Skip to main content
x

फाळके, बाबूराव पांडुरंग

          बाबूराव पांडुरंग फाळके यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पोखर्णी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मराठी ७वीपर्यंत झाले. शिक्षण संपल्यावर त्यांनी शेतमजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या शेतमजुरीच्या मिळकतीतून बचत करून त्यांनी सावकाराकडे गहाण पडलेली आपली सुमारे अडीच एकर शेती सोडवून घेतली. त्यांनी १९४७नंतर स्वतःची शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी शास्त्रशुद्ध शेतीचा पर्याय स्वीकारला. त्यांनी १९५५-५६मध्ये आपली डोंगर उतारावरील शेतजमीन समतल करून घेतली. त्यांनी जुन्या विहिरीची दुरुस्ती केली, तीन नव्या विहिरी खोदून त्यावर विजेचे पंप व मोटार बसवून सर्व जमीन पाण्याखाली आणली. त्यांनी आपल्या शेतात द्राक्षे, आंबा, नारळ यांचे उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांनी सघन शेती पद्धतीचा वापर केला. तसेच आपल्या घराशेजारी त्यांनी आधुनिक शौचालय बांधले. सदर शौचालयाला जोडून त्यांनी गॅसचा प्रकल्प बसवला. त्याच गॅसचा वापर त्यांनी घरात स्वयंपाकासाठी केला. तसेच खतासाठीही त्याचा उपयोग झाला. त्यांनी ग्राम, तालुका व जिल्हा या तिन्ही पातळ्यांवर पीक स्पर्धेत भाग घेतला व ज्वारीचे हेक्टरी ९५ क्विंटल उत्पन्न काढले. त्याचबरोबरीने त्यांनी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसायही केला. त्यापासून मिळणाऱ्या खताचा वापर त्यांनी आपल्या शेतात केला. नंतर फाळके यांनी आपले लक्ष उसाच्या लागवडीवर केंद्रित केले. उसाची लागवड करण्यासाठी लागणारे खत आणि पाणी मिळण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात अनेक प्रयोग केले. त्यातून त्यांनी उसाच्या एक डोळ्याचे लागवड तंत्र विकसित केले. त्यामुळे लागवड करताना लागणाऱ्या बियाण्यांमध्ये ४० टक्के बचत होते. त्यांनी केलेले प्रयोग पाहण्यासाठी एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली.

          फाळके यांना शेतकरी मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येई. त्या ठिकाणी ते एक डोळ्याची लागवड, उसाच्या रोपांची मर्यादित संख्या व वैयक्तिक ऊस सुधारणा यांबाबतही मार्गदर्शन करत. सदर पद्धतीने ते आपल्या शेतातील दीड ते दोन हेक्टर क्षेत्रांतून सरासरी हेक्टरी २५० टन उसाचे उत्पादन घेत. त्यांनी शेतमजुरांना विविध सवलती देण्याचा अभिनव उपक्रमही राबवला. क्षेत्र न वाढवता उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यायचे याचा फाळके यांनी सातत्याने विचार केला. राज्यातील असंख्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी फाळके यांची शेती मार्गदर्शक ठरली.

- संपादित

फाळके, बाबूराव पांडुरंग