Skip to main content
x

मायी, चारुदत्त दिगंबर

               चारुदत्त दिगंबर मायी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण साखरखेडा खेड्यात झाले. मेहेकर येथे माध्यमिक शिक्षण झाल्यावर अकोला येथील कृषी महाविद्यालयातून १९६५मध्ये पदवी प्राप्त केली व १९६७मध्ये नागपुरातील कृषी महाविद्यालयातून पीक-रोगशास्त्रामध्ये एम.एस्सी. पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी १९७२मध्ये नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून पीएच.डी. पदवी मिळवली. त्यांनी जर्मनीतील होईनहेन विद्यापीठात प्रसिद्ध अ‍ॅलेक्झेंडर व्हान हमफोल फाऊंडेशन प्रकल्पात सदस्य म्हणून १९८० ते १९८२मध्ये पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम पूर्ण केला. मायी यांची संशोधन सहकारी म्हणून संशोधन कार्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी संशोधन साहाय्यक, सहप्राध्यापक म्हणूनही काम केले. त्यांनी १९७२ ते १९७४ या काळात लुधियाना येथे पंजाब कृषी विद्यापीठात साहाय्यक विषाणूशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलेे. त्यांनी १९७२ ते १९९७ या कालखंडात मराठवाडा कृषी विद्यापीठात प्राध्यापक व विकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख या नात्याने काम केले. त्यांनी ३० एम.एस्सी. व २० पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जालना येथील महिको संस्थेत सहसंचालक म्हणून काम केले.

               नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांनी १९९१-९३ या काळात अकोला येथील कृषी महाविद्यालयात सहअधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांनी १९९५-९७मध्ये एन.ए.आर.पी., औरंगाबाद येथे सहसंचालक म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी १९९७ ते २००० या कार्यकाळात मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरूपद सांभाळले. याव्यतिरिक्त त्यांनी मॅक्समुलर भवन, नवी दिल्ली येथे १९६९-७०मध्ये जर्मन भाषेतील उल्लेखनीय दस्तऐवज संपादित केले.

               मायी यांनी १० अ‍ॅडव्हॉक संशोधन प्रकल्पात संशोधन केले. ते भारतीय विकृतिशास्त्र संस्थेचे १९९७मध्ये अध्यक्ष होते. या काळात त्यांनी राष्ट्रीय निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ते क्रियाशील खेळाडू वृत्तीचे असून त्यांनी खेळ व क्रीडांमध्ये ‘अश्‍वमेघ’ आयोजित केला होता. विविध सामाजिक संस्थांचे ते क्रियाशील सदस्य आहेत. मायी यांना एस. राय चौधरी (१९७२), नरसिंहन अकादमी (१९७४), पेस्टिसाइड (१९८९), व्ही.जी. गोखले (१९९८) हे पुरस्कार मिळाले. कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये सर्व प्रकारचा सहभाग असल्यामुळे वसंतराव नाईक पुरस्कार (२०००), डॉ. बी. विश्‍वनाथ आय.सी.ए.आर.चा सर्वश्रेष्ठ पुरस्कार (२००३) मिळाले असून, त्यांना २००९मध्ये राजेंद्र कृषी विद्यापीठ, पुसा बिहारची डी.एस्सी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. कापूस विकास तंत्रज्ञानामध्ये मायी यांचा सहभाग उल्लेखनीय असून संपूर्ण भारत व इतरत्र देशांत त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात येते.

               जी.ई.ए.सी.मध्ये जीवशास्त्र सहअध्यक्षपद भूषवण्याचा मानही मायी यांना प्राप्त झाला. आंतरराष्ट्रीय कृषि-जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ते क्रियाशील मंडळ सदस्य म्हणून सेवा करत आहेत. ते नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सचे फेलो असून त्यांनी ३०पेक्षा अधिक देशांना कृषिशास्त्र विकासासाठी भेटी दिल्या आहेत.

- संपादित

मायी, चारुदत्त दिगंबर