Skip to main content
x

सावंत,परशुराम बाबाराम

     परशुराम बाबाराम सावंत यांचा जन्म मुंबईला झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. व एलएल.बी.  या पदव्या संपादन केल्या.

      १९५७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही विभागांत त्यांनी दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, औद्योगिक, सहकार क्षेत्रातील आणि निवडणुकांसंबंधी असे सर्व प्रकारचे खटले यशस्वीरीत्या लढविले. या काळात ते अनेक कामगार संघटनांचे तसेच अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे कायदेविषयक सल्लागार होते. १९६५-६६ मध्ये ते मुंबईच्या ‘न्यू लॉ कॉलेज’मध्ये ‘खासगी आंतरराष्ट्रीय कायदा’ व ‘घटनात्मक कायदा’ या विषयांचे अधिव्याख्याते (लेक्चरर) होते. १९७३ मध्ये न्या.सावंत यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी मुंबई व शिवाजी विद्यापीठांच्या कुलगुरू-निवड समित्यांवर राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे ते राज्यपालनियुक्त सदस्य होते. जून १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक-सदस्य चौकशी आयोग म्हणून त्यांनी काम पाहिले.

      ऑक्टोबर १९८९ मध्ये न्या.सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २९जून१९९५ रोजी ते पदावरून निवृत्त झाले.

       त्यानंतर प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून २००१ पर्यंत त्यांनी काम केले. विविध नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांचवास्तव्य पुण्याला आहे. 

- शरच्चंद्र पानसे

सावंत,परशुराम बाबाराम