Skip to main content
x

परिचारक, सुधाकर रामचंद्र

सुधाकर रामचंद्र परिचारक यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उमादेवी होते. सुधाकर यांना काका दिवाण बहादुर परिचारक यांच्याकडून समाजसेवेचावारसामिळाला. त्यांचे पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयात मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी खडतर ब्रह्मचर्य व्रत पाळण्याचा संकल्प करून जनसामान्यांचा संसार आपला मानून प्रत्यक्ष कृतीने सर्वांना प्रचिती दिली. सत्ता व पदे ही जनतेच्या जीवावर जनतेमुळेच प्राप्त होतात, त्यांचा उपयोग जनतेच्या विकासासाठी व उद्धारासाठीच करणे महत्त्वाचे आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सहकार क्षेत्रातील विकासात अनन्यसाधारण काम केले. त्यांनी सचोटी व निष्ठेने साखर कारखाने व सहकारी तत्त्वावरील बँकांची प्रगती केली. त्यांनी मोडकळीस व डबघाईस आलेल्या अनेक सहकारी संस्था पुनर्जिवित केल्या.

पंढरपुरात 1958 मध्ये झालेल्या आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदय संमेलनापासून परिचारक यांच्या समाजसेवेचा आरंभ झाला. त्यांनी या संमेलनात स्वयंसेवक म्हणून काम केले. यानंतरच्या काळात त्यांनी मित्रमंडळी, परिचित यांचे संघटन केले. त्यांनी उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय म्हणून पत्करला,  तसेच कापड दुकानही चालवून बघितले. परंतु समाजसेवेच्या ध्यासामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले.

परिचारक यांनी जनसेवेचा प्रारंभ 1967 मध्ये पंढरपूर पंचायत सदस्य व उपसभापती म्हणून केला. ते 1972 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी 1976 ते 1989 पर्यंत पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक मर्या. पंढरपूरचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी पंढरपूर अर्बन बँकेच्या लाभार्थींमध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेतला. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यांसारख्या शेतीपूरक जोडधंद्यासाठी बँकेने प्रथमच कर्ज उपलब्ध करून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्र संघटनेने 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे केले. यावर्षी परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर अर्बन को-ऑ. बँकेने पंढरपूर येथे महिला कर्मचार्‍यांची स्वतंत्र शाखा सुरू केली. त्यांच्याकडे 1976 पासून पंढरपूर अर्बन बँकेचे नेतृत्व असून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. या बँकेने 2011-2012 मध्ये आपले शतकपूर्ती वर्ष साजरे केले.

परिचारक यांनी 1978 मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादितचे प्रतिष्ठेचे मानले जाणारे अध्यक्षपद पहिल्यांदा भूषविले. त्यानंतर त्यांनी 1998 ते 2005 पर्यंत ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील टाळली सिकंदर येथील भिमा सहकारी साखर कारखाना राज्यशासन 1986-1987 मध्ये दिवाळखोरीत काढणार होते. तथापि, शेवटचा प्रयत्न म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी परिचारक यांच्या अधिपत्याखाली प्रशासकीय मंडळ नियुक्त करून त्यांना कारखाना चालविण्यास सांगितले. यावेळी कारखान्याचा रु.14 कोटी इतका संचित तोटा होता. तर कारखान्यास नक्त मूल्य उणे रु. 10 कोटी 80 लाख होते. या साखर कारखान्याला त्यांनी कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला. कारखान्यामार्फत पथदर्शक संकल्पना राबवून अधिक उत्पादन देणार्‍या व साखरेचा अधिक उतारा असणार्‍या ऊसाची लागवड करण्यास शेतकर्‍यांना प्रवृत्त केले. ऊस गाळप क्षमता 1250 मेट्रिक टनावरून 2500 मेट्रिक टनापर्यंत वाढविली. यामुळे पूर्वीच्या तुलनेत साखर कारखान्याची उत्पादन क्षमता वाढली. काटकसरीच्या अनेक उपाययोजना करत मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांनी कारखान्यावरील सर्व प्रकारच्या कर्जाची परतफेड केली. हे करत असताना सभासद शेतकर्‍यांना विश्वासात घेतले व त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत कारखान्याची यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवली. सध्याच्या परिस्थितीत कारखान्याचे नक्त मूल्य रु. 17 कोटीपर्यंत आहे. त्यांनी या कारखान्याचे 1989 ते 1998 व 2005 ते 2011 असे 15 वर्षे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी अत्यंत साधेपणाने परंतु कार्यक्षमतेने कारभार करून हा कारखाना कर्जमुक्त केला. त्याचबरोबर साखर उतारा, ऊस गाळपक्षमता आणि व्यवस्थापन आदींबाबत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्याकडून परिचारक यांच्या नेतत्त्वाखाली असणार्‍या कारखान्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

परिचारक व त्यांच्या सहकार्‍यांनी 1969 मध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव सादर केला. खाजगी कारखान्यांचे सहकारीकरण याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 1991 मध्ये श्रीपूरस्थित बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट हा खाजगी साखर कारखाना पांडुरंग सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतला व त्याचे सहकारी साखर कारखान्यात रूपांतर केले. विकसनशील देशात पर्यावरणमित्र तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करणार्‍या संस्थेस मदत करण्यासाठी कार्बन क्रेडिट ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर अमलात आली. परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याने चिपाडापासून सहवीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला व त्यास यू.एन.एफ.सी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 2006 पासून ते 2016 पर्यंत कार्बन क्रेडिट प्रदान करण्यात आले. विक्री होणार्‍या वीज युनिटवर सुमारे रु.4 कोटीचे उत्पन्न कारखान्यास विनासायास मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कार्बन क्रेडिट मिळविणारा सहकार तत्त्वावरील भारतातील हा पहिलाच साखर कारखाना होय.

उजनी, वीर धरणाचे पाणी शेतकर्‍यांनी घेताना त्याची कायदेशीर नोंद केली पाहिजे, वीज बिल भरले पाहिजे, शेतकरी व सभासदांनी कर्ज वेळेत फेडले पाहिजे यासाठी परिचारक कठोरपणे आग्रही राहिले. कोणत्याही निमित्ताने त्यांनी बेकायदेशीर अथवा नीतिबाह्य गोष्टींना जवळ केले नाही. यामुळेच शेतकर्‍यांशी जोडलेले नाते त्यांनी मजबूत केले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी सहकारी संस्थांमार्फत मार्गदर्शक शिबिरे घेऊन त्यांच्यामध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शेती व बागायती व्यवसायाकडे आकर्षित केले.

सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव व डबघाईस आलेल्या संस्था सुधारण्याची हातोटी हे गुण विचारात घेऊन जून 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाने परिचारक यांची एस.टी.महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रथम नेमणूक केली. महाराष्ट्राच्या दळणवळणाची नाडी असलेले हे महामंडळ सतत तोट्यात जात होते. महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये आमूलाग्र बदल करून प्रवाशांना सुखकर व आरामदायी प्रवासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील बसगाड्या देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला व राज्य परिवहन सेवेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यात यश मिळविले.

जून 2000 ते जानेवारी 2005 व त्यानंतर सप्टेंबर 2006 पासून 2 वेळा महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक होणारे व महामंडळाला सतत 5 वर्षे नफ्यात आणणारे परिचारक हे एकमेव यशस्वी अध्यक्ष म्हणून परिचित आहेत.

परिचारक यांनी 1989 मध्ये पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेमार्फत उमा महाविद्यालय तसेच कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे काढले व हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले.

परिचारक यांनी सतत 25 वर्षे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्वही केले. त्यांनी 1991 मध्ये महाराष्ट्र राज्य पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने पंढरपूर शहराचा विकास केला.

परिचारक यांनी सहकारी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी युरोप व रशिया या देशांचा अभ्यास दौरा केला. तसेच जानेवारी 2009 मध्ये विधिमंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांसोबत हाँगकाँग, चायना, व्हिएतनाम या देशाचा दौरा करून तेथील झोपडपट्टी सुधारणा योजना, रस्ते वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रामीण भागातील जीवनमान, विशेषत: व्हिएतनाम येथील ऊस व बागायती शेती यांचा अभ्यास केला. इंटरनॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅण्ड ग्रोथ सोसायटी, दिल्ली या संस्थेने विकासरत्न पुरस्कार देऊन परिचारक यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांनी निष्ठेने काम करून महाराष्ट्रातील सहकारी चळवळीत एक आदर्श निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

- जयवंत विठोजी मोहिते

परिचारक, सुधाकर रामचंद्र