Skip to main content
x

सूर्यवंशी, राजेंद्र विठ्ठल

             राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारी या गावी झाला. राजेंद्र यांचे प्राथमिक शिक्षण भंडारी येथील खासगी शाळेत झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी उमरगा येथील भारत विद्यालयात प्रवेश घेतला. हैदराबाद येथील सिटी महाविद्यालयामधून इंटर सायन्सनंतर नागपूर विद्यापीठातून बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ही पदवी मिळवली तर डॉ. नालमवार यांच्या वैद्यकीय संस्थेतून वैद्यकीय पदविका संपादन केली. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या खेडेगावातच पशु-आरोग्यसेवा निःस्पृह भावनेने केली. शासकीय सेवेत प्रवेश केल्यावर ते आपल्या कुटुंबासह उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावी पशु-उपचार केंद्रावर रुजू झाले. हंडरगुळी हे सर्व दृष्टीने मागासलेले खेडे होते. त्यांनी आपल्या कार्यामुळे पशु-आरोग्यसेवा केंद्र नावारूपास आणले. त्यांनी पशु-उपचार केंद्रासाठी लागणारी २.५ एकर जमीन अधिग्रहित करून बंदिस्त केली व आजारी पशूंसाठी सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या. मराठवाड्याचे भूषण असलेल्या देवणी या गाईच्या जातीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे श्रेय डॉ. सूर्यवंशी यांनाच द्यावे लागते. तत्कालीन पशु-संवर्धन विभागाचे संचालक डॉ. अब्दुल रहमान यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच डॉ. सूर्यवंशी यांच्या अथक परिश्रमामुळे ‘देवणी’ या जातीस राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यामुळेच या भागातील शेतकरी सधन झाला आहे.

             डॉ. सूर्यवंशी यांची पश्‍चिम महाराष्ट्रातील नारायणगाव येथे बदली झाली. या अवर्षणप्रवण क्षेत्रामधील आदिवासी भागातील ग्रामस्थांना पशु-संवर्धनातील आधुनिक तंत्राची ओळख नव्हती. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेडेगाव होते. तेथे राहणारा समाज शेती व पशुधन यावर आपला उदरनिर्वाह चालवत असे. डॉ. सूर्यवंशी यांनी नारायणगाव येथे रुजू झाल्यानंतर सामान्य माणसांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या गोवंशाची देखभाल व्यवस्थापन, प्रजनन इत्यादी बाबतीत गोपालकांचे प्रबोधन केले.

             माणसांप्रमाणेच जनावरासाठीही उपचार पद्धती असते, याची जाणीव या आदिवासी भागातील लोकांना नव्हती. जुन्या व चुकीच्या पद्धतीने आपल्या पशूंवर ते उपचार करत. या उपचारातून तोटा होत होता. ही बाब डॉ. सूर्यवंशी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गोपालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना त्यांच्याच भाषेत पशु-संवर्धन उपचार पद्धती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गरजवंत अल्पशिक्षित तरुणांना पशु-संवर्धन प्रचार-प्रसार आणि उपचार करण्यासाठी प्रशिक्षित केले. याच काळात भारतामध्ये दुग्धोत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून श्‍वेतक्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने संकरित पैदास कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. महाराष्ट्र शासनाने १९७२ या काळात संकरित पैदास कार्यक्रम घेण्याचे ठरवले; परंतु नारायणगाव, खेड परिसर आदिवासी असल्याने, तसेच संकरित गो-पैदासासाठी आवश्यक असणारे गोधन योग्य संख्येत नसल्यामुळे हा भाग या कार्यक्रमापासून वंचित राहिला. हीच बाब डॉ. सूर्यवंशी यांना खटकली. त्यांनी ग्रामस्थ व नेतेमंडळींच्या संपर्कात राहून अत्यंत जिद्दीने शासनाकडून संकरित गो-पैदास योजना नारायणगाव परिसरात राबवली.

             डॉ. सूर्यवंशी यांना आपल्या ध्येयपूर्तीसाठी लोकसहभाग वाढवला. त्यांनी पंजाब राज्यातील गायी आणून त्या १०-१५ लीटर दूध देतात याची साक्ष लोकांना पटवून दिली. तसेच घोडेगाव येथील सभापती दामूराजे काळे यांच्या घरी कृत्रिम रेतन पद्धतीने पहिली संकरित गाय तयार करून ती १० ते १५ लीटर दूध देते, हे सिद्ध केले. अनेक शेतकर्‍यांकडे सुरुवातीला १ ते २ लीटर दूध देणार्‍या गायी-म्हशी होत्या. डॉ. सूर्यवंशींनी प्रत्येक शेतकर्‍यांच्या घरात १५ ते ३० लीटर दूध देणार्‍या गायींची पैदास केली.

             गो-संवर्धनाचा कार्यक्रम योग्य दिशेने सुरू झाला, परंतु समाजातील ज्या घटकाला याची गरज होती त्यांच्याकडे त्यासाठी पैसा नव्हता. याची पूर्ण जाण डॉ. सूर्यवंशी यांना असल्यामुळे त्यांनी बँकेशी संपर्क साधून शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले. डॉ. सूर्यवंशी यांच्या कार्याची सरकारदरबारीही दखल घेतली गेली. त्यांच्या १२ लीटर दूध देणार्‍या गायीसाठी प्रथम पारितोषिक मिळाले. डॉ. सूर्यवंशी यांच्या प्रयत्नांमुळे खासगी आणि सहकारी सोसायट्या उदयास आल्या. गोवर्धन, राजहंस, एस. आर. थोरात, मुक्तार्ई, सकस मंगल दूध, मथुरा, मळगंगा यांसारखे दुग्ध प्रकल्प उभे राहिले. डॉ. सूर्यवंशी यांनी नारायणगाव परिसरातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. तसेच आरोग्य शिबिरे, पशुप्रदर्शने यामुळे आज महाराष्ट्रात जुन्नर, आंबेगाव, खेड, अकोले, पारनेर, शिरुर हे तालुके दुग्धोत्पादनात अग्रेसर झाले आहेत. त्यांनी आपल्या उत्पन्नातून २५-३० विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित केले. खेड्यातील अनेक मुलींनाही शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले.

- डॉ. चंद्रशेखर सर्वेश्‍वर बिडवई

सूर्यवंशी, राजेंद्र विठ्ठल