Skip to main content
x

पार्सेकर, श्रीधर

         व्हायोलिन वाद्यावर विलक्षण हुकूमत असणारा हनहुन्नरी कलाकार म्हणून श्रीधर पार्सेकर यांचे नाव घेतले जाते. पार्सेकर हे मूळचे गोव्यातील पेडणे महालातील रहिवासी व त्यांचा जन्म पार्से गावी झाला. मामा परशुरामबुवा पार्सेकर यांच्याकडून संगीताचे आरंभीचे धडे घेतलेल्या पार्सेकरांनी बालवयातच गायन, तसेच तबला, हार्मोनिअम, जलतरंग या वाद्यांच्या वादनात प्राविण्य मिळवले. अकराव्या वर्षी गोव्यातील बॅन्डमध्ये ते क्लॅरिनेटही वाजवू लागले, संगीत नाटके व कीर्तनांसाठी ते पायपेटीची साथ करू लागले. या सावळ्या वर्णाच्या तरतरीत मुलाचे हे वादन बार्देस महालात नावाजले जाऊ लागले.
          संगीताची अधिक सखोल आराधना करण्याचे स्वप्न घेऊन पार्सेकर चौदाव्या वर्षी मुंबईत आले व त्यांनी आपला मित्र, हार्मोनिअम वादक मधुकर पेडणेकर यांच्या बरोबरीने जबरदस्त रियाज सुरु केला. त्या काळात पं. गजाननबुवा जोशींचे मुंबईत संगीत विद्यालय होते. तेथील व्हायोलिनच्या स्वरांनी पार्सेकरांवर मोहिनी घातली व त्यांनी १९३४ ते १९३७ या काळात गजाननबुवांकडून व्हायोलिनवादनाचे धडे घेतले. आग्रा व अत्रौली घराण्याच्या खादीम हुसेन खां, नथ्थन खां, अन्वर हुसेन खां व रत्नकांत रामनाथकर यांचेकडून गायनाचीही तालीम घेतली. या सुमारास संगीत दिग्दर्शक अण्णासाहेब माईणकर यांच्याकडे मधुकर पेडणेकर हे साहाय्यक म्हणून काम करीत, त्यामुळे पेडणेकरांनी चित्रगीतांच्या ध्वनिमुद्रणांत व्हायोलिनवादक म्हणून पार्सेकरांना पाचारण केले. त्यामुळे उमेदवारीच्या काळात पार्सेकरांना चित्रपटांच्या वाद्यवृंदाचा अनुभव मिळाला.
      रामनाथकरांच्या सूचनेनुसार पार्सेकरांनी मुंबई आकाशवाणीमध्ये व्हायोलिनवादक म्हणून सहा वर्षे (१९३७ ते १९४२) नोकरी केली. आकाशवाणीवर दिनकर अमेंबल यांच्या वाद्यवृंदासाठी त्यांनी वादन केले, तसेच अमेंबलांसह बासरी-व्हायोलिन जुगलबंदीही केली. एकल प्रस्तुती व साथसंगत या दोन्हींत त्यांचे सारखेच प्राविण्य होते. गायनाचार्य वझेबुवा, मास्तर कृष्णराव, मास्तर दीनानाथ, ओंकारनाथ ठाकुर, फैयाज खां, विलायत खां अशा अनेक गवैयांना त्यांनी तोडीस तोड अशी साथसंगत केली. मात्र हा मनस्वी, अजातशत्रू कलावंत कोणत्याच नोकरीत टिकेल अशा स्वभावाचा नव्हता. पुढे नोकरी व साथ करणे सोडून त्यांनी एकलवादनाच्या मैफली गाजवल्या.
         व्हायोलिन या विदेशी वाद्यावर भारतीय संगीत वाजवण्यासाठी पार्सेकरांनी आपल्या गुरुंप्रमाणेच अत्यंत परिश्रम घेतले व त्यावर कमालीची हुकूमत मिळवली. व्हायोलिन वादनाचे तंत्र व माधुर्य या बाबतीत पार्सेकर आपल्या गुरूंच्याही पुढे गेले व त्यांनी आपली आगळीवेगळी शैली निर्माण केली. डाव्या हाताच्या अंगुलीचालनाबरोबरच उजव्या हाताचे गजकामही ते फार सफाईने करत. सतार, सरोद, शहनाई इ. वाद्यांच्या वादनतंत्रातील खासियती त्यांनी आपल्या व्हायोलिन वादनात आणल्या. आलापचारी करताना सलगपणा, मींडकामातील नजाकत, तानेतील चापल्य आणि लयकारीतील पक्केपणा, चमकदारपणा हे विशेष गुण त्यांच्या वादनात दिसत. लयतालावर जबरदस्त पकड असल्याने ते तिहायांचे अनेक प्रकार वाजवत, मात्र लयकारी करतानाही त्यांचे वादन अत्यंत सुरेल असे. सौम्यपणा व आक्रमकता यांचा अजब खेळ त्यांच्या वादनात असे. मल्हार, दरबारी कानडा, जोगकंस, अहीरभैरव, पूरियाकल्याण असे मींडप्रधान, गंभीर राग ते भारदस्तपणे वाजवत; तर ठुमरी, धुना वाजवताना पंजाबी ढंगाच्या खटका-मुरक्यांनी ते नखरेलपणा निर्माण करत. व्हायोलिन या वाद्यास सतारीप्रमाणे गुंजन नाही व चिकारीची तार नसल्याने स्वरावकाश भरण्याची सोयही नाही, म्हणून पार्सेकरांनी डाव्या हाताच्या करंगळीने व्हायोलिनची तारषड्जात जुळवलेली चौथी तार स्वरवाक्यांच्या दरम्यान वाजवणे सुरू केले. हे तंत्र इतके रूढ झाले की पुढे अनेक व्हायोलिनवादकांनी ही लकब अंगिकारली व आजही ती प्रचलित आहे. पं. रविशंकर, विलायत खां यांसारख्या सतारवादकांबरोबर जुगलबंदी करतानाही त्यांनी आपल्या वादनाचा वेगळा ठसा उमटवला. पार्सेकरांनी त्या काळात एकल व्हायोलिन वादक म्हणून भारतभर कीर्ति मिळवली. स्वरनिनाद (१९४८) हे व्हायोलिनविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले होते.
      नाटक व चित्रपटांचे संगीतकार म्हणून पार्सेकरांनी १९४०-५०च्या दशकांत आपला ठसा उमटवला. भक्त दामाजी (१९४२), पैसा बोलतो आहे (१९४३), कुबेर (केशवराव भोळे यांच्यासह, १९४७), भाग्यरेखा (१९४८), सोन्याची लंका (१९५०), मर्द मराठा (१९५०), वाकडं पाऊल (१९५६) या सात चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांनी स्वरबद्ध केलेले ‘भक्त दामाजीतील’ ‘विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी’ हे भजन लोकप्रिय झाले व ते दिंडीतही म्हटले जाई. नाटककार मो. ग. रांगणेकरांच्या नाटयनिकेतन संस्थेसाठी कन्यादान (१९४३), माझे घर (१९४५), माहेर (१९५१), रंभा (१९५२), वहिनी, अपूर्व बंगाल, जयजयकार (१९५३), अर्ध्या वाटेवर (कोरगावकरांसह, १९५५), हिमालयाची बायको (१९६२) या नऊ नाटकांना त्यांनी संगीतसाज चढवला. ’वहिनी’तील पु.ल.देशपांडेंनी गायलेली ‘पाखरा जा’ व ‘ललना कुसुम कोमला’ ही पदे गाजली होती. एच्.एम्.व्ही. कंपनीसाठी त्यांनी भावगीतेही स्वरबद्ध केली व हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, वत्सला कुमठेकर, लोंढे, कृष्णराव चोणकर अशा कलाकारांच्या आवाजात ती ध्वनिमुद्रित झाली.
       अखेरच्या काळात पार्सेकरांना दारूचे व्यसन लागले आणि यात त्यांच्या आयुष्याचा व कलेचाही र्‍हास झाला. अनेक चाहत्यांनी त्यांना सावरण्यासाठी मदत केली, मात्र ते या व्यसनातून कधीच वर येऊ शकले नाहीत. एकेकाळी उदंड मान व धनही मिळवून, त्या काळात स्वतःच्या कारमधून रुबाबात फिरणारा हा कलावंत अक्षरशः रस्त्यावर आला. त्यांचा दुर्दैवी अंत मुंबईत झाला.
     व्हायोलिन वादनातील खास ‘पार्सेकर शैली’चा प्रभाव पुढील अनेक वादकांवर झाला. पुष्पलता कुलकर्णी, व्ही. के. प्रधान, मो. रा. गोडबोले, अनंतराव फाटक, पांडुरंग शिवलकर, उकिडवे असे काही शिष्य पार्सेकरांनी तयार केले. व्ही. जी. जोगांवर पार्सेकरांचा प्रभाव होता. शिवाय मुंबईचे बळवंत गोठस्कर, पुण्याचे बा. शं. उपाध्ये, दफ्तरदार, नागपुरचे विष्णूपंत कावळे, तळेगावचे शशिकांत शेटये (प्रथम मुंबई व नंतर बडोदे आकाशवाणी) अशांनी पार्सेकरांना आदर्श मानले.

चैतन्य कुंटे

पार्सेकर, श्रीधर