Skip to main content
x

नाईक, गणेश गोविंदपंत

गोपालनाथ महाराज

     पूर्वाश्रमीचे गणेश गोविंदपंत नाईक म्हणजेच गोपालनाथ महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील सलाबतपूर गावात झाला. त्यांच्या मातु:श्रींचे नाव आनंदीबाई असे होते. त्यांचे घराणे शुक्ल यजुर्वेदी कौंडिल्य गोत्री ब्राह्मण असले तरी व्यवसाय सावकारीचा होता. खरे तर, त्यांचे मूळ आडनाव घोलप; परंतु सावकारीमुळे नाईक हे नाव मिळाले. सलाबतपुरात मोगलांच्या धाडी पडत. एका धाडीत गोविंदपंतांचे सगळे वैभव लुटले गेले. त्यामुळे नाईक कुटुंब जवळच्या कोंढवळ गावी स्थलांतरित झाले. कोंढवळ गावात गेल्यावर लवकरच गोविंदपंतांनी देह ठेवल्यानंतर आणि ज्येष्ठ बंधूदेखील अज्ञातवासात निघून गेल्यानंतर गोपालनाथ आईसह सुरजी अंजनगावात राहू लागले. तेथे गोपालनाथांना अवघ्या चौदाव्या वर्षीच कमालीची विरक्ती आली आणि ते विदर्भातील पयोष्णी नदीच्या तीरावरील रामतीर्थ स्थानी तपाचरण करण्यास निघून गेले. येथे त्यांना श्रीदत्तांनीच गोपालनाथ हे नाव दिले असे मानतात. येथेच वेद-शास्त्र, उपनिषदे आणि आध्यात्मिक विचार मौक्तिकांचा त्यांना लाभ झाला.

      पुढे पुन्हा गुरुभेटीसाठी गोपालनाथ फिरू लागले. काशीयात्रेस जाऊन आले. तेथून ते मराठवाड्यातील सिऊर येथील अरण्यात, वैष्णवदेवीच्या मंदिरात राहू लागले. तेथे त्यांनी प्रापंचिकांचे अन्न वर्ज्य केले आणि केवळ गाईचे दूध सेवन करून राहू लागले. असे सांगतात, की ते साधनेने वांझ गाईंच्या आचळातूनही दूध काढीत असत. असेही म्हणतात, की श्रीगोपालनाथांना वैष्णवदेवीचा कृपाप्रसाद लाभला होता. तेथेच एकदा श्रीरंगनाथस्वामी नावाचे ज्येष्ठ गुरू श्रीगोपालनाथांना भेटण्यास आले. त्यांनी गोपालनाथांना शास्त्रातील एका वाक्याचा अर्थ विचारला. गोपालनाथांना तो सांगता आला नाही. त्यांनी वैष्णवदेवीला साकडे घातले. तेथे त्यांना श्रीरंगनाथस्वामीच आपले गुरू आहेत, तेच अर्थ सांगतील हा साक्षात्कार झाला. त्यानुसार ते आपल्या गुरूंसोबत काही काळ राहिले आणि नंतर गोपालनाथांनी बाभूळ मुक्कामी आपला मठ उभा केला.

     या काळात गोपालनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्यांनी अनेकांच्या व्याधी चमत्कारासारख्या बर्‍या केल्या. कुणाचे कोड घालवले, अपंगांना बरे केले. एकदा तर एका यवनी किल्लेदाराने त्यांना विषमिश्रित मिठाई पाठविली होती. ती त्यांनी सेवन केली आणि आपल्या योगसामर्थ्याने तशीच तीन दिवसांनी पुन्हा वमन करून टाकली. या त्यांच्या सार्‍या लौकिकांमुळे त्यांचा भक्तसंप्रदाय वाढू लागला. गोपालनाथांनी लोकोपदेश आणि सेवाकार्यासाठी पुढे पैठण येथे श्रीनाथांच्या चरणी प्रस्थान ठेवले. तेथे काही काळ वास्तव्य करून ते पुन्हा सातार्‍याला आले. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी अध्यासने, मठ, आश्रम स्थापून आपल्या शिष्यगणांचा विस्तार केला. सातार्‍याच्या जरंडेश्वराच्या डोंगरातील वृषभगुंफेत त्यांनी एकांतात काही काळ व्यतीत केला. साधनेसाठी किन्हईच्या यमाईच्या स्थानातील एका गुंफेत त्यांनी आपल्या शिष्यांसह सात महिने वास्तव्य केले.

     अशी सारी मजल-दरमजल करीत, आपला शिष्यगण वाढवीत असतानाच त्यांचे शाहू महाराज यांच्याशी काही मतभेद झाले. त्यामुळे गोपालनाथांनी तेथील नीरा नदीच्या किनार्‍यालगतच्या प्रदेशात वाटचाल सुरू केली. या वाटचालीत त्यांना जेऊर नावाच्या गावात खंडोबाच्या ओढ्यापाशी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे आढळले. तेथे गोपालनाथांनी स्वत:च्या हातांनी खणण्यास सुरुवात केली, तेव्हा तेथे पाण्याचा झरा आढळला. गावकर्‍यांना मुबलक पाणी मिळू लागले. लोकांची विपन्नावस्था संपली. गावकर्‍यांनी मग तेथे महाराजांचा मठ बांधला. बागायती जोमाने सुरू झाली. धान्य पिकू लागले. त्यातून लोकांना नियमित भंडारा मिळू लागला.

     श्री गोपालनाथांनी लोकभावनेचा मान ठेवून तेथील त्रिपुटी स्थानात कायमचे वास्तव्य करण्याचे ठरविले. कालांतराने शाहू महाराजांचाही गैरसमज दूर झाला. त्यानंतर त्रिपुटी येथे राजाश्रयातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्रिपुटीत अध्यात्माचे विद्यापीठ सुरू झाले. तेथे भोसलेवाडी नावाची वसाहत उभी राहिली. अनेक विद्या व्यासंगी आणि प्रकांड पंडितांची उठबस सुरू झाली. धावडशीचे पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी वेळोवेळी तेथे येत. तेथे परमहंस, गोपाळ माधवनाथ, सामराज, शेख दाजी, शेख सुलतान असे शिष्योत्तम तयार झाले. गुरू ब्रह्मेंद्रस्वामींनी पेशव्यांकडून एक लक्ष मूल्याचा मोठा तलाव त्रिपुटीस बांधून दिला. तोच आजचा गोपाळतलाव होय.

     श्री गोपालनाथांनी आपले अध्यात्म ‘वेदान्त शिरोमणी’ या महाग्रंथात शब्दबद्ध करून ठेवले आहे. ‘श्रीगुरुगीता टीका’ हा आणखी एक तात्त्विक चर्चेचा ग्रंथ खूप मोलाचा आहे. त्यांच्या ‘गोपालनाथ गाथे’त अनेक अभंग, ओव्या, आरत्या, रूपके, कुटे, भारुडे समाविष्ट आहेत. त्यांनी हिंदी भक्तिरचनाही केल्या आहेत. इसवी सन १७६६ सालात, श्रावण वद्य अमावास्या तिथीला शुक्रवारी, पद्मासन घालून, सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांनी त्रिपुटी येथे जिवंत समाधी घेतली. सध्या त्यांच्या घराण्यातील गुरुवर्य अण्णासाहेब महाराज घोलप श्री गोपालनाथ महाराजांची ही परंपरा पुढे चालवीत आहेत.

संदीप राऊत

नाईक, गणेश गोविंदपंत