Skip to main content
x

पाटसकर, हरिभाऊ विनायक

       रिभाऊ विनायक पाटसकर यांचा जन्म इंदापूर येथे झाला. बी.ए. आणि एलएल.बी. या पदव्या मिळवल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९२०मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले. १९२६मध्ये ते तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. १९३७ ते १९३९ आणि नंतर पुन्हा १९४५ ते १९५२ पर्यंत ते मुंबई विधानसभेचे सदस्य होते. १९५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. १९५५ ते १९५७ पर्यंत ते केंद्रीय कायदामंत्री होते. कायदामंत्री या नात्याने हिंदू संहितेच्या (हिंदू कोड) चार विधेयकांचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी संचालन केले आणि चारही विधेयके संमत होऊन त्यांचे कायद्यात रूपांतर झाले. आंध्र प्रदेश आणि मद्रास (आताचे तमिळनाडू) या राज्यांमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. हा तोडगा काढण्यासाठी त्यांनी चार सूत्रे सांगितली आणि तो वाद सामोपचाराने सोडविला. ही चार सूत्रे ‘पाटसकर सूत्रे’ (पाटसकर फॉर्म्युला) म्हणून ओळखली जातात. खेडे हा घटक धरून पण भौगोलिक सलगता कायम राखून, त्याचप्रमाणे भाषिक बहुमताचा विचार करून आणि स्थानिक जनतेच्या इच्छेनुरूप राज्यांमधील सीमा ठरवावी, ही ती चार सुत्रे होत.

      जून १९५७ ते फेब्रुवारी १९६५ या काळात पाटसकर मध्य प्रदेशचे राज्यपाल होते. दोन वर्षांनंतर, म्हणजे १९६७मध्ये ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९६३मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ हा सन्मान मिळाला.

त्यांचे निधन त्यांच्या कार्यालयातच झाले.         

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१.      http://www.rajbhavanmp.ind.in
पाटसकर, हरिभाऊ विनायक