Skip to main content
x

ओक, विश्वनाथ विनायक

           बॅरिस्टर व्ही.व्ही. ओक म्हणून परिचित असलेल्या व बॉम्बे आर्ट सोसायटीची अनेक वर्षे धुरा वाहणाऱ्या या चित्रकाराचा जहांगीर आर्ट गॅलरीच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता.

           विश्‍वनाथ विनायक ओक यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. व्ही.व्ही ओक यांच्या वडिलांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतले होते व सुरुवातीला ते मुंबईतच चित्रकलाशिक्षक म्हणून काम करीत होते. लोकमान्य टिळकांनी ९ जानेवारी १८८० मधे पुण्यात न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना केली. लोकमान्य टिळकांशी असलेल्या स्नेहसंबंधामुळे ओक मुंबईतील चित्रकला शिक्षकाची नोकरी सोडून पुण्यात गेले. पण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी न मिळाल्याने जवळच जागा घेऊन एलीमेंटरी व इंटरमिजीएटचे वर्ग चालवू लागले. पुढे त्यांची काठियावाडच्या संस्थानिकांशी भेट झाली व त्यांच्या आमंत्रणावरून ते काठियावाडला चित्रे काढण्यासाठी व चित्रकला शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे व्ही.व्ही. ओक यांचे बालपण गुजरातमधे गेले व त्यांच्यावर लहानपणापासूनच चित्रकलेचे संस्कार झाले.

           या गुजरातमधील मुक्कामातच व्ही.व्ही. ओक यांचे शालेय शिक्षण झाले. त्यामुळे ते अस्खलित गुजराती बोलत व लिहीत. पुढे त्यांचे वडील पुन्हा पुण्यास आले व व्ही.व्ही. ओक यांचे उर्वरित शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण (बी.ए.) पुणे येथे पार पडले. यानंतर ते मुंबईस येऊन एका कापडबाजाराच्या कार्यालयात कार्यवाह म्हणून नोकरीस राहिले व त्याचबरोबर एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करून १९१८ मध्ये त्यांनी वकिलीस सुरुवात केली. त्यांनी १९२६—२७ या काळात इंग्लंडला जाऊन ‘बॅरिस्टर’ ही पदवी मिळविली. ते १९३७ ते १९४० च्या काळात लघुवाद न्यायालयात हंगामी न्यायाधीशही होते. त्यांनी १९४८ साली गांधीहत्येच्या खटल्यात नथुराम गोडसेचे वकील म्हणून काम पाहिले. न्यायालयाचे कामकाज चालू असताना ते हजर असलेल्या व्यक्तींची स्केचेस करीत असत.

           लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’शी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. व्ही.व्ही. ओक यांना छायाचित्रणाची खूप आवड होती व त्यात त्यांनी नैपुण्यही मिळविले होते. त्या काळात अंधाऱ्या खोलीत, दरवाजाच्या बारीक फटीतून येणाऱ्या प्रकाशाच्या तिरिपीसमोर निगेटिव्हची काच धरून ते फोटो—एन्लार्जमेंट करीत असत. त्यांनी ड्रॉइंग व पेंटिंगचे धडे वडिलांकडे घेतले व पुढे ते स्वत: चांगली व्यक्तिचित्रणे करू लागले. याच काळात त्यांचा बॉम्बे आर्ट सोसायटीशी संबंध आला व १९२८ ते १९६२ या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी सोसायटीचे कार्यवाह म्हणून काम पाहिले व बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नावलौकिकात मोठीच भर घातली.

बॅरिस्टर परीक्षेसाठी इंग्लंडला गेले असताना त्यांनी तेथील चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनांसाठी असलेली कलादालने व त्यांत भरणारी प्रदर्शने पाहिली होती. अशा प्रकारचेे एक तरी कलादालन मुंबईत असावे, असे त्यांना वाटू लागले. वकिलीमुळे त्यांची राजकीय व सामाजिक वर्तुळातील महत्त्वाच्या व्यक्तींशी जवळीक होती व त्याचा उपयोग करून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी. जी. खेर यांच्यामार्फत केंद्रीय मंत्रिमंडळाशी संपर्क साधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) आवारात एक भूखंड मिळविला व बॉम्बे आर्ट सोसायटीचे  तत्कालीन अध्यक्ष सर कावसजी जहांगीर यांनी दिलेल्या देणगीतून सध्याची जहांगीर आर्ट गॅलरीची इमारत उभी राहिली.

           जहांगीर आर्ट गॅलरी १९५२ मध्ये अस्तित्वात आली. बॅरिस्टर ओक यांच्या योगदानामुळे बॉम्बे आर्ट सोसायटीला त्यामध्ये एक छोटेसे, कायमस्वरूपी कार्यालय मिळाले व जहांगीर आर्ट गॅलरीच्या निवड समितीवर, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यकारिणीवर निवडून येणार्‍या कार्यकारिणीवरील दोन सभासदांस प्रतिनिधित्व देण्यात आले.

           त्यांनी १९४८ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांची तैलरंगात व्यक्तिचित्रे तयार करून उच्च न्यायालयास भेट दिली. आजही ही चित्रे मुंबई उच्च न्यायालयात पाहता येतात. १९६२ मध्ये, उच्च न्यायालयाच्या शताब्दीच्या वेळी, उच्च न्यायालयातील खराब होऊ लागलेली चित्रे त्यांनी दुरुस्त व पूर्ववत करून दिली. गिरगावातील ब्राह्मणसभेचे संस्थापक श्री. केळकर यांचे चित्रही त्यांनी दुरुस्त करून दिले. दादाभाई नौरोजी व फिरोझशहा मेहता यांची तैलचित्रे एम.एफ. पीठावाला दिल्लीला संसदेत लावण्यासाठी तयार करीत होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर ही चित्रे बॅरिस्टर ओकांनी पूर्ण केली. आजही ही चित्रे संसदेत विराजमान आहेत. पुण्याचे शिवाजी मंदिर, महाराष्ट्र मंडळ, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इत्यादी ठिकाणी त्यांनी केलेली व्यक्तिचित्रे पाहावयास मिळतात.

           पुण्याजवळील त्यांच्या मालकीची जमीन विकून आलेल्या पैशांतून त्यांनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात वार्षिक चित्रकला प्रदर्शन भरविण्यासाठी मृत्युपत्रान्वये देणगी दिली व त्यातून अखिल भारतीय प्रदर्शन भरविण्यास १९८५ पासून सुरुवात झाली. हे ‘अखिल भारतीय लोकमान्य टिळक कलाप्रदर्शन’ आजतागायत बॅरिस्टर व्ही.व्ही. ओक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरविले जाते.

           दृश्यकला क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बॅरिस्टर ओक यांचे वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी, वृद्धापकाळाने निधन झाले.

- डॉ. गोपाळ नेने

ओक, विश्वनाथ विनायक