Skip to main content
x

पाटील, नारायण ज्ञानदेव

एन. डी. पाटील

     नारायण ज्ञानदेव पाटील उर्फ एन.डीं. चा जन्म ढवळी (नागाव), जि. सांगली या खेडेगावात शेतकरी कुटुंबात झाला. घरी शिक्षणाचे वातावरण नव्हते, तरीही प्रतिकूल परिस्थितीत एम.ए. (अर्थशास्त्र) व एलएल.बी. (पुणे विद्यापीठ) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:ला शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य केले आहे. एन.डी. पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे केली. अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनाबरोबरच त्यांना कमवा व शिका या योजनेचे कामकाज पाहावे लागत असे.

      याशिवाय वसतिगृहाचे अधिकारी म्हणूनही ते काम करीत होते. वसतिगृहात राहणाऱ्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना सातत्याने आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे त्यांना भोजनशुल्क वेळेवर भरणे शक्य होत नसे. ठराविक कालावधीनंतर भोजन शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे भोजन बंद होत असे. त्यावेळी अधिकारी या नात्याने एन.डी. हे स्वत:ही जेवण घेत नसत. त्यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

       इस्लामपूर हे वाळवे तालुक्यातील सर्वात मोठे गाव. सदर गावात ग्रामीण भागातून व परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण सुलभतेने प्राप्त व्हावे यासाठी एन.डीं.नी. पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन ‘महात्मा फुले शिक्षण संस्थे’ची स्थापना केली व माध्यमिक विद्यालय सुरू केले.

      कालांतराने महाविद्यालयाची आवश्यकता भासू लागली. या कालावधीत एन.डी. कर्मवीर अण्णांना भेटण्यास गेले असता चर्चेच्या ओघात अण्णांनी एन. डीं. ना. सूचित केले की, इस्लामपूरसारख्या नगरपालिका असणाऱ्या व तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात महाविद्यालय शिक्षणाची सोय व्हावी यासाठी तू प्रयत्न करावेस. अण्णांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एन.डीं. नी राजकीय विरोधाला न जुमानता महात्मा फुले शिक्षण संस्थेद्वारा पुणे विद्यापीठाकडून परवानगी घेऊन महाविद्यालय सुरू केले. सदर महाविद्यालयास कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव देऊन प्रारंभीच्या काळात सदर महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले. याच संस्थेद्वारा कालांतराने होमिओपॅथीचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करून परिसरातील विद्यार्थ्यांची सोय केली.

      महाराष्ट्र शासनाने विनाअनुदान तत्त्वाचा स्वीकार केल्याने ठिकठिकाणी आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी व होमिओपॅथीचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू झाली. प्रवेशासाठी लाखो रुपयांच्या देणग्या घेण्याची प्रथा सुरू झाली. आपण या स्पर्धेत न उतरणेच चांगले हे त्यांनी सहकाऱ्यांना पटवून दिले व होमिओपॅथीक महाविद्यालय बंद केले.

      शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोल्हापूर येथे झाल्यावर एन.डीं.ची निवड या विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून करण्यात आली (१९६२). त्यानंतर त्यांनी सदस्य म्हणून काही काळ काम केले (१९६५). कार्यकारिणी सदस्य म्हणून १९६२ ते ७८ या कालावधीत काम केले तसेच सामाजिक शास्त्र विभागाचे अधिष्ठाता म्हणून (१९७६ ते ७८) एन. डी. पाटील कार्यरत होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून या विद्यापीठाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यात एन.डीं. चे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

      कर्मवीर अण्णा १९५९ मध्ये ससून रुग्णालयामध्ये राहून उपचार घेत होते. त्यावेळी त्यांनी एन.डीं.ना पुणे येथे बोलावून घेतले व संस्थेच्या विकासासाठी काम करणे कसे आवश्यक आहे या संदर्भात चर्चा केली. चर्चेनंतर कर्मवीरांनी एन.डीं. ना कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व स्वीकारून संस्थेचे कार्य गतिमान राहावे यासाठी कार्यरत राहण्यास सांगितले.

      कर्मवीर अण्णांच्या सूचनेनुसार कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व स्वीकारून आजतागायत एन.डी. संस्थेच्या कार्यात लक्ष घालत आहेत. १९६९ पासून ते संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही काम करीत आहेत. एक अभ्यासू व कृतिशील सदस्य म्हणून ते ओळखले जातात.

     १९९० ते २००८ या कालावधीत कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी संस्थेस आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी दुर्बल शाखा निधीची स्थापना, काटकसरीच्या धोरणांचा स्वीकार, कृतज्ञता निधीस प्रारंभ आदी उपाययोजनांचा अवलंब केला आहे. माध्यमिक शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी रात्र व दिवस अभ्यासिकांची सोय, शिक्षक प्रशिक्षण, आश्रमशाळा अद्ययावत करणे आदी उपक्रम कार्यवाहीत आणले आहेत.

     अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन कोट्यामधून भरल्या जाणार्‍या सर्व जागा फीशिवाय एकही पैसा जादा न घेता गुणवत्तेच्या आधारेच भरण्याचा धोरणात्मक निर्णय कार्यवाहीत आणला आहे. ५ वी ते ७ वी या माध्यमिक शाळांना जोडून असणार्‍या वर्गांसाठी डी.एड. शिक्षकच असावेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्या जागा भरताना १२ वी व डी.एड. च्या परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची सरासरी काढून त्या उमेदवारांना मुलाखत न घेता गुणवत्तेच्या आधारेच संस्थेत नियुक्त करण्याचे धोरण त्यांनी कार्यवाहीत आणले आहे.

      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य या नात्याने १ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. १९६५-६६ मध्ये  महाराष्ट्र शासनाने शिक्षणाची पुनर्रचना व्हावी यासाठी धोरण आखण्याचे ठरवून त्या संदर्भात श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती.

     या धोरणात प्रगत व अप्रगत असे अभ्यासक्रमाचे दोन स्तर निश्‍चित करण्यात आले होते. या धोरणामुळे अप्रगत स्तरातील अभ्यासक्रम पूर्ण करून दहावी परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांना महाविद्यालयीन प्रवेशाची कवाडे खुली राहणार नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होण्याची शक्यता होती. हे ओळखून ‘शासकीय धोरण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हितास बाधक ठरणारे आहे. त्यामुळे त्याची कार्यवाही होता कामा नये’ ही भूमिका एन. डी. पाटील यांनी ठामपणे जनतेसमोर मांडण्याचे ठरवले.

    सर्वांना समान अभ्यासक्रम असावा हे उद्दिष्ट समोर ठेवून एन.डीं.नी महाराष्ट्रभर जनजागृती मोहीम हाती घेतली व संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

     महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेतील लोक प्रतिनिधींना संबोधून एन. डी. पाटील यांनी शासनाच्या धोरणातील फोलपणा समजावून दिला व सर्वांना समान अभ्यासक्रम असावा म्हणजे सर्वजण आपापल्या कुवतीनुसार आपली प्रगती करू शकतील, हे तत्त्व त्यांच्या गळी उतरवले. जनमताच्या या रेट्यामुळे शासनास श्‍वेतपत्रिका मागे घेणे भाग पडले व विद्यार्थ्यांमध्ये संभाव्य भेदभाव आपोआपच नाहीसा झाला.

    दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था बेळगाव या सभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी मार्गदर्शन करून त्या संस्थेस सीमा भागातील शिक्षण प्रसारासाठी प्रयत्नशील ठेवले आहे.

     शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ते १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून ते आजही काम पाहतात. सहकार मंत्री म्हणून १९७८-८० या दोन वर्षांत सहकार क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.

     १९८५-१९९० या पाच वर्षांत ते विधानसभा सदस्य होते. लोकशाही आघाडीचे निमंत्रक- १९९९ ते २००२, महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्‍न समिती सदस्य, सीमाप्रश्‍न चळवळीचे नेते, अध्यक्ष- अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, उपाध्यक्ष- समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी, जागतिकीकरण विरोधी कृती समिती (मुख्य निमंत्रक) या भूमिकाही त्यांनी यशस्वीपणे साकारल्या आहेत.

       त्यांच्या शिक्षण व इतर क्षेत्रातील कामामुळे त्यांना भाई माधवराव बागुल पुरस्कार मिळाला. तसेच नांदेडच्या स्वामी रामानंदनतीर्थ विद्यापीठाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने आणि शिवाजी विद्यापीठाने एन. डी. पाटील यांना डी. लिट ही पदवीही त्यांना प्रदान केली.

       - प्रा. वसंत रोकडे

पाटील, नारायण ज्ञानदेव