Skip to main content
x

पारगावकर, दामोदर रंगराव

          दामोदर रंगराव पारगावकर यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. पारगावकर कुटुंब हे सुखवस्तू व सुसंस्कृत घराणे म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. रंगराव पारगावकर हे शेती व व्यापार व्यवसायात अग्रगण्य होते. त्यांचे शिक्षण हैदराबाद येेथे झाले. त्यांनी १९५८मध्ये उस्मानिया विद्यापीठाची पशु-विज्ञानशास्त्रातील बी.व्ही.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्या वेळी ते नुकत्याच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यातील पशुविज्ञान खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. ते १९६४मध्ये नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात व्याखाता म्हणून रुजू झाले. तेथेच डॉ.कैकिणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम.व्ही.एस्सी. ही प्राप्त केली. त्यानंतर त्यांना साहाय्यक प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. त्यांना संशोधन करण्याची इच्छा होती. त्यांना १९७०मध्ये तशी विशेष संधी मिळाली. स्वीडन येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. ते प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी एफ.आर.व्ही.सी.एस. ही सन्माननीय पदवी प्राप्त केली. स्वीडनमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पशु-संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, इंग्लंड आदी प्रगत राष्ट्रांना भेटी देऊन तेथील पशु-संवर्धनाचे कार्य अभ्यासले. स्वीडनहून परत आल्यावर त्यांना पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून बढती मिळाली व ते अकोला येथील डॉ. पं.दे.कृ.वि.त रुजू झाले.

          मराठवाडा कृषी विद्यापीठाची परभणी येथे १९७२मध्ये स्थापना झाल्यावर पशुविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. देशी गायीच्या प्रजननाच्या वेगवेगळ्या अवस्थांबाबत त्यांनी संशोधन करण्याचे ठरवले. पशु-प्रजननशास्त्रात डॉ.कैकिणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशी गायीच्या शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण काय असते व प्रजननकाळात ते कसे बदलत जाते याचा अभ्यास केला. त्यांच्या या संशोधनाची तज्ज्ञांनी प्रशंसा केली व अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.ने त्यांना पीएच.डी. ही पदवी दिली. त्यानंतर शासनानेही त्यांची विभागप्रमुख म्हणून नेमणूक केली. तेथे त्यांनी पदव्युत्तर व पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          राष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठीही त्यांनी दीर्घ काळ कार्य केले. इंडियन सोसायटी फॉर अ‍ॅनिमल रिप्रॉडक्शन (हिस्सार) या संस्थेचे ते सहा वर्षे सचिव म्हणून कार्यरत होते. विशेषतः पशुवंध्यत्व निवारणाविषयी त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. त्यांनी अनेक शिबिरे आयोजित करून  गाई-म्हशींची तपासणी व रोगनिदान केले. डॉ.पारगावकर यांचे संशोधन वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांचे १४६ शोधनिबंध प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र व परिषदांमध्ये सक्रिय भाग घेतला. शैक्षणिक साहित्यनिर्मितीतही त्यांनी विशेष सहभाग घेतला. पशुवैद्यक अभ्यासक्रम आदर्श असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशा पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. त्यांनी आकाशवाणीवर पशुविज्ञानासंदर्भात अनेक व्याख्याने दिली. त्यांनी भरवलेल्या पशुप्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल दिल्ली येथील राष्ट्रीय पशुधन समितीमार्फत त्यांना १९६४मध्ये रौप्यपदक मिळाले. त्यांच्या उत्तम निबंधाला प्रा.लॅगरलॉफ रौप्यपदक १९७८मध्ये चेन्नई येथील समारंभात दिले. तसेच त्यांना १९८०मध्ये आय.एस.एस.ए.आर. या संस्थेमार्फत संशोधनासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी पशु-संवर्धनाचे कार्य हिरिरीने केले. त्यांनी मराठवाडा विभागासाठी पशु-संवर्धन व दुग्धविकासविषयक पंचवार्षिक आराखडा तयार केला व तो महाराष्ट्र शासनास सादर केला. तसेच मराठवाड्याच्या पशु-संवर्धन व दुग्धविकास यासंबंधीच्या असमतोलाबद्दल त्यांनी अहवाल तयार करून विभागीय असमतोल अभ्यासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या केळकर समितीला सादर केला.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

पारगावकर, दामोदर रंगराव