Skip to main content
x

पानवलकर, श्रीकृष्ण दामोदर

     जिंदादिल व्यक्तिमत्त्व असणारे श्रीकृष्ण दामोदर पानवलकर हे १९६० ते १९८५ या पाव शतकातले महत्त्वाचे आणि जबरदस्त सामर्थ्याचे कथाकार होते. बेछूट, मर्दानी, देखणे व्यक्तीमत्त्व असलेल्या पानवलकरांच्या कथेतील व्यक्तिमत्त्वे ही तशीच दणकट, रांगडी आणि मर्दानी होती. त्यांची भाषा तप्त लोखंडासारखी असली, तरी त्यांतील तरल, सखोल काव्यात्मकता दुर्लक्षिता येत नाही.

      पानवलकरांचा जन्म सांगलीत, संस्थानी वातावरणात एका सुखवस्तू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील संस्थानच्या सेवेत मुलकी अधिकारी होते. त्यांचे सर्व शिक्षण सांगलीतच झाले. तेथील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिकला असताना त्यांच्या संस्कृतमधील प्राविण्यामुळे त्यांची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीसाठी शिक्षकांनी तयारी करून घेतली होती. पण त्याच वर्षी वडिलांच्या अनपेक्षित निधनामुळे त्यांचा क्रमांक दुसरा आला व ‘अकबरनवीस’ ही दुसर्‍या क्रमांकाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली.

     वडिलांच्या मृत्यूमुळे कौटुंबिक जबाबदार्‍या त्यांच्यावर येऊन पडल्या. त्यामुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागले. मामांच्या मदतीने त्यांनी छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या, नंतर ते मुंबईला कस्टम्समध्ये भरती झाले आणि तेथेच सुपरिटेंडेन्ट पदापर्यंत त्यांना बढती मिळाली. याच काळात त्यांची साहित्यनिर्मिती सुरू झाली.

     पानवलकरांनी प्रामुख्याने कथालेखन केले. मुंबईत आल्यावर त्यांची ओळख विजय तेंडुलकरांशी झाली व तिचे रूपांतर पुढे दाट मैत्रीत झाले. वसुधा, सत्यकथा, ललित, अभिरुची, हंस, किर्लोस्कर यांसारख्या दर्जेदार मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. अपरिचिताचा वेध घेणार्‍या त्यांच्या दमदार कथांचे एकूण सहा संग्रह प्रकाशित झाले. ‘गजगा’ (१९६३) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर ‘औदुंबर’ (१९६३), ‘सूर्य’ (१९६८), ‘चिनाब’ (१९७८) या कथासंग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. ‘एका नृत्याचा जन्म’ (१९७५) आणि ‘जांभूळ’ (१९८१) हे त्यांचे अन्य कथासंग्रह होत.

     या सहा संग्रहांव्यतिरिक्त विविध मासिकांतून प्रकाशित झालेल्या परंतु संग्रहित न झालेल्या १४-१५ कथा त्यांच्या नावावर आहेत. विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले पण असंग्रहित असलेले वीस लेखही त्यांनी लिहिले आहेत.

     त्यांच्या मृत्यूनंतर १९९६ मध्ये त्यांच्या लेखांचे पुस्तक ‘संजारी’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध झाले आहे. ‘खबर’ ही त्यांनी लिहिलेली एकमेव एकांकिका ‘सत्यकथा’ (फेब्रुवारी १९७१) मासिकात प्रसिद्ध झाली होती. याशिवाय ‘महंत’ आणि ‘नाना फडणवीस’ अशी दोन अप्रकाशित नाटकेही त्यांनी लिहिली आहेत.

     त्यांच्या ‘सूर्य’ कथासंग्रहातील ‘सूर्य’ कथेवर १९८३मध्ये तेंडुलकरांनी लिहिलेला ‘अर्धसत्य’ हा अत्यंत गाजलेला हिंदी चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणावर आधारित रोजनिशी स्वरूपाचे त्यांनी लिहिलेले ‘शूटिंग’ शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

     कौटुंबिक जीवनाचे सुख मात्र पानवलकरांना कधीच मिळाले नाही. भावा-बहिणींचे शिक्षण, त्यांचे विवाह यातच बराच काळ गेल्यामुळे ते शेवटपर्यंत अविवाहितच राहिले. मात्र त्यांना कौटुंबिक वातावरणाची, मुलांमध्ये रमण्याची मनस्वी हौस होती. म्हणूनच तेंडुलकर, मोमीन यांसारख्या मित्रांच्या पारिवारिक समारंभांत ते आनंदाने सहभागी होत आणि त्यात रंगून जात. सुग्रास जेवण, मुलांशी लाडाने वागणे आणि आपले सुरस चमत्कारिक अनुभव ऐकणारा हक्काचा श्रोतृवर्ग मिळणे या त्यांच्या कौटुंबिक सुखाच्या माफक अपेक्षा होत्या. मित्रांच्या घरी हक्काने जाऊन, त्यांच्या कुटुंबियांत मिसळून ते आपल्या अपेक्षा पूर्ण करून घेत. त्यांच्या अविवाहित राहण्यामुळेच कदाचित त्यांच्या अखेरच्या दिवसांत शुष्कपणा आला होता.

     चित्रमय शैलीचे दर्शन आपल्या कथांमधून घडविणार्‍या या लेखकाने तथाकथित प्रायोगिकतेपासून स्वतःला नेहमी दूर ठेवले होते. त्यांनी मोजक्याच कथा लिहिल्या परंतु त्यांची कथासृष्टी थक्क करणारी होती. ‘भाषा गोटीबंद असावी लागते, ती कमवावी लागते, नेमक्या शब्दांत तिचं वजन पकडायला लागतं’ हे त्यांचे भाषेविषयीचे विचार ते नेहमी बोलून दाखवीत. पु.भा.भावे., जी.ए.कुलकर्णी यांच्या प्रमाणेच पानवलकरांनी मराठी कथेला नवी शक्ती दिली, नवीन परिमाण दिले, मराठी कथा समृद्ध केली. त्यांना अद्भुताची भूक जात्याच होती. जसे घडले तसे दाखवणे, हे त्यांच्या अनुभवसमृद्ध लेखनाचे खास वैशिष्ट्य होते.

     कस्टम्सच्या नोकरीमुळे सर्वस्वी अकल्पित असे एक नवेच जग त्यांच्या अनुभवाच्या पट्ट्यात आले. त्या अनुभवांवर आधारित ‘कैवल्य’, ‘सर्च’, ‘बगळा’ यांसारख्या त्यांच्या कथा विशेष गाजल्या.

     त्यांचे साहित्य म्हणजे शोधाची सर्जनशील साहसयात्रा होती. मानवी जीवनातील अपरिचिताचा वेध घेत वास्तवाच्या तपशीलातून उभे राहणार्‍या पानवलकरांच्या कथा या प्रामुख्याने पुरुषांच्या कथा असल्याचे लक्षात येते. त्यांच्या कथांमध्ये स्त्रिया येतात त्या विशिष्ट काळात, त्या पुरुषांच्या आयुष्यात रस निर्माण करण्यासाठीच. पानवलकरांची निरीक्षण शक्ती, वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जाण्याची उत्सुकता, अनुभवातील कारुण्य, नाट्यमयता आणणारी जीवनशैली, विनोद व उपहास यांची पखरण या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या कथा वाचनीय व रंजक झाल्या आहेत. त्यांच्या कथेचा प्रवास म्हणजे त्यांचाच आंतरिक प्रवास होता. लेखनाची भाषा, शैली, शुद्धता यांबाबत ते अत्यंत चोखंदळ होते.

     त्यांच्या गाजलेल्या कथांपैकी विषयांचे वैविध्य असणार्‍या कथा मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. ‘वायलर’ ही टांग्याच्या घोड्याची कथा, ‘सुंदर’ ही हत्तीची कथा, ‘मोतीचूर’ ही पाखरांवरची कथा तर ‘औदुंबर’ ही संसार न मांडलेल्या व एकटेपणाचा शाप भोगत आयुष्याच्या संधिकालात पोचलेल्या नायकाची म्हणजे जणू त्यांचीच कथा. याशिवाय ‘श्रीमंतीचा वस्तरा’, ‘पुंड्डू’, ‘आडवा बोळ’, ‘उन्हाची रात्र’ या अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या कथा गाजलेल्या आहेत.

     विषयातील नाट्य हेरून, त्यांची मांडणी करताना तपशिलाचा, शब्दाशब्दांचा प्रपंच कसा करावा, आरंभ-अंत कसे रचावेत, व्यक्तिरेखेगणिक संवादाचे पोत कसे बदलावेत, या सर्वांचे भान राखीत त्यांचे कथालेखन झाले होते. अस्सल, जीवनरसाने रसरसलेल्या, मातीचा वास असलेल्या व्यक्तिरेखांना आपल्या कथांच्या केंद्रस्थानी ठेवून चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले पानवलकर म्हणजे प्रसिद्धी, बक्षिसे यांच्या मागे कधीच न लागलेला एक आत्ममग्न हळवा माणूस आणि आगळा लेखक होता हे नाकारताच येणार नाही.

     ‘सूर्य’ या कथेवर आधारलेल्या ‘अर्धसत्य’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले. त्याचप्रमाणे ‘सारिका’ या हिंदी मासिकातर्फे १९८२मध्ये सर्वभाषिक कथा-स्पर्धेत त्यांच्या कथेला दुसरे पारितोषिक मिळाले.

- सविता टांकसाळे

पानवलकर, श्रीकृष्ण दामोदर