९ साली ‘नूतन संगीत विद्यालय’ची नाट्यशाखा स्थापन करून अनेक संगीत नाटकांचे गावोगावी प्रयोग केले. ही पाचही भावंडे या नाटकांमधून भूमिका करीत असत. त्यांनी ‘संशयकल्लोळ’मध्ये अश्विन शेठ, ‘संगीत सौभद्र’मध्ये अर्जुन, ‘एकच प्याला’मध्ये रामलाल, ‘साध्वी मीराबाई’मध्ये भोजराज, ‘संगीत मानापमान’मध्ये धैर्यधर अशा महत्त्वपूर्ण भूमिका करून एक गायक-नट म्हणून नावलौकिक मिळवला.

नाटकाबरोबरच त्यांनी चित्रपटांतही गायक, नट म्हणून भूमिका केल्या. ‘अमृतमंथन’ हा प्रभात कंपनीचा चित्रपट १९३४ मध्ये निघाला. त्यात मानेंनी माधव गुप्ताची महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘चंद्रसेना’ (१९३५) मध्ये रामाची भूमिका केली. यात त्यांनी ‘तबलातरंग’ही वाजवला होता. ‘सावित्री’ (१९३६), ‘संत जनाबाई’ (१९३८), ‘नंदकुमार’ (१९३८), ‘भगवा झेंडा’ (१९३९), ‘देवयानी’ (१९४०) या चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. चित्रपटसृष्टीत ते नट आणि संगीत दिग्दर्शक अशा दुहेरी नात्याने वावरले. त्या काळी त्यांनी संगीत दिलेली गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. ते आपल्या मैफलीत ती गीते गात असत.

सुरेशबाबू जसे श्रेष्ठ कलाकार होते, तसेच ते एक समर्थ गुरूही होते. त्यांनी अनेक कलाकार घडविले. त्यांनी शेवटपर्यंत आपल्याजवळचे ज्ञान मुक्तहस्ताने आपल्या शिष्यांना दिले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या पहिल्या शिष्या. सुरेश मानेंची धाकटी बहीण सरस्वतीबाई राणे, ज्येष्ठ समीक्षक वामनराव देशपांडे, संगीतज्ञ ग.वा.पंडित, वैद्य पांडुरंगशास्त्री देशपांडे, सवाई गंधर्वांचे जावई नानासाहेब देशपांडे, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, बसवराज राजगुरू, डॉ. प्रभा अत्रे या सर्वांना ते गुरू म्हणून लाभले. प्रत्येक शिष्याची आवाजाची जात, बौद्धिक पातळी बघून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब ते करीत असत. एक व्यक्ती म्हणूनही ते थोर होते. त्यांचे मन निर्मळ आणि उदार होते. त्यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता व ते आयुर्वेदिक औषधे देत असत.

सुरेशबाबूंचे वयाच्या एकावन्नाव्या वर्षी पुण्यात अकाली आणि आकस्मिक निधन झाले. त्या काळी ध्वनिमुद्रणाच्या फारशा सोयी नसल्याने त्यांचे फार थोडे गायन ध्वनिमुद्रित झाले.

त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या गुरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘हिराबाई-सुरेशबाबू संगीत महोत्सव’ मुंबई येथे अनेक वर्षे केला आहे.

डॉ. अश्विनी वळसंगकर

माने, सुरेश