Skip to main content
x

मारुलकर, नारायण रघुनाथ

नारायण रघुनाथ मारुलकर यांचा जन्म मिरजेला झाला व त्यांचे बालपण सांगली, कोल्हापूर येथे गेले. लहानपणी कोल्हापुरात त्यांना उ. अल्लादिया खाँसाहेबांसारख्या उच्च कोटीच्या कलाकाराची कला ऐकायला मिळाली. त्यांचे मोठे बंधू दत्तात्रेय व नारायण मारुलकर हे बालकीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच आपल्या बंधूंना ते हार्मोनियमची साथही करू लागले.

सांगलीस शिवरामबुवा उंचीठाणेकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर ग्वाल्हेर घराण्याची पक्की तालीम त्यांना गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. वामनबुवा चाफेकर व पं.अनंत मनोहर जोशी यांच्याकडून मिळाली.

उ.अल्लादिया खाँ यांचे शिष्य गोविंदबुवा शाळीग्राम यांच्याकडून ते जयपूर घराण्याचीही गायकी शिकले. आग्रा घराण्यातील खास चिजा त्यांना पं.रत्नकांत रामनाथकर यांच्याकडून मिळाल्या. याशिवाय गोखले घराण्यातील अनेक अनवट बंदिशीही त्यांनी पं. विश्वनाथबुवा गोखले यांच्याकडून आत्मसात केल्या होत्या. गोविंदराव टेंबे यांच्या सहवासातून त्यांनी हार्मोनिअम वादनातील खुब्या अभ्यासल्या, तसेच काही काळ पं.गजाननबुवा जोशी यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रा.ग.ह.रानडे यांच्याशी त्यांच्या संगीतशास्त्र विषयक चर्चा होत असत. अशा रितीने त्यांनी हिंदुस्थानी रागसंगीताचा चौफेर व सखोल व्यासंग केला होता.

त्यांनी १९६० साली ‘हिंदुस्थानी संगीतातील घराणी’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘संगीत प्रवीण’ (डॉक्टर ऑफ म्युझिक) ही पदवी संपादन केली. मारुलकर १९३८ च्या सुमारास पुण्यात स्थायिक झाले. अनेक कलाकार, संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांच्याशी त्यांचा संवाद होत असे.

एक उत्कृष्ट हार्मोनिअम वादक म्हणूनही त्यांनी लौकिक प्राप्त केला व हिराबाई बडोदेकरांसारख्या अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी हार्मोनिअमची सुयोग्य साथ केली. त्यांनी ‘नट-कली’ या रागाची निर्मिती केली होती, तसेच काही ढंगदार बंदिशींचीही रचना केली, आकाशवाणी व शालेय कार्यक्रमांसाठी काही नाटकांना व स्फुट पदांना चाली दिल्या.

पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. पुणे विद्यापीठाच्या संगीत अभ्यासक्रम मंडळाचे, तसेच एस.एस.सी. बोर्डाचे संगीत विषयाचे सदस्य व परीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले. आकाशवाणी या माध्यमासाठी त्यांनी संगीतविषयक भाषणे, विशेष विषयांवर आधारित मैफली इ. कार्यक्रमांचे नियोजन केले. आकाशवाणीवर ते संगीत परीक्षक म्हणूनही कार्यरत होते.

‘संगीतातील घराणी’ व ‘गोमंतकीय संगीतकार’ हे डॉ. मारुलकरांचे महत्त्वाचे असे दोन संगीतविषयक ग्रंथ म्हणजे मराठीतील संगीतविषयक लेखनासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आहे. ‘संगीतातील घराणी’ (१९६२, पुणे) हा त्यांचा ग्रंथ विशेष नावाजला गेला. या ग्रंथात डॉ. मारुलकर यांनी घराणे ही संकल्पना, तिचे कार्य, आवश्यकता, घराण्यांची सद्य:स्थिती यांवर भाष्य केले आहे. त्यांनी अतिशय मार्मिकपणे व तटस्थपणे, चिकित्सात्मक असे लेखन केले आहे. याशिवाय ‘स्त्रियांचे घराणे’, ‘घराण्यांची सांगता’ व ‘संगीताचे भाष्यकार’ हे या ग्रंथातील लेखही मारुलकरांच्या मर्मदृष्टीची साक्ष देतात.

गोव्यातील अनेक ज्येष्ठ गायक-वादक कलाकारांचा परिचय ‘गोमंतकीय संगीतकार’ (१९७६) या ग्रंथातून दिसतो. त्यांनी लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर, रामकृष्ण पर्वतकर, श्रीधर पार्सेकर, वझे बुवा, अंजनीबाई मालपेकर, केसरबाई केरकर, गोपाळकृष्ण भोबे, मलबाराव सरदेसाई इत्यादी  सतरा व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. याशिवाय मराठीतील अनेक वृत्तपत्रे, ‘संगीत कला विहार’सारखी मासिके यांतून त्यांनी व्यासंगपूर्ण लेखन केले.

डॉ. मारुलकरांनी अत्यंत निरलसपणे अनेकांना मुक्तहस्ते विद्यादान केले. विमल वाकडे, शुभदा चिरमुले, बबनराव नावडीकर, श्यामा घाणेकर, कुमुदिनी काटदरे हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. डॉ. प्रभा अत्रे यांनीही काही काळ डॉ. मारुलकर यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यांच्या स्नुषा डॉ. अलका देव-मारुलकर या प्रसिद्ध गायिका आहेत.

चैतन्य कुंटे 

मारुलकर, नारायण रघुनाथ