Skip to main content
x

टाकळकर, वसंत देगुजी

       संत देगुजी टाकळकर यांचा जन्म पुण्याजवळ ४५ किलोमीटरवर असणाऱ्या टाकळवाडी (राजगुरुनगर, ता. खेड, पुणे) या छोट्याशा गावी झाला. वडील देगुजी टाकळकर आणि आई सीता यांच्या शेतकरी कुटुंबात वाढत असताना त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. घरच्या शेतीमुळे तिकडेच त्यांचा विशेष ओढा होता. शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या अगदी जवळून अनुभवल्या असल्याकारणाने शेतकऱ्यांसाठी , समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, ही तळमळ लहानपणापासून होती.

       टाकळकर यांचे प्राथमिक शिक्षण राजगुरुनगर महात्मा गांधी विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते १९६६ मध्ये पुण्यात आले. त्यांनी कृषी महाविद्यालयातून कृषी विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी डेहराडून येथील असोसिएशन ऑफ इंडियन फॉरेस्ट महाविद्यालय येथून पदव्युत्तर पदविका घेतली. १९७८ मध्ये कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९८९ मध्ये लॉस बॅनोस विद्यापीठ, फिलिपाईन्स येथून ‘फॉरेस्ट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट’ या विषयात प्रमाणपत्र मिळविले.

       टाकळकरांनी १९८२ मध्ये आयआयएम, अहमदाबाद येथून शेतकी विषयात प्रकल्प व्यवस्थापन शिक्षण घेतले. तसेच हैदराबाद येथील ‘एनआयआरडी’ येथून त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन (प्रॉजेक्ट प्लॅनिंग) आणि मूल्यांकन या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लोकसेवा आयोगामधून त्यांची प्रथम प्रयत्नात निवड झाली.

        वनसंरक्षक पदावर काम करताना टाकळकर यांनी सुरुवातीची २५ वर्षे नाशिक, चंद्रपूर, ठाणे येथे काढली. १९९० मध्ये त्यांची बदली सोलापूरसारख्या दुष्काळी भागात झाली. या जिल्ह्यात मुळात वनखात्याची जमीन कमी, त्यातून पावसाचे प्रमाणही अत्यल्प. या प्रतिकूल परिस्थितीमुळे टाकळकरांना आव्हान दिसले. त्यांना प्रा.भागवतराव धोंडे यांनी शोधलेल्या ‘कंटूर मार्कर’ या उपकरणाची आठवण झाली. सलग समपातळी चर ऊर्फ ‘कन्टिन्युअस कंटूर ट्रेंच’ या पद्धतीने काम केले तर सोलापुरातल्या उजाड माळरानांचे भवितव्य उजळून निघेल याची त्यांना खात्री वाटली. त्यांनी या तंत्राचा वापर आपल्या कार्यकक्षेतील असंख्य वनजमिनी व डोंगर टेकड्यांवर झाडे लावण्यासाठी केला. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनाही हे तंत्र शिकविले. सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात लक्षावधी हेक्टरमधील वनक्षेत्रांत समपातळी रेषेवर चर खोदून त्यांनी असंख्य झाडे लावली.

      डोंगरमाथ्यापासून उतारापर्यंत माती आणि पाणी अडविण्यासाठी टाकळकरांनी ‘सलग समतल चर’ या तंत्राचा अवलंब केला. डोंगरावर समपातळीचे सलग चर खणले तर वाहणारे पाणी आणि त्याबरोबर येणारी माती थांबते. या चरांमध्ये झाडे वाढू शकतात. हे चर सलग आणि समपातळीतच घेणे आवश्यक असते. या तंत्राचा सुपरिणाम म्हणजे, पाण्याचा थेंब अन् थेंब त्याच क्षेत्रात अडवला गेला. दोन चरांच्या अंतरामध्ये पडणारा पाऊस चरांतच अडून राहू लागला. यामुळे जमिनीची धूप थांबून जास्तीचे पाणी जमिनीत पाझरून खाली जाऊन तलाव, विहिरींमध्ये साठू लागले.

        आपले काम शेतकऱ्यांच्या उपयोगी पडावे, त्यातून त्यांचे कष्ट हलके व्हावेत, अशी टाकळकरांची  तळमळ होती. वनविभागातील त्यांची कारकीर्द नाशिकपासून सुरू झाली. चंद्रपूरच्या जंगलातही त्यांनी काही काळ काम केले. कुठेही असोत, प्रयोगशील टाकळकर आपल्या कल्पकतेचा, बांधीलकीचा, सचोटीचा, कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय देत राहिले.

         १९९२ मध्ये राज्यसरकारने ग्रामस्थांच्या सहभागातून वनविकासाच्या संकल्पनेचा कार्यक्रम पुढे आणला, त्या वेळी टाकळकर हे सोलापूर जिल्ह्यात उप वनसंरक्षक होते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात त्यांनी सलग समतलचरांच्या कामाला सुरुवात केली. बहरून फुललेली रोपे पाहून कर्मचाऱ्यांची उदासीनता पळून गेली. त्यानंतर टाकळकरांची अहमदनगर जिल्ह्यात बदली झाली तिथेही ही मोहीम धडाक्याने सुरू झाली. १९९३ ते १९९६ या काळात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चरांची कामे करण्यात आली. सुमारे २५,००० कि.मी. लांबीचे चर खोदले गेले. कर्जत तालुक्यात आधीच्या वर्षी जनावरांना पिण्यासाठीसुद्धा पाणी नव्हते. तिथे सलग समतल चरांचे काम झाल्यानंतर लगेचच्या वर्षी विहिरीतल्या पाण्याची पातळी वाढली. शेतकरी बागायती भुईमूग घेऊ लागले. टाकळकरांना गावकरी सांगत, गावात पाणी नाही, कितीही खोल खणले तरी पाणी लागत नाही, तेव्हा टाकळकर त्यांना डोंगराकडे बोट दाखवून म्हणत, “तुमचे पाणी तिथे आहे!” या उक्तीचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत होता.

         २००४ पर्यंत टाकळकरांच्या पुढाकार आणि मार्गदर्शनातून धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अनेक भागांत सलग समतल चरांची कामे उभी राहिली. त्याआधी २००३ पर्यंत नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अनेक भागांत सलग समतल चरांच्या साहाय्याने एकशे तीस दशलक्ष घन मीटर एवढे पाणी अडविण्यात वनविभागाला यश आले. हे पाणी बावीस हजार हेक्टर पडीक जमिनीत जिरवल्यावर तिथल्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या म्हसवंडी गावात तर हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. इथल्या मंदिराजवळ बांधलेल्या रस्त्याला लोकांनी टाकळकरांचेच नाव दिले व त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भेजदरी, सुरेगाव, वराड, लासूर, डोळ्यासणे ही गावे हिरवीगार, झाली. छत्तीस हजार कि.मी. हेक्टरवरील चार हजार पाचशे कि.मी. लांबीची शास्त्रोक्त सलग समतल चरांच्या साहाय्याने पंधरा लाख लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. मांगी-तुंगीजवळच्या डोंगराला ‘वसंत हिल्स’ नाव देऊन लोकांनी वसंत टाकळकरांच्या कामाची पावती दिली.

         हिवरे बाजार या गावच्या पोपटराव पवारांना समतल चराची शास्त्रीय माहिती पटवून देणारे वसंतराव प्रसिद्धीपासून मात्र दूरच राहिले. काही आदिवासी गावांमध्ये त्यांना ‘पाण्याचा देव’ म्हणून संबोधत, हीच टाकळकरांच्या दृष्टीने खरी प्रसिद्धी आहे.

          जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यातील वऱ्हाड हे एक हजार चारशे लोकवस्तीचे आदिवासी गाव. २००२ सालच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे इथे लोकांना जगणे नकोसे झाले होते, बारा दिवसांनंतर पाण्याच्या टँकरची पाळी येई. या भागात टाकळकरांनी उन्हाळ्यात वीस हेक्टर भागात जल-मृदा संधारणाचे काम हाती घेतले. पुढच्या वर्षी झालेल्या पावसात इथल्या विहिरी तुडुंब भरलेल्या दिसल्या. हे विधायक चित्र केवळ टाकळकरांमुळे पाहणे शक्य झाले.

          वसंतरावांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सलग समपातळी चर खोदण्यामध्ये काटेकोरपणा आणला. वनखात्याच्या रोपवाटिकेत रोपांसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जात. रोपांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या इतस्तत: पडून राहत. त्या गोळा करून पुनर्नवी करणासाठी द्यायचे कामही त्यांनी जातीने पाहिले. महाराष्ट्रात एक कोटी हेक्टरपेक्षा अधिक जमीन पडीक आहे. त्यावर प्रयोग केला, तर तीन हजार सहाशे कोटी टन पाणी वाचवणे शक्य असल्याचे ते सांगतात. तज्ज्ञांनी टाकळकरांच्या या उपक्रमाला ‘टाकळकर पॅटर्न’ असे सार्थ नावही सुचवले. नद्यांच्या खालच्या भागातून पाणलोट क्षेत्र योजना करणे अशास्त्रीय आहे, पाणी अडवायला डोंगरमाथा ते पायथा असेच गेले पाहिजे, असे टाकळकर मानतात. अचूकतेचा आग्रह आणि प्रशिक्षणाची शिस्त यांचे धडे त्यांनी वनखात्याच्या ‘करड्या शिस्तीत’ त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गिरवून घेतले. या करड्या शिस्तीचा नेमका उपयोग टाकळकरांनी केला. दऱ्याखोऱ्यातील, कानाकोपऱ्यातील त्यांची कामे बोलू लागली आणि प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांवर बातम्या दिल्या, पुस्तके लिहिली गेली. अनेक राज्यांतून प्रशिक्षणासाठी लोक येऊ लागले. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशने तर त्यांच्या या कामाला ‘मिशन’चे स्वरूप दिले. टाकळकरांच्या तंत्राला भारतभर मान्यता मिळाली. २००४मध्ये उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणींबरोबर झालेल्या चर्चेत पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा मानून विकेंद्रित जलव्यवस्थापनाचा आग्रह टाकळकरांनी धरला.

         २००४ मध्ये टाकळकर सेवानिवृत्त झाले असले तरी राज्यभरातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांना जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात ते व्यग्र आहेत. सध्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळात ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आपल्याकडील संचित नव्या पिढीकडे सुपूर्त करत आहेत. वसंतराव टाकळकर यांच्या या कामामुळे त्यांना केंद्र सरकारने २००५ मध्ये ‘इंदिरा प्रियदर्शिनी’ पुरस्कार दिला. पुणे विद्यापीठाच्या समर्थ भारत अभियानाचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे काम सुरू आहे. पुणे शहरातील तीन टेकड्यांवर सलग समतल चर तंत्राच्या साहाय्याने काम सुरू आहे.

        टाकळकर हे अ‍ॅपेक्स कमिटीचे सदस्य आहेत. याच माध्यमातून भारतातील पावसाचे पाणी साठविण्याच्या पुरातन पद्धती, तसेच ग्रामीण भागातील पावसाचे पाणी अडविणे, जिरवणे यांसंबधी ११० पानी तांत्रिक पुस्तिका तयार केली गेली असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होत आहे.

- अनघा फासे

टाकळकर, वसंत देगुजी