Skip to main content
x

सरोदे, शिवाजी व्यंकटराव

          शिवाजी व्यंकटराव सरोदे यांचा जन्म मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खैरगाव येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण खैरगाव येथेच जि.प. शाळेमध्ये झाले. मॅट्रिकची परीक्षा त्यांनी मोवाड या गावातून दिली. त्यांनी १९७३मध्ये नागपूर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली व १९७५मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवीदेखील प्रथम श्रेणीत प्राप्त केली. एम.एस्सी. करत असताना त्यांना भा.कृ.अ.प.मार्फत गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. सरोदे संपूर्ण देशातून सर्वप्रथम आले होते. त्यामुळे त्यांना अ‍ॅस्पी फाऊंडेशन अँड कंपनीतर्फे फेलोशिपही मिळाली होती. त्यांनी १९७९मध्ये भा.कृ.अ.प., नवी दिल्ली येथून कृषि-कीटकशास्त्रामध्ये पीएच.डी. पदवी मिळवली.

          डॉ. सरोदे यांनी १९८० साली लंडन येथील कॉमनवेल्थ ब्युरो इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स व टेक्नॉलॉजी येथून पोस्ट डॉक्टरेट पदवीही मिळवली. त्यासाठी त्यांना कॉमनवेल्थची शिष्यवृत्ती मिळाली होती. सरोदे यांनी काही काळ बंगलोर येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि नंतर त्यांची निवड पेस्ट कंट्रोल इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये तांत्रिक व्यवस्थापक म्हणून झाली. या काळामध्ये त्यांनी ए.आर.एस., डी.बी.एम., एम.ए. (अर्थशास्त्र) व एम.ए. (लोकव्यवस्थापन) या पदव्याही मिळवल्या. डॉ. सरोदे यांनी काही काळ इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूर येथे कृषि-कीटकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणूनही काम केले. नंतर त्यांची नेमणूक डॉ.पं.दे.कृ.वि.त प्राध्यापक (कीटकशास्त्र) या पदावर झाली. त्यानंतर त्यांची निवड विद्यापीठाचे संशोधन संचालक म्हणून झाली. १९९५मध्ये त्यांना राष्ट्रीय कार्यशाळेत सुवर्णपदकही मिळाले होते. डॉ. सरोदे यांना २००८मध्ये वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार दिला आणि २००९मध्ये वसंतराव नाईक यांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्त मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी पुरस्कार देण्यात आला.

         डॉ. सरोदे यांनी ८९ संशोधनपर लेख व १४ पुस्तके लिहिली . तसेच आकाशवाणीवर २४ मुलाखती दिल्या . त्यांनी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, टांझानिया, फिलिपाइन्स या देशांनाही भेटी दिल्या . २००७मध्ये त्यांना अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठान, काटोल यांच्यातर्फे पत्रकारिता पुरस्कार कृषीतील त्यांच्या कामासाठी दिला.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

सरोदे, शिवाजी व्यंकटराव