Skip to main content
x

संपतलाल, बद्रीप्रसाद

द्रीप्रसाद संपतलाल यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील हार्मोनिअम वादक होते. ते गायनही करत व हार्मोनिअमची संगत करत. ते निष्णात नर्तकही होते. गावोगावी बैठकी करता करता त्यांना मध्य प्रदेशातील रायगडच्या राजदरबारात बहुमान मिळाला. त्यांनी मध्य प्रदेश गाजवला, तर त्यांच्या गुणी सुपुत्राने अखिल भारतीय ख्याती संपादन केली. संपतलाल यांच्या आई लक्ष्मीबाई या उर्दू, संस्कृत भाषातज्ज्ञ व संगीतप्रेमी होत्या.

वडिलांकडून संस्कार ग्रहण करीत संपतलाल वयाच्या सहाव्या वर्षीच गायन करू लागले. कथक नृत्याचे रीतसर शिक्षण घेऊन संपतलाल चौदाव्या-पंधराव्या वर्षी नृत्याचे कार्यक्रम करू लागले. त्यांनी हार्मोनिअमवर प्रभुत्व मिळविले. शिवाय ते तबलाही छान वाजवू लागले.

कलकत्ता येथे १९५० मध्ये संगीत परिषदेत त्यांच्या नृत्याचा पहिला कार्यक्रम गाजला. बद्रीप्रसाद यांचे धाकटे बंधू जगदीशप्रसाद गायनात, तर कैलासप्रसाद नृत्यकलेत तयार झाले. वडील व बंधू गायनाचा रियाज करीत तेव्हा बद्रीप्रसाद तबलासंगत करीत. पुणे, हैद्राबाद, लखनौ, बनारस, कलकत्ता येथे त्यांच्या गायनाच्या बैठकी गाजल्या. नंतर बद्रीप्रसाद यांचे तबलावादन प्रधान होऊ लागले व अखेर ते तबलानवाज म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा १९५५ मध्ये विदर्भातील काटोल येथे मुक्काम असताना विद्याबाई यांच्याशी विवाह झाला व नागपूरच्या छावणी भागात ते स्थायिक झाले.

तुमसरचे रायसाहेब संपतलाल यांच्या कलेवर  खूष झाले व त्यांनी आपल्या मुलाला तबला शिक्षण देण्यासाठी संपतलालना तिथेच ठेवून घेतले. चार-पाच वर्षे  संपतलाल यांनी तेथे शनिवारी भजन, गायन, वादन साथसंगत केली. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होत. दुर्दैवाने तुमसर-नागपूर प्रवासात विद्याबाई यांचे अपघाती निधन झाले व संपतलाल दुःखी झाले.

बद्रीप्रसाद संपतलाल यांचा विदर्भ साहित्य संघात सत्कार झाला. वसंतराव रानडे यांच्या व्हायोलिनवादना-बरोबर त्यांनी हार्मोनिअमची जुगलबंदी पेश केली. संपतलाल यांनी पंजाब,दिल्ली, फरूखाबाद घराण्याच्या उत्तमोत्तम बोलांचा संग्रह केला. त्यांची दायांबायांची तयारी व संतुलन चांगले होते. स्पष्ट बोल, हाताला वजन, तसेच गोडवा व मुलायमपणा होता. सतार, गायकी, नृत्य व स्वतंत्र वादन अशा चौफेर तबलावादनात त्यांची कमालीची तयारी होती. आकाशवाणी संमेलने, अनेक महोत्सवांत त्यांची उपस्थिती असे. त्यांना अनेक मानपत्रे व पारितोषिके मिळाली होती.

वि.ग. जोशी

संपतलाल, बद्रीप्रसाद