Skip to main content
x

पर्वतकर, दत्ताराम आत्माराम

त्ताराम आत्माराम पर्वतकर यांचा जन्म गोव्यातील पर्वत या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव अबोली होते. दत्तारामजींच्या घरात मूर्तिमंत संगीत साधनाच चालू होती. त्यांचे आजोबा व पणजोबा गाण्या-वाजविण्याचे दर्दी होते. वडीलबंधू बाळकृष्णबुवा पर्वतकर हे निष्णात सारंगीवादक होते. ते अत्यंत विद्वान, संगीत रचनाकार व गायक होते. त्यांना वेगवेगळ्या अनवट रागांचे व अनवट तालांचे ज्ञान होते. त्यांचे दुसरे बंधू सदानंद पर्वतकर हे तबलावादक होते. अशा रितीने त्यांना घरातूनच संगीताचा वारसा प्राप्त झाला होता. वडीलबंधू हेच त्यांचे परमपूज्य आद्यदैवत व गुरू होते.
बालपणापासूनच त्यांना सारंगी वादनाचे वेड लागले होते. घरी कोणी नसले की वडीलबंधूंची सारंगी घेऊन ते सारंगी वाजविण्याचा प्रयत्न करीत. शिक्षणासाठी वडीलबंधूंनी त्यांना पणजीला ठेवले होते; पण तेथेही सारंगीने त्यांची साथ सोडली नाही. विनायकराव म्हार्दोळकरांची सारंगी ऐकून त्यांचे अभ्यासावरचे मन उडाले. विनायकरावांना ते ओळखत नव्हते;परंतु सारंगी शिकण्यासाठी ते म्हार्दोळला पळून गेले.
एके दिवशी सारंगी वाजवत असताना लयभास्कर खाप्रूमामाजींनी त्यांना ऐकले व त्यांचे खूप कौतुक केले. पुढे दत्तारामजींनी सारंगीचे शिक्षण पांडूमामा मंगेशकर यांच्याकडे घेतले. पांडूमामांकडे सारंगीवादन व खाप्रूमामाजींकडून त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे स्वर व लय असा त्यांच्या संगीत शिक्षणाचा पाया पक्का झाला. 
पुढे दत्तारामजी आपली सारंगी घेऊन बेळगाव व सांगलीच्या बाजूला गेले. आणि या भ्रमंतीमध्ये त्यांची आणि अब्दुल करीम खाँसाहेबांशी ओळख झाली. ही संधी साधून ते त्यांच्याकडे गाणे शिकले.
संगीत व सारंगी अशी दुहेरी कला हस्तगत करून दत्तारामजी कोल्हापूरमार्गे मुंबईला आले. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’, ‘ऑल इंडिया रेडिओ’, ‘इम्पीरिअल फिल्म कंपनी’ या ठिकाणी त्यांनी नोकरी केली. प्रत्येक वाद्य शिकणे हा त्यांचा छंदच होता. ते ‘जलतरंग’ सतारीच्या अंगाने वाजवीत असत. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ने त्यांच्या जलतरंगाच्या रेकॉडर्स काढल्या होत्या. त्याचबरोबर ते दिलरुबा, सतार व तबला वाजवत असत. अशा रीतीने नोकरीव्यतिरिक्त दत्ताराम पर्वतकर यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ नामांकित गायक—गायिकांना साथ करण्यात गेला. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व सूरश्री केसरबाई केरकर यांना त्यांनी सारंगीची साथ दिली. दत्तारामांनी केसरबाई केरकरांच्या संगीत संन्यास घेण्यापूर्वीच्या शेवटच्या मैफलीलाही साथ केली होती. त्यांची साथ करताना, अल्लादिया खाँसाहेबांचाही त्यांना सहवास लाभत असे. 
दत्ताराम पर्वतकर त्यांच्याकडे शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिकवीत. ते कोणत्याही प्रकारची बिदागी घेत नसत. त्यांचे मुंबईत निधन झाले.

डॉ. अमिता नातू

पर्वतकर, दत्ताराम आत्माराम