Skip to main content
x

फलटणकर, वामन गोविंद

वामन गोविंद फलटणकर हे प्रसिद्ध धृपदगायक होते. त्यांचे वडील गोविंदबुवा गोसावी फलटणकर हे कीर्तनकार होते. ते ग्वाल्हेरमध्ये लष्कर भागात राहत असत. प्रसिद्ध धृपदिये पं. चिंतामणी  मिश्र यांचे शिष्य नारायण शास्त्री यांचे शिष्यत्व वामनबुवांनी पत्करले.

मथुरेच्या शेठ लक्ष्मीचंद यांनी द्वारकाधीश मंदिराची स्थापना केली आणि संगीत सेवेसाठी वामनबुवांना लष्करकडून मथुरेला आमंत्रित केले. तिथे फलटणकरबुवांच्या गायकीने लोक प्रभावित झाले. तसेच तेथील कित्येक जण बुवांचे शिष्य झाले. एकदा करौली संस्थानाचे अधिपती महाराज मदनपाल यांनी मथुरेस, ते तीर्थयात्रेस आले असताना त्यांनी बुवांचे गाणे ऐकले. त्यांना ते गायन इतके आवडले, की त्यांनी शेट लक्ष्मीचंदांकडून बुवांना आपल्या संस्थानासाठी मागून घेतले. मग द्वारकाधीश मंदिरात गानसेवेसाठी वामनबुवांचे धाकटे बंधू भैयाजी यांना बोलावून घेतले गेले.

करौली संस्थानात वामनबुवांचे कार्यक्रम गाजू लागले. त्यांच्याविषयीची एक आख्यायिका अशी: एकदा वामनबुवांचे गाणे ठेवले होते. उन्हाळा कडक होता, म्हणून उघड्यावरील चौकात मैफल भरवली होती. उकाड्याने हैराण झालेले संस्थानिक म्हणाले, ‘‘बुवा, आज संगीताचा काही चमत्कार दाखवा.’’ बुवा म्हणाले, ‘‘मला थोडा वेळ द्या, मी स्नान करून येतो.’’

स्नान करून, शुचिर्भूत होऊन बुवा पुन्हा आपल्या आसनावर बसले. गुरूंचे स्मरण करून मेघमल्हार आळवू लागले. हळूहळू पखवाजाबरोबर धृपदाच्या रंगतीबरोबर धुवांधार पाऊस पडला. त्या घटनेनंतर करौलीच्या मुरलीधर मंदिराचे पिढ्यान्पिढ्यांचे वतन आणि मासिक पगार वगैरे गोष्टी वामनबुवांना बहाल केल्या गेल्या.

करौलीचे संस्थानिक वारल्यावर लष्करचे महाराज जयाजीराव शिंदे यांनी वामनबुवांना बोलावून घेतले आणि दरबारातल्या इतर कलावंतांमध्ये त्यांचा समावेश केला. महाराजांची फलटणकरबुवांवर अतिशय श्रद्धा होती. रात्री आठ वाजल्यापासून महाराज निद्राधीन होईपर्यंत बुवा त्यांच्या शयनागाराजवळ बसून राग आळवत असत. फलटणकरबुवांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शिवराम शास्त्री हेही पित्याप्रमाणे यशस्वी गवई झाले. वामनबुवांनी रचलेले तराणे पं. भातखंडे यांनी त्यांच्या क्रमिक पुस्तक मालिकेत छापले आहेत.

          — डॉ. सुधा पटवर्धन

फलटणकर, वामन गोविंद