Skip to main content
x

मराठे, प्रमोद धोंडूमामा

प्रमोद धोंडूमामा मराठे यांचा जन्म संगीताचा वारसा असणाऱ्या परिवारात, पुणे येथे झाला. त्यांचे वडील हे पं. विनायकबुवा पटवर्धन यांचे मेहुणे व शिष्य होते, तसेच ते पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाचे संचालक होते. प्रमोद मराठे यांनी वडिलांकडून विद्यालयीन संगीत शिक्षण घेतले. दिलीप वसंत गोसावी यांच्याकडून त्यांनी हार्मोनिअमवादनाचे धडे घेतले. नंतर त्यांनी संवादिनीवादक मनोहर चिमोटे यांचे शिष्यत्व स्वीकारले.

संवादिनीच्या (हार्मोनिअम) स्वतंत्र वादनापेक्षा साथसंगत करण्यावर त्यांनी भर दिला व एक सफल संगतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांनी पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, प्रभा अत्रे, मालिनी राजुरकर, प्रभाकर कारेकर, वीणा सहस्रबुद्धे अशा अनेक कलाकारांना देश-विदेशांत अनेक मैफली, ध्वनिमुद्रणांसाठी साथ केली. ते १९८५ पासून आकाशवाणीवरून साथ करत आहेत.

मुंबई, पुणे, कल्याण, बेळगाव, कुंदगोळ येथे त्यांनी एकल संवादिनीवादन केले आहे, तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका व सिंगापूर येथेही गायनाच्या साथीसाठी गेले असताना त्यांनी एकलवादन केले आहे.

वडिलांच्या पश्चात पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची धुरा प्रमोद मराठे यांच्या हाती आली व ते ती समर्थपणे पुढे नेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाची नवी इमारत बांधून त्यांनी त्यात ‘विष्णू-विनायक स्मृती मंदिर’ हे सभागृह निर्माण केले. हे ठिकाण आज पुण्याच्या सांगीतिक जगाचा केंद्रबिंदू बनले आहे.

प्रमोद मराठे यांनी या विद्यालयामार्फत अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम हाती घेतले व सातत्याने राबवले आहेत. ‘विनायकबुवा पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सव’, ‘बुजुर्ग संगीत संमेलन’, ‘शकुंतला स्मृती युवा महोत्सव’ असे कित्येक संगीत समारोह ते घडवून आणतात.

गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘संगतकार’ पुरस्कार, ‘संगीत शिक्षक गौरव’ पुरस्कार, ‘रामकृष्णबुवा वझे गायन’ पुरस्कार असे पुरस्कार देऊन त्यांनी अनेक कलाकारांचा गौरव केला . त्यांनी २००७ साली बारामती येथे गांधर्व महाविद्यालयाची शाखा सुरू केली. हार्मोनिअमच्या अभ्यासक्रमाची पुस्तके व ध्वनिचकत्या (सीडी) मराठे यांनी तयार केल्या . सातत्याने नवनवीन माध्यमांद्वारे संगीताचा व्यवसाय वाढवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नव्या काळानुसार ते इंटरनेटच्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ संगीत शिक्षणही देतात.

मिलिंद कुलकर्णी, तन्मय देवचके, राजीव तांबे हे त्यांचे शिष्यही आज मैफलींतून यशस्वीपणे साथसंगत करत आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी हेही त्यांचे हार्मोनिअम विद्यार्थी होते. आजच्या काळातील एक उत्तम हार्मोनिअम संगतकार, कुशल संघटक व पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाचे संचालक, शिक्षक अशी चौफेर कामगिरी प्रमोद मराठे यांनी केली.

चैतन्य कुंटे

मराठे, प्रमोद धोंडूमामा