Skip to main content
x

सामंत,रघुवीर जगन्नाथ

     रघुवीर जगन्नाथ सामंत यांचे मूळचे नाव ‘रघुनाथ’ होते; पण १९३२ साली सामंतांचा ‘हृदय’ हा शब्दचित्रांचा संग्रह प्रकाशित झाला तो ‘कुमार रघुवीर’ या टोपणनावाने. चौतीस शब्दचित्रे असलेल्या या त्यांच्या लेखनाला वाचकांची उत्तम दाद मिळाली, आणि मग तेव्हापासून पुढे त्यांनी रघुनाथऐवजी ‘रघुवीर’ हेच नाव लावायला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बी.ए.बी.टी. पर्यंत झाले. मुंबईच्या चिकित्सक समूह शाळेत त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

     त्यांचे वडील स्मॉलकॉज कोर्टात जज्ज होते. त्यामुळे ठाणे, पुणे, सांगली अशा ठिकाणी वडिलांच्या बदल्या झाल्याने त्यांचे शालेय शिक्षण अशा विविध ठिकाणच्या शाळांतून झाले. १९२६ साली ते मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नंतर, १९३४ साली ते झेवियर कॉलेजमधून बी.ए. झाले. काही वर्षे त्यांनी चिकित्सक समूह शाळेत अध्यापन केले. या काळातच ते लेखन करू लागले होते.

     १९२९ साली ‘सुभान्या’ हे व्यक्तिचित्र ‘प्रगती’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि मग संपादकांच्या प्रोत्साहनामुळे सामंतांनी भरपूर लेखन केले. आकाशवाणीवरील त्यांचे नाट्यविषयक आणि काव्यगायनाचे कार्यक्रमही रसिकप्रिय होते. १९३४ साली त्यांनी ‘पारिजात’ या मासिकाचे संपादन केले; पण अखेर आर्थिक कारणासाठी ते बंद करावे लागले. पण, तरीदेखील ‘पारिजात प्रकाशना’तून त्यांनी आपली ग्रंथनिर्मिती सुरूच ठेवली होती. पुढे १९४० साली त्यांनी ‘ज्योती’ या मासिकाचे संपादन केले व १९४२-१९४४ सालांत त्यांनी ‘अमर ज्योती वाङ्मय’ विभागातून योजनाबद्ध बालवाङ्मयाचा एक प्रयोग केला. ‘आजची गाणी’ (१९३९), ‘रक्त नि शाई’ (१९४७) हे गीतसंग्रह; ‘गीत-ज्योती’ (१९४४) हा किशोरगटासाठी गेय नाट्यगीत संग्रह, शिवाय त्यांनी ‘मडक्यातला न्याय’, ‘जलदेवतेचा न्याय’ ही बालवाङ्मयाची पुस्तके लिहिली.

     १९३८ साली त्यांनी ‘उपकारी माणसे’ ही प्रदीर्घ कादंबरी लिहिली. तीन खंडांत विस्तारलेली मराठीतील ही एक अभिनव, स्वतंत्र, सामाजिक, प्रदीर्घ कादंबरी आहे. याशिवाय ‘जीवनगंगा’ (१९४७), ‘आम्ही खेडवळ माणसं’ (१९४८), ‘आम्हांला जगायचंय’ या कादंबर्‍या, आणि ‘घरोघरच्या देवी’ ही नाट्यात्मक कादंबरी, अशा कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘पणत्या’, ‘तारांगण’, ‘दिलजमाई’ हे लघुनिबंधसंग्रह; ‘मासलेवाईक प्राणी’ (१९४०) ही भावस्पर्शी स्वभावचित्रे; ‘एम व्हिटॅमिन’ हे शिक्षकांच्या जीवनावरील नाटुकले; ‘माणसाचे शेपूट’, ‘आपले व्यक्तित्व’ ही शास्त्रीय, मानसशास्त्रीय चर्चात्मक पुस्तके; यांशिवाय ‘सुरंगीची वेणी’(१९३५) हा रशियन कथांचा अनुवाद, अशी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली.

     विविध वाङ्मय प्रकारांत विपुल निर्मिती करणार्‍या रघुवीर सामंतांची काही पुस्तके ही विश्वविद्यालयीन व शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके, पुरवणीवाचन पुस्तके म्हणून नेमली गेली होती. त्यांतील अनेक वेचक उतारे क्रमिक पुस्तकांतही समाविष्ट झाले होते. वास्तववादी, सोज्ज्वळ लेखन ही सामंतांची सहजप्रवृत्ती होती.अध्यापक, मुख्याध्यापक, संपादक, प्रकाशक, लेखक अशा विविध नात्यांनी सामंतांनी वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयीन सेवा केली आहे.

     - मंगला गोखले

सामंत,रघुवीर जगन्नाथ