Skip to main content
x

शिगावकर चांगदेव वासुदेव

     जलरंगातील निसर्गचित्रण व व्यक्तिचित्रण यांत वास्तववादी शैलीत चित्रनिर्मिती करणारे कोल्हापुरातील हे चित्रकार, व्यवसायाच्या निमित्ताने मद्रास, बनारस, कलकत्ता आणि आसाममध्येही सिने-सजावटीच्या क्षेत्रात कार्यरत होते. पण ते खर्‍या अर्थाने कोल्हापूर परिसरात गाजले ते अगदी तरुणपणापासून वृद्धापकाळापर्यंत त्यांनी प्रत्यक्ष नग्न मॉडेलवरून चित्रे काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच !

चांगदेव वासुदेव शिगावकरांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे महाद्वार रोडवर एक छोटेसे हॉटेल होते. कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. चांगदेव हा एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांचा अतिशय लाडका होता. कोल्हापूरच्या कलात्मक वातावरणात विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू होते. पण चित्रकलेकडे जास्त ओढा होता. शाळेत मन रमेनासे झाले व चांगदेवने आठवीनंतर शाळा सोडली. निसर्गचित्रे, स्केचिंग व व्यक्तिचित्रे यांनी त्याला झपाटून टाकले.

कोल्हापुरात १९३० च्या दरम्यान प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. तिथे वसंतराव पेंटर यांच्या सोबत बॅकग्रउण्ड आर्टिस्ट, शोकार्ड व पोस्टर्स अशी कामे करण्यात तो सहभागी झाला. सिनेसृष्टीच्या वातावरणाशी हा त्याचा प्रथम परिचय होता. अशातच इंग्रजी पुस्तकातून छापून आलेली नग्न चित्रे बघून त्याच्या प्रतिकृती तो तयार करू लागला. अशी प्रत्यक्ष नग्न मॉडेल समोर बसवून परदेशातच नव्हे, तर मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्येही अभ्यास करतात हे ऐकून या तरुणाने त्या प्रकारे स्वत: अभ्यास करण्याचा निश्‍चय केला. त्याने नमुनाचित्रे पाठवून जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या सुरुवातीच्या परीक्षा दिल्या. कोल्हापुरातील भरल्या घरात, एकत्र कुटुंबात एखादी स्त्री कपडे काढून बसवायची, अन् तासन्तास  तिचे चित्र काढायचे हे अशक्यच होते. मग यावर उपाय म्हणून कलानिर्मितीला शांतता लागते असे सांगून चांगदेव शिगावकरांनी गावापासून दूर देवल क्लबजवळ एक खोली भाड्याने घेतली. प्रथम मॉडेल बसवून पोट्रेट सुरू केले. साफसफाई करणार्‍या एका कामगार स्त्रीला समजावून सांगून, विश्‍वासात घेऊन नग्न बसण्यासाठी राजी केले व त्यांचा प्रत्यक्ष नग्न मॉडेलवरून अभ्यास सुरू झाला.

 ते १९३५ च्या दरम्यान दोन तासांच्या प्रत्येक बैठकीसाठी मॉडेलला तीन रुपये देत असत. हळूहळू या प्रकारे अभ्यास करणारी समकालीन मित्रमंडळी या उद्योगात सहभागी झाली. त्यांत टी.के.वडणगेकर, जी.आर.मिस्त्री, एस.एन. कुलकर्णी यांचा सहभाग होता. याच काळात शिगावकरांनी निसर्गचित्रणाचाही अभ्यास कसोशीने सुरूच ठेवला होता. पण फक्त अशी चित्रे रंगवून भागणार नव्हते. चरितार्थासाठी काहीतरी उद्योग करणे भाग होते. शिवाय लग्न होऊन संसारही वाढू लागला होता. त्यामुळे शिगावकर पुण्यात गेले. तिथे प्रभात फिल्म कंपनी व शालिमार या फिल्म कंपन्यांसाठी त्यांनी सिनेपब्लिसिटीची कामे केली. तिथून ते मुंबईस रामनाथकर यांच्याकडे काम करू लागले. याच काळात त्यांचा एस.एल. हळदणकर व जी.एस. हळदणकर या पिता-पुत्रांशी परिचय झाला व त्यांच्या जलरंगचित्रणाचा प्रभावही पडला. याच काळात त्यांनी नमुना चित्रे देऊन सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या पदविकेच्या अपूर्ण राहिलेल्या परीक्षा दिल्या व १९४३ मध्ये, वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ते जी.डी. आर्ट झाले.

मुंबईनंतर त्यांनी चरितार्थासाठी मद्रास (चेन्नई) गाठले. तेथील ए.व्ही.एम. या प्रख्यात चित्रपटसंस्थेत काम करीत असतानाच ते बनारसला स्थलांतरित झाले व तेथून पुढील वीस वर्षे ते कलकत्त्यात (कोलकाता) स्थिरावले. ते कलकत्त्यात इंग्रजी चित्रपटांच्या जाहिराती रंगवीत असत. यानंतर १९६८ च्या दरम्यान त्यांनी थेट आसामची राजधानी गौहाटी गाठली व त्यांनी चरितार्थासाठी सिनेक्षेत्रातील व्यवसाय सुरू ठेवला. अशा प्रकारे त्यांनी आयुष्यभर चरितार्थाच्या निमित्ताने देशाच्या विविध प्रांतांत वास्तव्य केले. विविधतेने नटलेल्या भारताचे दर्शन घेणे व विविध भागांतील निसर्ग चित्रित करणे हा त्यांचा ध्यास होता. पण त्या सोबतच विविध राज्यांतील स्त्री-शरीराच्या वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीचाही त्यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास केला. पण या सर्व भटकंतीत ते कोल्हापूरच्या वास्तववादी चित्रकलेची परंपरा विसरले नाहीत. मद्रास, बनारस, कलकत्ता, आसाम येथील वास्तव्यात त्यांनी तेथीलच नव्हे, तर मणिपूर, नागालँड, शिलाँग अशा आसपासच्या प्रदेशातील निसर्गचित्रे सातत्याने काढली.

ते कलकत्त्यात असताना १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रमाची शताब्दी साजरी झाली, तेव्हा त्यांनी त्या विषयावरील एक चित्रमालिकाही रंगवली. पुढे १९६५ मध्ये पाकिस्तानबरोबर युद्ध झाले, तेव्हा या चित्रमालिकेचे प्रदर्शन भरवून शिगावकरांनी त्या चित्रविक्रीतून आलेली रक्कम युद्धफंडाला दिली. गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी ‘गांधी जीवनदर्शन’ नावाचे प्रदर्शन कलकत्त्यात भरविले. त्यानंतर १९६८ मध्ये ते आसामला स्थलांतरित झाले. हळूहळू वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या व १९८० च्या दरम्यान त्यांनी वयाच्या सत्तरीत आपल्या मूूळ गावी, कोल्हापूरला परतण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापुरात परतलेले चांगदेव शिगावकर वेगळेच होते. त्यांनी दाढी-जटा वाढवल्या होत्या. ते भगवी कफनी घालत व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असत. त्यांनी पूर्वीपासून कोल्हापुरातील काळाच्या ओघात लुप्त झालेल्या अनेक जागा रंगविल्या होत्या. पण आता मात्र ते फक्त महालक्ष्मी देवळाच्या परिसराची चित्रे रंगवू लागले. अशा प्रकारे त्यांनी महालक्ष्मीच्या देवळाची अनेक चित्रे जलरंगात रंगवली.

अशी अनेक चित्रे रंगवत असतानाच त्यांना तरुणपणी प्रत्यक्ष मॉडेलवरून रंगविलेली नग्नचित्रे आठवली व तशी चित्रे पुन्हा रंगवावीशी वाटू लागली. पण पूर्वीचे या कामातील त्यांचे काही सहकारी आता या उद्योगात सहभागी होऊ इच्छित नव्हते, तर काही काळाच्या पडद्याआड गेले होते. पण शिगावकरांनी निराश न होता पुढील पिढीच्या काही चित्रकारांना या कामात सहभागी केले व श्याम पुरेकर यांच्या मोठ्या घरात त्यांच्या पत्नीच्याच सहकार्याने हा नग्नचित्राभ्यास सुरू झाला. त्यासाठी भरपूर पैसे देऊन कोल्हापूरसारख्या ठिकाणीही मॉडेल मिळविण्यात आली. एवढेच नव्हे, तर या मॉडेलसोबत शिगावकरांनी स्वत:चेही फोटो काढून घेतले. त्यात ‘विश्‍वामित्र-मेनका’ या पौराणिक प्रसंगासाठी दाढी-जटा वाढविलेले स्वत: शिगावकर विश्‍वामित्राच्या भूमिकेत शिरले व मेनकेची भूमिका नग्न मॉडेलने वठविली. त्यानंतर तसे चित्रही तयार झाले. अशा प्रकारे शिगावकर व पुरेकर या गुरुशिष्यांच्या जोडीने अनेक चित्रे तयार केली.

१९९० च्या दरम्यान त्यांची प्रदर्शने कोल्हापूर, पुणे, सातारा अशा शहरांत भरली व त्यांतील कलाकृतींपेक्षा या चित्रांतील नग्नतेमुळे ती गाजली. त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. परंतु त्यापूर्वीच चांगदेव शिगावकर या आयुष्यभर निसर्गचित्रे व प्रत्यक्ष नग्न मॉडेलवरून चित्र रंगविण्याचे वेड आयुष्यभर जोपासणार्‍या कलावंताचा १५ एप्रिल १९८९ रोजी अंत झाला.

शिगावकर आयुष्यभर अर्थार्जनासाठी चित्रपट सजावटीच्या क्षेत्रात वावरले; महाराष्ट्रच नव्हे तर दक्षिण भारत, उत्तर भारत, बंगाल ते पूर्वांचलपर्यंत त्यांचे वास्तव्य होते. पण अखेरपर्यंत त्यांच्यावर कोल्हापूरच्या वास्तववादी कलापरंपरेचाच प्रभाव होता. त्यांच्या सभोवताली असलेेले, विविध प्रकारे आपल्या परंपरा जपत वैविध्याने नटलेले व विविध प्रांतांतून आविष्कृत होणारे जग व त्यातील कलाविष्कार त्यांना आकर्षित करू शकले नाहीत. पण या विविध प्रांतांतील निसर्गाचे चित्रण त्यांनी आयुष्यभर केले आणि त्या सोबतच अगदी तरुणपणापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष नग्न मॉडेलवरून चित्रनिर्मिती करण्याचा छंदही प्रयत्नपूर्वक जोपासला.

- सुहास बहुळकर

शिगावकर चांगदेव वासुदेव