Skip to main content
x

शर्मा, ओगेटी परीक्षित

      गेटी परीक्षित शर्मा यांचा भारतातील आंध्र प्रदेशामधील गुंटुर जिल्ह्यात माजली या गावी जन्म झाला. ओगेटी वंशातील परदेशी हे पणजोबा, कृष्णय्या हे  आजोबा तसेच कौसल्यादेवी व साम्बमूर्ती हे मातापिता होत. कौंडिण्य गोत्रातील कृष्णयजुर्वेदीय घराणे. पिढीजात व्यवसाय भिक्षुकी व अध्यापन होय. पित्याने त्या काळात वैदिक प्रसारासाठी मुलींसाठी पाठशाळा काढली होती, यावरून त्यांच्या उदारमतवादी धोरणांची कल्पना येते.

     वयाच्या आठव्या वर्षी उपनयन झाल्यावर गावातील एका शास्त्रींकडे स्मार्तभागाचे अध्ययन केले. त्यानंतर पोन्नुर गावी श्रीभावनारायण संस्कृत वेद पाठशाळेत आठ वर्षे संस्कृतचे व तेलगूचे शिक्षण, दक्षिण भारत हिंदी- प्रचारिणी सभेच्या दोन परीक्षांसाठी अध्ययन केले. पाठशाळेच्या शिक्षणानंतर ते आंध्रगीर्वाण विद्यापीठात दाखल झाले. बनारस हिंदू विद्यापीठातून संस्कृत, हिंदी, इंग्रजी, प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्वविद्या हे विषय घेऊन स्नातक (बी.ए) झाले. मुंबई विद्यापीठातून संस्कृत, प्राकृत, भाषाशास्त्र व इंग्रजी हे विषय घेऊन स्नातकोत्तर पदवी (एम.ए.) मिळवली.

     संपूर्ण अध्ययन माधुकरी मागून, वारावर जेवून झाले. पूर्ण निर्धनत्वामुळे जीवन आर्थिक, शारीरिक व मानसिक विपत्तींनी भरलेले असायचे. हाताने रिक्षा ओढणे, भोजनालयात वाढपी म्हणून व वस्त्रालयात कामगार म्हणून धनप्राप्तीचे प्रयत्न केले. शिक्षणानंतर मात्र मद्रास व मुंबई येथे विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या भाषासंचलनालयातून साहाय्यक संचालक म्हणून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर कॅनडातील येथील मंदिरात नागरिकांसाठी संस्कृतचे अध्यापन केले.

     गौतमबुद्धांची धर्मपत्नी यशोधरा हिच्या उपेक्षाग्रस्त जीवनाची गाथा असणारे ‘यशोधरा’ हे नायिकाप्रधान आणि ८० सर्गांचे सहा कांडांत विभागलेले शूर देशभक्त महायोद्धा महाराणा प्रताप यांच्या वीर्यगाथेवर आधारित ‘श्रीमत्प्रतापराणायनम्’ ही दोन महाकाव्ये, ‘परीक्षिन्नाटकचक्रम्’ या नावाचा २७ लघुनाटकांचा संच, ‘कारगिल विजयम्’ हे देशभक्तीपूर्ण प्रेरक नाटक, ‘जानपदनृत्यगीतमंजिरी’ हा लोकगीतांचा  संग्रह, ‘अक्षयगीतरामायणम्’ व ‘अक्षयगीतमुकुन्दम्’ ही रामकृष्णांवरील गीतिकाव्ये, ‘सौंदर्यमीमांसा’ हा काव्यशास्त्रावरील लक्षणग्रंथ, ‘हिन्दुमतम्’ नावाचे गद्य व ‘कालाय तस्मै नम:’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी असे विपुल व वैविध्यपूर्ण साहित्य पंडित परीक्षित शर्मांच्या वैदुष्याचे व संस्कृतविषयीच्या प्रेमाचे फलित आहे. यांची काही नाटके दिल्ली दूरदर्शनवर प्रदर्शित झाली, तर काही आकाशवाणीवर नभोनाट्यरूपाने सादर झाली आहेत. ठिकठिकाणच्या विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमात त्यांच्या काही साहित्याचा समावेश झाला आहे. संस्कृत साहित्यात कादंबरी हा वाङ्मयप्रकार नाही व आत्मचरित्रात्मक साहित्यही अत्यल्प आहे. पंडित शर्मांनी या दोन्हीच्या समन्वयातून ‘नवल’(कादंबरी) या साहित्यप्रकाराशी संस्कृतप्रेमींची ओळख करून दिली.

     कुटुंबातील पारंपरिक धार्मिक वातावरणामुळे पंडित शर्मा वैदिक संस्कृतीचे कट्टर समर्थक व पुरस्कर्ते झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात वडिलांनी नोकरी सोडली, तेव्हापासून देशभक्तीचे बीज त्यांच्या मनात रुजले. तरुणपणात संघप्रमुख गोळवलकर गुरुजींच्या व्याख्यानांनी व त्यांच्या प्रासंगिक सहवासाने प्रेरित होऊन राष्ट्रकार्यासाठी संघप्रवेश, सत्याग्रह करून कारावास पत्करला. तिथेच राणाप्रतापच्या योगदानाचे संस्कार होऊन त्यांना महाकाव्याची प्रेरणा प्राप्त झाली. कारगिलविजय ही देशभक्तीने ओतप्रोत एकांकिका नाटकचक्रातील अन्य काही नाटके यांतून त्यांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा प्रतीत होते.

     देशप्रेमाएवढेच संस्कृतप्रेमही शर्माजींच्या अणुरेणूत भरलेले दिसते. घरातील पाठशाळेतच त्यांचे पारंपरिक संस्कृतशिक्षण सुरू झाले. आर्थिक विवंचनेमुळे व कलासक्त मनामुळे संस्कृतकडे पाठ फिरवण्याचा विचार आला, तरीही परिस्थितीवशात ते पुन्हा संस्कृतच्याच आश्रयाला आले. त्यांनी कायावाचामनाने संस्कृतप्रसारास वाहून घेतले. क्लिष्टतेच्या आरोपातून संस्कृतभाषेला मुक्त करण्यासाठी त्यांनी आधुनिक, सोपे, सुलभ शब्द वापरले व समाजाला संस्कृत वाचण्यास प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्यातून, विशेषत: आत्मचरित्रात्मक कादंबरीतून संस्कृतविषयक विचार व्यक्त झालेले दिसतात. संस्कृतव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये लिहायचे नाही, असा त्यांनी पणच केला होता.

     त्यांच्या लिखाणावर पूर्वसूरींचा लक्षणीय प्रभाव पडलेला दिसून येतो. आदिकवी वाल्मीकींपासून जगन्नाथ पंडितांपर्यंत सर्वच कवींना त्यांनी त्यांच्या कृतीत स्थान दिलेले आहे. प्राचीन कवींप्रमाणेच समकालीन कवी व साहित्यिक प्रज्ञाभारती श्री. भा. वर्णेकर, डॉ. रेवाप्रसाद द्विवेदी, डॉ. सत्यव्रत शास्त्री, डॉ. ग. बा. पळसुले,

     पं. वसंतराव गाडगीळ यांच्याशी असलेला त्यांचा स्नेह उल्लेखित आहे. यशोधरा हे शर्माजींचे पहिलेच महाकाव्य असल्याने त्यातील भाषा थोडी क्लिष्ट आहे. काव्यसंकेतानुसार यात वसंत विहार, सूर्योदय वर्णन, नगरवर्णन, यशोधरा विलापादी प्रसंग आहेत. दुसर्‍या महाकाव्यात (श्रीमत्प्रतापराणायनम्) दुर्बोधता, कच्चे दुवे आढळत नाहीत. भाषा अधिक प्रासादिक, सुलभ व भावरम्य आहे. त्यांची नाटके प्रसंगनिष्ठ व प्रयोगप्रधान आहेत. लोकसंगीताच्या लयीवर व ठेक्यावर गाता येणारी त्यांची जानपदगीते संस्कृत महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा अविभाज्य भाग बनली आहेत. संस्कृतचे कवी प्राचीन काळातील, वैभवातच रमतात हा समज त्यांच्या ‘कारगिल विजयम्’सारख्या नाटकातून दूर होतो. सद्य:स्थितीवर भाष्य करण्यासाठीही संस्कृत उपयुक्त आहे, हा संदेश त्यांच्या लेखनातून मिळतो.

     ‘यशोधरा’साठी अखिल भारतीय कालिदास पुरस्कार, ‘श्रीमत्प्रतापराणायनम्’करता अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती) यांच्याकडून वाचस्पती (डि.लिट.) ही मानद पदवी, शिवाय पंडित, महाकवी, गीर्वाणयोगचक्रवर्ती इत्यादी उपाधींनी सन्मानित पंडित परीक्षित शर्मा नवोदित संस्कृत साहित्यिकांसाठी प्रेरणास्थान व मानदंड आहेत यात संशय नाही.

डॉ. गौरी माहुलीकर

शर्मा, ओगेटी परीक्षित