Skip to main content
x

मुधोळकर, निर्मलकुमार जयकुमार

              निर्मलकुमार जयकुमार मुधोळकर यांचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथे झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे आठवडा बाजारात वह्या, स्टेशनरी, चहा, साबण अशा वस्तू विकून त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. माध्यमिक शिक्षणही अशाच तर्‍हेने शाळेच्या आणि मित्रांच्या मदतीमुळे पार पडले. आत्यंतिक गरिबीमुळे पुढचे शिक्षण मिळणे कठीणच होते. पण त्याच वेळी त्यांच्या राजकुमार नावाच्या मित्राचे वडील रुखबदास चौरे हे जमीनदार मदतीला धावून आले. या मित्राच्या वडिलांची २००० एकर शेतजमीन होती. या शेतजमिनीची देखरेख करण्यासाठी त्यांना एखादा कृषी पदवीधर हवा होता. पदवी घेतल्यानंतर पाच वर्षे त्यांच्याकडे नोकरी करायची या करारावर त्यांनी मुधोळकरांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च केला. मुधोळकरांचे पुढचे शिक्षण सुरू झाले. त्यांना दिल्ली येथील नावाजलेल्या भा.कृ.सं.सं.त पदव्युत्तर शिक्षणासाठी संधी मिळाली. त्यांना प्रसिद्ध कृषि-वैज्ञानिक आणि उद्योजक डॉ. केशवराव यावलकर यांचे मार्गदर्शन मिळाले. असोसिएटशिप ऑफ आय.ए.आर.आय.च्या पदविका परीक्षेत मुधोळकर पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.

            नवी दिल्लीच्या भा.कृ.अ.सं.त अखिल भारतीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग या विभागाच्या नागपूर केंद्रात १९५८मध्ये मृदा सर्वेक्षण साहाय्यक या पदावर त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यांनी १९७८पर्यंत विविध पदांवर कार्य केले. नागपूर येथे १९७८मध्ये केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक या पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांनी कोरडवाहू कपाशीच्या उत्पादनवाढीचे अगदी साधे, सोपे व अल्प खर्चाचे तंत्र विकसित केले. कपाशीची पेरणी करतानाच त्याच्या ओळीतील मोकळ्या जागेत त्यांनी चवळीची पेरणी केली. ५ आठवड्यांनंतर हीच रोपे कापून त्यांनी तिथल्या तिथे सोडून दिली. ही रोपे कालांतराने मातीशी एकरूप झाली; त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा साठा वाढला.

            सामान्य शेतकर्‍याला सहज करता येतील असे उपाय मुधोळकर यांनी करून दाखवले. कापूस पिकाबाबत उल्लेखनीय कामगिरीबद्दल हेक्झामार हा राष्ट्रीय पुरस्कार मुंबईच्या इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट या संस्थेतर्फे त्यांना मिळाला आहे. ते १९९३मध्ये नागपूर येथील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेतून प्रमुख वैज्ञानिक (सस्यविज्ञान) या पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी तांत्रिक सल्लागार, योजना प्रमुख या पदांवर शासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये १२ ते १३ वर्षे काम केले.

- वर्षा जोशी - आठवले

मुधोळकर, निर्मलकुमार जयकुमार