Skip to main content
x

मांडे, चिंतामणी अनंत

     नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संशोधन कार्याची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्याचे मोठे श्रेय डॉ. चिंतामण अनंत मांडे यांना आहे. देश-विदेशातून उच्च  शिक्षण  घेऊन  आपल्या  जन्मभूमीची ओळख ‘क्ष-किरण वर्णपट अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र’ अशी करून देण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. चिंतामणी मांडे यांनी केले आहे.

     डॉ. मांडे यांचा जन्म नागपूर येथे झाला; मात्र त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण उत्तर प्रदेशात झाले. बनारस हिंदू विद्यापीठाची भौतिकशास्त्रातील विज्ञान पारंगत (एम.एस्सी.) ही पदवी १९४७ साली प्राप्त करून डॉ. मांडे यांनी संशोधन क्षेत्रात पदार्पण केले. त्यासाठी त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची निवड करून १९५२ साली विद्यापीठाची डॉक्टरेट (डी.फिल.) ही उपाधी मिळविली. ‘क्ष-किरण वर्णपट’ या विषयाची पहिली डॉक्टरेट पदवी (डी.फिल.) मिळविण्याचा मान पटकविणारे पहिले भारतीय डॉ. मांडे आहेत. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जी.बी. देवधर यांचे त्यांना या कार्यात मार्गदर्शन लाभले.

     १९५३ साली ते पुढील संशोधनासाठी पॅरिसला रवाना झाले. पॅरिस येथील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी ‘क्ष-किरण वर्णपट विज्ञान’ (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी) या क्षेत्रात अत्यंत मोलाचे संशोधन केल्याने १९५८ साली त्यांना पॅरिस विद्यापीठाच्या डी.एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले. पदार्थाच्या ‘घन अवस्थेतील स्पेक्ट्रोस्कोपी’ या विषयात डी.एस्सी. पदवी फ्रान्समध्ये मिळवण्याचा पहिला सन्मान, पहिले भारतीय डॉ. मांडे यांना मिळाला. या पदवीपत्रावर ‘अतिशय आदरणीय’ (व्हेरी ऑनरेबल) असा खास उल्लेख करण्यात आला आहे. या संशोधनकार्यात त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रसिद्ध वैज्ञानिक मादमोझेल वाय. कोशवा यांचे मार्गदर्शन लाभले होते.

     पॅरिसमधील संशोधनकार्य यशस्वीपणे पार पाडून मातृभूमीवरील प्रेमामुळे डॉ. मांडे लगेच भारतात परतले. भाभा अणू संशोधन केंद्रात ते वर्णपट विज्ञान विभागात संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथे दोन-अडीच वर्षे काम करून १९६१ साली डॉ. मांडे पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्रपाठक या पदावर नियुक्त झाल्याने, तेव्हापासून संशोधनाच्याच जोडीने अध्यापनाच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. या दुहेरी क्षेत्रांत त्यांनी प्रगतीचे अनेक टप्पे, कर्तृत्व आणि मेहनतीने गाठल्याने, डॉ. मांडे हे एक ‘उत्तम शिक्षक आणि संशोधक’, असे सर्वत्र ओळखले जातात.

     डॉ. मांडे नागपूर विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९६७ साली नियुक्त झाले. १८ वर्षे त्या पदावर काम करून १९८५ साली ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांचे संशोधन आणि अध्यापनकार्य कसलाही खंड न पडता, अखंडपणे अजूनपर्यंत सुरू आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना गोवा विद्यापीठाने प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून आमंत्रित केल्याने, १९९१ सालापर्यंत ते गोव्यात कार्यरत होते. गोवा विद्यापीठाचा भौतिकशास्त्र पदव्युत्तर विभाग स्थापन करण्याचे श्रेय डॉ. मांडे यांना आहे. विज्ञान आचार्य पदवीसाठी डॉ. मांडे यांनी आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशांतील उच्चतम स्थाने विभूषित करीत आहेत. डॉ. मांडे यांचे २००हून जास्त शोधनिबंध अनेक ख्यातनाम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची दोन पुस्तकेदेखील प्रकाशित झालेली आहेत. ‘अ‍ॅडव्हान्सेस इन एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी’ या शीर्षकांचा त्यांचा ग्रंथ परगॅमॉन प्रेसने प्रकाशित केला असून, त्याला प्रसिद्ध वैज्ञानिक प्रोफेसर एन.एफ. मॉन्ट यांची प्रस्तावना लाभली आहे.

     डॉ. मांडे आणि त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी क्ष-किरण वर्णपटातील ‘रासायनिक स्थानांतरा’चा (केमिकल शिफ्ट) विविध अंगांनी सखोल अभ्यास करून पदार्थांचे गुणधर्म जाणून घेण्याच्या कामी क्ष-किरण वर्णपट विज्ञानाची उपयुक्तता पटवून दिली आहे. अणूंच्या अंतर्गत रचनेची विस्तृत माहिती देण्याव्यतिरिक्त भौतिक, तसेच रासायनिक प्रक्रियेत अणूंमधील घडून येणाऱ्या महत्त्वाच्या बदलांची माहिती क्ष-किरण वर्णपटाच्या अभ्यासाने उत्तम प्रकारे मिळू शकते, हे डॉ. मांडे यांनी सर्वप्रथम दाखवून दिले आहे.

    डॉ. मांडे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. स्नातकपूर्व अभ्यासक्रमातील भौतिकशास्त्र विषयाच्या अध्यापनात सुधारणा घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी अनेक माध्यमांतून केलेले आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ‘युनिव्हर्सिटी लीडरशिप प्रॉजेक्ट’चे ते अनेक वर्षे संचालक होते. हार्वर्ड फिजिक्स प्रॉजेक्टच्या अंतर्गत त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक उन्हाळी कार्यशाळा घेण्यात आल्या. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळांची सुधारणा करण्यात डॉ. मांडे यांचा मोठा वाटा आहे.

     विज्ञान समाजोपयोगी व्हावे, तसेच विज्ञानाची रुची जनमानसात निर्माण व्हावी, यासाठी डॉ. मांडे यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. १९७४ साली नागपूरला भरलेल्या सायन्स काँग्रेस प्रसंगी उभारण्यात आलेल्या ‘विज्ञान प्रदर्शन मंडपा’चे मोठे श्रेय डॉ. मांडे यांना जाते. त्या प्रदर्शनाचीच फलश्रुती म्हणजे नागपुरातील ‘रामन विज्ञान केंद्रा’ची स्थापना ही एक विशेष उल्लेखनीय बाब होय. वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र (सेंटर ऑफ सायन्स फॉर व्हिलेजेस) निर्माण करण्यासाठी डॉ. मांडे यांनी बरेच श्रम घेतले. त्या केंद्राचे अनेक वर्षे उपाध्यक्ष आणि पुढे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाने इंदूर येथे स्थापन केलेल्या ‘आंतर विद्यापीठ संकुला’च्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे डॉ. मांडे हे बरीच वर्षे एक सन्माननीय सदस्य होते.

     डॉ. मांडे इंडियन सायन्स काँग्रेसचे आजीव सदस्य आहेत. फेब्रुवारी १९८०च्या कोलकाता येथील या संस्थेच्या सदुसष्टाव्या सत्राचे भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. इंडियन फिजिक्स असोसिएशन या संस्थेचे डॉ. मांडे एक आजीव संस्थापक सदस्य आहेत. बंगलोरच्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेससारख्या ख्यातनाम संस्थेचे ते सन्माननीय सदस्य निवडले गेले आहेत. या संस्थांच्याच धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेची स्थापना करण्यात डॉ. मांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. काही काळ त्यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

     विद्यापीठ अनुदान आयोगाने १९८० साली डॉ. मांडे यांची भौतिकशास्त्राचे ‘राष्ट्रीय व्याख्याता’ या पदावर नियुक्ती केली. ऑगस्ट १९८२ साली अमेरिकेतील ऑरेगॉन विद्यापीठात आयोजित केलेल्या क्ष-किरण भौतिकीच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी डॉ. मांडे यांना आमंत्रित करण्यात येऊन त्यांना त्यातील एका सत्राचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. १९८३ साली महाराष्ट्र शासनाने डॉ. मांडे यांचा ‘उत्तम शिक्षक’ म्हणून गौरव केला. मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘असामान्य वैज्ञानिक’ म्हणून, भारतीय उपकरण संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी डॉ. मांडे यांना गौरविण्यात आले आहे.

     संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी डॉ. मांडे यांनी अनेक देशांचे दौरे केले आहेत. डॉक्टरेट पदवी संपादन केल्यानंतर १९५३ ते १९५८ या काळातील फ्रान्समधील वास्तव्याव्यतिरिक्त, १९६५ साली त्यांनी जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्सला भेट दिली. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउण्डेशनच्या आमंत्रणानुसार त्यांनी १९६९ साली अमेरिकेला पहिली भेट दिली. त्यानंतर १९८२, १९८६ आणि १९८९ साली ते पुन्हा अमेरिकेचा शैक्षणिक दौरा करून आले. मध्यंतरी त्यांनी नेपाळला भेट दिली. फ्रान्सच्या सी.एन.आर.एस. या संस्थेच्या खास आमंत्रणावरून डॉ. मांडे १९७७ साली पुन्हा एकदा पॅरिसला जाऊन आले. त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रतिनिधी या नात्याने डॉ. मांडे मलेशियाच्या पेनॅग विद्यापीठात आयोजित केलेल्या भौतिकशास्त्र शिक्षणासंबंधीच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या विभागीय संमेलनात सहभागी झाले.

     मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. भौतिकशास्त्र हा विषय ते अतिशय सोप्या आणि अभिनव पद्धतीने शिकवितात. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून मुद्देसूद प्रबंध लेखन कसे करावे, याचा आदर्श डॉ. मांडे यांनी घालून दिला आहे.

अविनाश सेनाड

मांडे, चिंतामणी अनंत