ओक, मनोहर शंकर
मनोहर ओक यांचे वास्तव्य मुंबईत होते. त्यांचे शालेय शिक्षण एस.एस.सी.पर्यंत झाले. तसेच ते अनियतकालिकांच्या चळवळीतील प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध होते.
मनोहर ओक यांनी आयुष्यात कधीही तडजोडी केल्या नाहीत. बंधने मानली नाहीत. नातीगोती, घरसंसार अशा कसल्याही बंधनात स्वत:ला गुरफटून घेतले नाही. कवितेतच जगणे थाटणार्या या कलंदर कवीने प्रस्थापित कवितेचा चेहरामोहराही बुद्धीपुरस्सर टाळला आणि आपल्याच अटींवर कविता लिहिल्या.
मुंबई महानगरीत जगण्याचा सर्वस्पर्शी अनुभव मनोहर ओकांच्या साहित्यातून व्यक्त होतो. त्यांनी समकालीन वास्तवाचा वेध आधुनिक संवेदनशीलतेने घेतला आहे. एकाकीपण, नैराश्य, उदासीनता, आयुष्याची निरर्थकता ही त्यांच्या कवितेची मुख्य आशयसूत्रे असून कवितेची शैली अनियंत्रित वाटली, तरी तिचा आशय धारदारपणे संक्रमित करणारी आहे. प्रतिमासृष्टीही समृद्ध आहे.
‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबर्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ (१९९६) या संग्रहाचे संपादन चंद्रकांत पाटील आणि तुलसी परब यांनी केले आहे. हा संग्रह त्यांच्या अप्रकाशित कवितांपैकी काही निवडक कवितांचा आहे.