Skip to main content
x

प्रभुणे, सविता अरुण

     हिंदी चित्रपटांमध्ये आणि दूरदर्शन मालिकांमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या मराठमोळ्या सविता प्रभुणे या अभिनेत्रीचा जन्म सातारा जिल्ह्यात वाई या निसर्गरम्य छोट्याशा गावात झाला. तेथील कन्याशाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, तर इंग्लिश विषयातील कला शाखेची पदवी घेतल्यानंतर आईवडिलांच्या प्रोत्साहनाने दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या प्रतिष्ठित संस्थेमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.

     सविता प्रभुणे अभिनेत्री म्हणून स्वत:ला अजमावून पाहाण्यासाठी ‘मुंबई’ या चित्रपटसृष्टीच्या कर्मभूमीमध्ये दाखल झाल्या. ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकापासून त्यांची अभिनय क्षेत्रातली घोडदौड सुरू झाली. त्यानंतर ‘निष्पाप’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘षड्यंत्र’, अशा निरनिराळ्या आशयाच्या नाटकांतून वैविध्यपूर्ण भूमिकांना न्याय देत रंगभूमीवरचा त्यांचा प्रवास सुरू झाला. या नाट्यप्रवासात एन.एस.डी.मधील अभिनयाचे संस्कार आणि एकूणच ‘नाट्य’ या विषयातील उपजत असलेली समज यांमुळे ‘सविता प्रभुणे’ हे नाव सुपरिचित झाले. रंगभूमीवर नाव मिळाल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून ‘चित्रपट’ या माध्यमाची शक्यताही स्वाभाविकपणे तपासून घेण्यासाठी त्यांना सहजपणे संधी उपलब्ध झाली. अण्णासाहेब देऊळगावकर या अनुभवी चित्रपट लेखक-दिग्दर्शकाच्या ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटात सहनायिकेची भूमिका त्यांना मिळाली. ‘हुंडा’ या विषयावर बेतलेल्या या चित्रपटात कजाग आईला विरोध करणारी मुलगी सविता प्रभुणे यांनी साकारली. या पहिल्याच चित्रपटात शशिकला, अलका कुबल, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा नामांकित सहकलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला आणि चित्रपट या माध्यमाची जवळून ओळख झाली. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला.

     ‘धाकटी सून’ या चित्रपटात शरद तळवळकर यांच्या धाकट्या सुनेची भूमिका साकारत सोशिक, सात्त्विक, मेहनती, स्वाभिमानी आणि कणखर अशी सुनेची रूपे आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी साकारली. ‘खरा वारसदार’, ‘लपंडाव’, ‘कुलदीपक’, ‘वहिनीसाहेब’, ‘कर्तव्य’ अशा चित्रपटांत गंभीर आणि जबाबदार व्यक्तिरेखा करत असतानाच वेगळ्या धर्तीच्या, विनोदी शैलीच्या भूमिका त्यांनी लीलया केल्या. ‘गडबड घोटाळा’, ‘मामला पोरींचा’, ‘फेकाफेकी’ या चित्रपटांतल्या हलक्याफुलक्या अभिनयाने सविता प्रभुणे यांचे वेगळेपण अधोरेखित झाले.

     सविता प्रभुणे यांची सर्वाधिक लक्षणीय भूमिका ठरली, ती ‘कळत-नकळत’ या चित्रपटातील नायिकेची. पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कल्पना आल्यानंतर स्वतंत्रपणे आयुष्याची वाट निवडणाऱ्या, स्वत्व जपणाऱ्या पत्नीची भूमिका त्यांनी अतिशय समरसतेने केली. या चित्रपटात विक्रम गोखले, अश्‍विनी भावे, अशोक सराफ अशा कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटासाठी सविता प्रभुणे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटांबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटांतही चरित्र भूमिका सहजपणे साकारल्या. लाघवी चेहरा, मोहक सौंदर्य, भाषेची व अभिनयाची परिपूर्ण जाण असलेल्या या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटातही भाषेची अडचण आली नाही. माधुरी दीक्षितच्या ‘अबोध’ या पहिल्या चित्रपटात सविता प्रभुणे यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती. याशिवाय ‘फिलहाल’ चित्रपटात सुश्मिता सेन या अभिनेत्रीच्या आईची भूमिका, ‘तेरे नाम’ या चित्रपटातही सलमान खान यांच्या आईची भूमिका साकारली.

     सविता प्रभुणे यांनी ‘बाके-बिहारी’ (भोजपुरी), ‘सती’, ‘जी वृंदावन कॉलनी’ (तमिळ-तेलगू) या चित्रपटांतही भूमिका केल्या. दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या कलाकारांपैकी त्या एक आहेत. ‘बंदिनी’, ‘घरोघरी’, ‘अधिकार’, ‘ऊन पाऊस’, ‘भांडा सौख्यभरे’ या मराठी मालिका आणि आघाडीच्या आणि प्रतिष्ठित निर्मिती संस्थांच्या हिंदी मालिकाही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘इतिहास’, ‘फुलवंती’, ‘कोशिश - एक आशा’, ‘साया’ या मालिकांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या आहेत. 2००९ साली सुलोचना करंजकर ही भूमिका त्यांनी 'पवित्र रिश्ता' मालिकेत साकारली. मालिकेतल्या अर्चना या पात्राच्या आईच्या भूमिकेमुळे त्या देशभर हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोचल्या. २०१८ मध्ये झी टीव्हीवर 'तुझसे हे राबता' या मालिकेतही त्यांनी अहिल्या देशमुख ही भूमिका साकारली. तर २०१९ मध्ये स्टार प्रवाह वाहिनवरील 'साथ दे तू मला' या मालिकेतही त्यांनी काम केलं.  

     आपल्या अभिनयकलेवर अपार निष्ठा ठेवत या क्षेत्रातील सविता प्रभुणे यांची वाटचाल आजही सुरू आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘निष्पाप’ या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकासाठी ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार व ‘तिची कथा वेगळी’ या नाटकासाठी ‘नाट्यनिर्माता संघाचा पुरस्कार’ मिळाला. आजही त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.

- नेहा वैशंपायन

प्रभुणे, सविता अरुण