Skip to main content
x

पटवर्धन, कृष्णाजी लक्ष्मण

         कृष्णाजी लक्ष्मण तथा किशाभाऊ पटवर्धन यांचा जन्म मुंबईतील सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुढे शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्यातील संघटकाला प्रेरणा मिळाली. देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा तो काळ होता. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या सहवासात तरुण किशाभाऊंना प्रेरणा मिळाली. १९४२ च्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण बाजूला सारून त्यांनी घर सोडले व धुळे- चाळीसगाव क्षेत्रात संघ प्रचारक म्हणून ते काम करू लागले.

१९५१ पर्यंत हे कार्य चालू होते. नंतर ते आपल्या व्यक्तिगत जीवनाकडे वळले. अर्धवट सोडलेले शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स), एम.एड. या पदव्या प्राप्त करून त्यांनी पूर्ण केले. पुण्याच्या राजा धनराज गिरजी विद्यालयात किशाभाऊ शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. विज्ञान-गणिताचे उत्तम शिक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. रामकृष्ण मठ, विवेकानंद केंद्र, संघ शाखा यांच्या कार्यात सहभागी होऊन स्वत: मधील कार्यकर्ता त्यांनी जागृत ठेवला.

बुद्धिमान मुलांवर विशेष प्रयत्न घेऊन देशाच्या विकासाला आवश्यक असे नेतृत्व उभे करावे ह्या विचारातून अप्पासाहेब पेंडसे ह्यांनी ज्ञानप्रबोधिनीहा शिक्षणातील प्रयोग सुरू केला होता. या शाळेच्या कामात किशाभाऊ सहभागी झाले. पण त्याचवेळी पुण्याच्या पूर्व भागातील आर्थिक, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील बुद्धिमान मुलांच्या भवितव्याच्या प्रश्‍नाने किशाभाऊ अस्वस्थ होते. अशा मुलांसाठी ज्ञानप्रबोधिनी सारख्या प्रयोगाची गरज आहे असे त्यांना वाटत होते.

किशाभाऊ राजा धनराज गिरजी विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले आणि दुसर्‍या दिवसापासून पुण्याच्या पूर्व भागातील उपेक्षित गुणवान मुलांसाठी काम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. वेगवेगळ्या शाळांतील बारा बुद्धिमान शिक्षक त्यांना मिळाले आणि १३ मे १९७९ रोजी त्यांनी स्वरूपवर्धिनीची स्थापना केली. पूर्व भागातील मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेऊन संस्थेने निवड केली. नेहमीच्या शाळेनंतर संध्याकाळी मुले जमू लागली. नवे सहकारी कार्यकर्ते जोडण्यासाठी, आर्थिक मदत मिळविण्यासाठी किशाभाऊ कामाला लागले. या वेगळ्या शैक्षणिक प्रयोगातून आम्हाला स्वच्छ हाताचे, समर्थ खांद्यांचे, तल्लख बुद्धीचे, विशाल मनाचे व सामाजिक बांधिलकी जपणारे तरुण, समर्पित कार्यकर्ते घडवावयाचे आहेतअसे आवाहन ते करीत.

या आवाहनाला समाजाने उत्तम प्रतिसाद दिला. पण जागेची अडचण उभी राहिली. तेव्हा संस्थेने समाजाकडून आर्थिक साहाय्य मिळविले. पूर्व भागात स्व-रूपवर्धिनीची पाच मजली इमारत उभी केली. रामकृष्ण मठाचे स्मरणानंदजी महाराज व रा.स्व. संघाचे तत्कालीन सर संघचालक कै. बाळासाहेब देवरस यांच्या हस्ते १० मे १९८८ रोजी इमारतीचे उद्घाटन झाले.

संस्थेच्या परिसरातील सेवावस्तीचे सर्वेक्षण करून बालवाडीच्या रूपाने संस्थेचा पहिला प्रकल्प सुरू केला. ह्या प्रकल्पाच्या अनुषंगाने सेवावस्तीतील माताभगिनींशी संवाद साधून त्यांच्यासाठी किशाभाऊंनी उद्योग, शिक्षण, साक्षरता वर्ग, वैद्यकीय मदत केंद्र,कायदेशीर सल्ला केंद्र सुरू केले.

नवा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचा किशाभाऊंचा स्वभाव होता. त्यातून आजोळप्रकल्प, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा असे अनेक प्रकल्प सुरू झाले. प्रकल्प सुरू करण्यासाठी व तो सुरळीतपणे चालण्यासाठी निधीची गरज लागते ह्याची जाणीव त्यांना होतीच. पण आपले कार्य ईश्वरी कार्य आहे, समाज त्यासाठी निधीची कमतरता भासू देणारच नाही असा त्यांचा विश्‍वास होता. तो अनाठायी नव्हता. संस्थेला शासकीय मदत नसली तरीही कामाचा विस्तार सातत्याने होत गेला. सुरू झालेल्या प्रत्येक उपक्रमातून सामाजिक जाणिवा विस्तारलेले कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी विद्यार्थ्यांसमोर ते विविध क्षेत्रांतील मोठे कार्यकर्ते  आणायचे, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या गप्पा होत, त्यांची व्याख्याने ते ऐकवित. ह्या उपक्रमातून देशासमोरील वेगवेगळ्या प्रश्‍नांची जाणीव विद्यार्थ्यांना होत असे. म्हणूनच अडचणींशी सामना करीत शिकलेल्या अनेक तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते म्हणून पूर्वांचलातल्या दोन-तीन राज्यांमध्ये विविध प्रकल्पावर कार्य केले. ह्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत ते अपरिमित कष्ट करीत राहिले. त्यांच्या स्वप्नातील शिक्षणाचा पटवर्धनी पॅटर्नप्रत्यक्षात आला आणि यशस्वी झाला. शहरांतील गरीब वस्त्यांत राहणार्‍या गुणवंत मुलांबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत व गरजू मुलांपर्यंतही पोहोचला. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाली तेव्हा हे काम पुढील कार्यकर्त्यांच्या हाती सहजपणे सोपवून किशाभाऊ औपचारिक जबाबदारीतून मुक्त झाले. पुढील चार वर्षे युक्तीच्या चार गोष्टीसांगत सहभाग देत राहिले. त्यांच्या कर्तृत्वाला समाजाने विविध पुरस्कारांनी सन्मानित केले.  त्यात फाय फौंडेशन - इचलकरंजी, आदर्श शिक्षक पुरस्कार - पुणे महानगरपालिका, तेजस पुरस्कार - डोंबिवली, महाराष्ट्र सेवा संघाचा कै. ल.ग. गद्रे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 

- शिरीष पटवर्धन

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].