तायडे, गुणवंत सखाराम
गुणवंत सखाराम तायडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील भिलटेक या खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९६५मध्ये अकोला येथील कृषी महाविद्यालयात उद्यान अधीक्षक म्हणून काम केले. पुढे वरिष्ठ संशोधन साहाय्यक, अधिव्याख्याता अशा पदांवर बढती मिळाली. त्यानंतर ते प्राध्यापक झाले. त्यांनी १९९३ ते १९९५ या काळात अखिल भारतीय लिंबूवर्गीय संशोधन प्रकल्प, अकोला या योजनेत वरिष्ठ उद्यानविद्यावेत्ता म्हणून त्यांनी कार्य केले. ते १९९५ ते १९९६ या काळात उद्यानविद्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. ते १९९९मध्ये सेवानिवृत्त झाले.
डॉ. तायडे यांनी आंबा व चिकू या फळझाडांची मृदुकाष्ठ कलम पद्धतीने अभिवृद्धी करण्याची पद्धत विकसित करण्यात डॉ. कुलवाल व डॉ. प्र.पुं. देशमुख यांच्यासोबत भरीव योगदान दिले. त्या उत्कृष्ट कार्याबद्दल १९८६-१९८७ मध्ये या तीनही शास्त्रज्ञांना डॉ. के.जी. जोशी पारितोषिक मिळाले. त्यांनी नागपूर संत्रा, किन्नो व लिंबू या पिकांच्या विकासासाठी उपयुक्त खुंट जाती शोधण्याचे संशोधन केले. त्यांचे ४० शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रमासाठी कृषी विषयाचे, ‘विदर्भातील भाजीपाला फळरोप वाटिकेच्या विविध पद्धती’, ‘२५ इयर्स ऑफ सायट्रस’ व ‘रिसर्च इन विदर्भ रीजन’ या नावांची तीन पुस्तके डॉ. देशमुख व डॉ. काळे यांच्या सहकार्याने लिहिली. अकोला येथे डॉ. पं.कृ.वि. उद्यानविद्या प्रक्षेत्र विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच प्रा. पुरी, जोशी व डॉ. देशमुखांसोबत अकोला जिल्ह्यात कागदी लिंबाची लागवड करण्यास डॉ. तायडे यांनी शेतकर्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे अकोला शहर लिंबांचे शहर म्हणून ओळखले जाते.