Skip to main content
x

नामजोशी, महादेव बल्लाळ

हादेव बल्लाळ नामजोशी ह्यांचा जन्म कोकणातील महाड गावाजवळील बिरवाडी येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात ‘बाबा गोखले’ यांच्या शाळेत व पुणे कँपमधील ‘मिशन हायस्कूल’ मध्ये झाले. १८७३ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे लॅटिन हा त्यांचा दुसरा भाषा विषय होता. महाविद्यालयीन शिक्षणाच्या फंदात न पडता नामजोशींनी सरळ सामाजिक कार्यच सुरू केले.

 १ जानेवारी १८८० रोजी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना झाली व महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे त्याचे प्रवर्तक होते व त्यांच्या साथीला डेक्कन महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि पदवीपूर्व अभ्यासक महादेव बल्लाळ नामजोशी होते. ‘मोरोबादादा वाड्यात’ शाळेचे उद्घाटन झाले. दुसऱ्या दिवसापासून शिकविणे सुरू झाले. नामजोशी पदवीधर नव्हते पण व्यवस्थापन व संघटन यात ते तरबेज होते. नगरपालिका, औद्योगिक क्षेत्र, पत्रकारिता यांत त्यांना विशेष रस होता. ह्या सर्वांचा शाळेच्या प्रगतीला फार उपयोग झाला. नामजोशींच्या आग्रहामुळे शालेय अभ्यासक्रमात शास्त्रीय व तांत्रिक विषयांचा समावेश झाला. त्यांच्या प्रयत्नांमुळे १८८६ मध्ये शाळेत व्ही. एम. ओक यांचे विशेष चित्रकला वर्ग सुरू झाले. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र  ह्यांचे प्रात्यक्षिक वर्गही सुरू झाले.

 नामजोशींचा लोकसंग्रह प्रचंड होता. स्वभावात धडाडी होती. या गुणांच्या जोरावर त्यांनी दक्षिण मराठी संस्थानांकडून पन्नास हजार रुपयांच्या देणग्या मिळविल्या. त्यामुळे १८८५ मध्ये फर्गसन महाविद्यालय सुरू करणे शक्य झाले. त्यावेळचे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन ह्यांचा शैक्षणिक उदारमतवाद भावल्यामुळे संकल्पित महाविद्यालयाला फर्गसन यांचे नाव देण्याचा आग्रह नामजोशींचा होता. चतु:शृंगीच्या माळावर शिरोळे यांची जागा महाविद्यालयासाठी मिळविण्यात टिळकांबरोबर नामजोशी होते. पुणे नगरपालिकेच्या कार्यात नामजोशींना विशेष रस होता. १८८५ नंतर पुण्याच्या व्यापारी प्रतिनिधींच्या वतीने त्यांची निवड झाली होती. पुण्यात ‘कॉटन सिल्क मिल’ व ‘पूना मेटल फॅक्टरीच्या’ स्थापनेच्या प्राथमिक चर्चेत त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या आद्य शिल्पकारांपैकी आघाडीचे शिलेदार म्हणून महादेव बल्लाळ नामजोशी ओळखले जातात.

 भारताच्या औद्योगिक प्रगतीत नामजोशींना विशेष रस होता. त्यासाठी त्यांनी ‘इंडस्ट्रियल रिव्ह्यू’ व ‘शिल्पकला विज्ञान’ ही पत्रे सुरू केली. पुण्यातील ‘रे म्युझियम’, ‘इंडस्ट्रियल कॉन्फरन्स’, १८८८ मध्ये झालेल्या ‘पूना इंडस्ट्रीयल एक्झिबिशन’ यांची कल्पना नामजोशींचीच होती. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली त्यावेळी नामजोशी ‘किरण’ व ‘डेक्कन स्टार’ स्वत:च्या जबाबदारीवर चालवत होते. नामजोशींचा छापखाना साठे यांच्याकडे गहाण पडला होता. त्यांचे कर्ज हप्त्यांनी फेडून सामान मोरोबादादांच्या वाड्यात आणावयाचे असे ठरले. छापखान्यास पहिले काम निबंधमालेचे मिळाले. निबंधमालेच्या सहासष्टाव्या अंकात केसरीचे उद्देश पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात केसरीचा कृतसंकल्प प्रसिद्ध झाला. त्यावर विष्णू कृष्ण चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, वामन शिवराम आपटे, गणेश कृष्ण गर्दे, गोपाळ गणेश आगरकर व महादेव बल्लाळ नामजोशी ह्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे नामजोशी केसरीचेही संस्थापक मानले जातात.

 १८८६ मध्ये महाबळेश्वर येथे मुंबई सरकारने डेक्कन महाविद्यालय व फर्गसन महाविद्यालय ह्यांच्या विलिनीकरणाच्या चर्चेच्या वेळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लॉर्ड डफरीन यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी नामजोशींना कलकत्त्यास पाठवायचे ठरविण्यात आले होते.

 उत्तम प्रशासक, कुशल संघटक, राजनैतिक कौशल्य असलेला नेता व दूरदृष्टी लाभलेले शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी दिलेले योगदान  मोठे आहे.

- डॉ. वि. मा. बाचल

 

नामजोशी, महादेव बल्लाळ