सारंग, विलास गोविंद
विलास गोविंद सारंग यांचा जन्म कारवार येथे झाला. इंग्रजी विषयात एम.ए. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी डब्ल्यू.एच.ऑडेन यांच्या कवितेवर मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली. नंतर इंडियाना विद्यापीठात त्यांनी कम्पॅरेटिव्ह लिटरेचर या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली.
मुंबईत एसआयईएस, तसेच मुंबई विद्यापीठात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९७४ सालापासून इराकमधील बसरा विद्यापीठात व नंतर कुवैत येथे सारंगांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यांनी मराठीत ‘सार्त्र’, ‘कापका’, ‘कामू’, ‘बेकेट’, ‘टी.एस. इलियट’ यांच्याविषयी लेखन केले. त्यांचा ‘कविता’ (१९६९ ते १९८४ - १९८६) हा कवितासंग्रह; ‘सोलेदाद’ (१९७५) व ‘आतंक’ (१९९९) हे कथासंग्रह, ‘एन्कीच्या राज्यात’ (१९८३) ही कादंबरी, ‘सिसिफस आणि बेलाक्वा’, ‘मॅनहोलमधला माणूस’ (२००८) ही पुस्तके प्रसिद्ध असून ‘रुद्र’ आणि ‘झडत्या इतिहासाची वाळू’ ही पुस्तके प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. तसेच, ‘fair tree of the void’ हा इंग्रजीतील कथासंग्रह पेंग्विनने प्रसिद्ध केलेला आहे. ह्या कथासंग्रहाचे ‘ब्लर्ब’सुद्धा अत्यंत वाचनीय असे आहे. त्यात पाश्चात्त्य लेखक व कलाकृती यांचे विश्लेषण आहे.
‘मराठी नवकादंबरी’ या पुस्तकात त्यांनी किरण नगरकर, कमल देसाई, भालचंद्र नेमाडे, चिं.त्र्यं. खानोलकर यांच्या कादंबर्यांची समीक्षा केली आहे. ‘अक्षरांचा श्रम केला’ हा त्यांचा समीक्षा लेखांचा संग्रह लक्षणीय आहे.
१९६० सालानंतरच्या पिढीतील महत्त्वाचे प्रयोगशील लेखक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची कथा पारंपरिक कथेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. मानवी स्वातंत्र्याची गळचेपी त्यांच्या अनेक कथा-कादंबर्यांतून व्यक्त होते. ते जीवनासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करतात. कवितेत अतिशय सरधोपट शैलीतून तिरकस आशय व्यक्त करतात. त्यांच्या समीक्षेला वैश्विक साहित्याच्या अभ्यासाची जोड मिळाली आहे.
- नरेंद्र बोडके