Skip to main content
x

तर्हाळकर, पद्माकर पुरुषोत्तम

          द्माकर पुरुषोत्तम तर्हाळकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील तर्हाळा या गावी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोला येथील शाळेमध्ये झाले. त्यांनी अकोला येथील कृषी महाविद्यालयातून १९५९ मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली व नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून  १९६१ मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यानंतर नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून १९६४ मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली व ते पुढील शिक्षणासाठी पश्‍चिम जर्मनी येथील म्युनिच या शहरी गेले. तेथे त्यांनी पोस्ट डॉक्टरेट संशोधन केले. त्यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती मिळवूनच झाले व संशोधनाचे कार्य करत असतानाही त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

          तर्हाळकर यांनी १९६८ साली हैदराबाद येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र, राजेंद्रनगर येथे कृषिविद्यावेत्ता म्हणून कामास सुरुवात केली. ते १९७२ ते १९८२ या काळात  हैदराबाद येथील अखिल भारतीय ज्वारी संशोधन केंद्रात कार्यरत होते. ते १९८२ ते १९८७ या कालखंडात ज्वारी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख होते. त्यानंतर १९८७ ते १९९९ या काळात डॉ. तर्‍हाळकर यांची बदली नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात झाली व ते विभागप्रमुख म्हणून १९९९मध्ये सेवानिवृत्त झाले.

          डॉ. तर्हाळकर यांनी हैदराबाद येथे ज्वारी, भुईमूग, तूर, एरंडी व कापूस या पिकांच्या लागवडीची पद्धत, रोपारोपांतील अंतर व आंतरपिके या विषयावर संशोधन केले. त्यांनी ‘कॉटन मोनोग्राफ’ या ग्रंथामध्ये कापूस कृषिविद्या या विषयावर लेखन केले. त्यांनी सेंद्रिय कापूस लागवडीवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात इक्रिसॅट संस्थेत  भाग घेतला होता. 

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

तर्हाळकर, पद्माकर पुरुषोत्तम