Skip to main content
x

पाटणकर, भालचंद्र लक्ष्मण

भालचंद्र लक्ष्मण तथा मामा पाटणकरांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही तेथेच झाले. मुंबईमध्ये त्यांनी एम.ए. पदवी मिळविली व गोखले एज्युकेशन सोसायटीत ते प्राध्यापक म्हणून दाखल झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हंसराज प्रागजी ठाकरसी म्हणजे एच.पी. टी महाविद्यालयाची स्थापना प्राचार्य टी.ए. कुलकर्णी यांनी १९२४ मध्ये नाशिक येथे केली  होती. प्रा. भा. ल. पाटणकर हे त्यांचे प्रारंभापासूनचे विश्‍वासू सहकारी व उपप्राचार्य होते. इंग्रजी हा पाटणकरांचा अध्यापनाचा विषय. ते इंग्रजी साहित्य शिकवीत. शेक्सपीयरची नाटके तर ते साभिनय शिकवीत. मुंबई विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. पुणे विद्यापीठाच्या संस्थापनेचे ते साक्षीदार होते.

पाटणकर प्रारंभापासून ते महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारीपर्यंत नाशिकच्या पगडबंद लेनमध्ये राहत होते. १९ जानेवारी १९३० रोजी नाशिकच्या वाङ्मय विहार मंडळाने’ ‘माधवीहा नाशिकमधील कवींच्या स्फुट कवितांचा संग्रह प्रसिद्ध केला. पाटणकर त्यावेळी या मंडळाचे चिटणीस होते व संपादनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या संग्रहात रा. श्री. जोग, ह.भ.प. ल. रा. पांगारकर, लक्ष्मीबाई टिळक, कुसुमाग्रज या पुढे विख्यात झालेल्या कवींच्या कविता होत्या. 

१० जानेवारी १९४० रोजी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा शताब्दी महोत्सव स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यावेळी पाटणकर वाचनालयाचे अध्यक्ष होते.

१९४२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यात पाटणकरांचा वाटा होता. लोकहितवादी मंडळाची १९५० मध्ये स्थापना होण्यापूर्वी पाटणकरांनी नाशिकमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा काही वर्षे चालविली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारताच त्यांनी महाविद्यालयाची विज्ञान शाखा सुरू केली व नाशिकच्या शिक्षण संस्कृतीला नवा आयाम दिला. पाटणकर महाविद्यालयाचे प्राचार्य असताना शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अपुरे राहिले नाही. ज्या विद्यार्थ्यांजवळ  पैसे नसत त्यांचे  शुल्क ते स्वत: भरत. निवृत्त झाल्यावर त्यांनी नाशिक शहरात महिलांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाचे वर्ग जिज्ञासा महाविद्यालयया नावाने गावात सुरू केले. हे वर्ग संध्याकाळी भरत. नोकरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या व संसार करणाऱ्या स्त्रियांना शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ होती. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना पाटणकरांनी महाविद्यालयात विनावेतन काम करावयास लावले व त्यांच्यावरील प्रेमाने सर्वांनी त्यांना सहकार्य केले.

शिक्षणाचे महत्त्व जाणून याच महाविद्यालयात महिलांना संगीत, चित्रकला, नृत्यकला अशा विषयांचे मार्गदर्शन तर मिळावेच, पण शिवणकाम, भरतकाम, लघुउद्योग या संसार सांभाळून उपजीविकेसाठी करता येणाऱ्या कार्याचे शिक्षण मिळावे ही त्यांची तळमळ होती. मात्र त्यांच्या पत्नी विनोदाचार्य श्री. कृ. कोल्हटकर ह्यांच्या कन्या कमलाबाई व स्वत: पाटणकर यांच्या आजारामुळे नाशिक सोडून त्यांना मुंबईस त्यांचे चिरंजीव प्रख्यात समीक्षक डॉ. रा. भा. पाटणकर यांच्याकडे जावे लागले.  विविध कार्यानुभवाच्या शिक्षणाची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.

- प्रा. सुहासिनी पटेल

पाटणकर, भालचंद्र लक्ष्मण