Skip to main content
x

तय्यबजी, बद्रुद्दीन

     बद्रुद्दीन तय्यबजी यांचे नाव बव्हंशी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यामुळे लोकांना माहीत आहे. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला हेही माहीत आहे. परंतु भारतात इंग्रजी राजवट स्थिर झाल्यानंतर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले पहिले भारतीय, मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत  वकिली करणारे पहिले भारतीय बॅरिस्टर, उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे पहिले मुस्लिम न्यायाधीश, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलेले पहिले भारतीय न्यायाधीश असे अनेक मान तय्यबजी यांच्याकडे जातात.

      न्यायमूर्ती बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म मुंबईच्या एका सुस्थितीतील सुलेमानी बोहरा कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज सुमारे चारशे वर्षांपूर्वी अरब देशातून येऊन कँबे येथे व्यापार करू लागले आणि नंतर तेथून मुंबईला येऊन स्थायिक झाले.

       बद्रुद्दीन यांचे वडील तय्यब अली भाईमिया यांची इच्छा आपल्या मुलाने आधी इंग्लंडमध्ये सर्वसाधारण शिक्षण घ्यावे आणि नंतर बॅरिस्टर व्हावे, अशी होती. त्यानुसार त्यांनी बद्रुद्दीन यांना १८६०मध्ये इंग्लंडला पाठविले. तेथे बद्रुद्दीन यांनी एका खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथे आधी मॅट्रिकसाठी आणि नंतर पदवीसाठी परीक्षा द्यावयाची होती. मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले, पण नंतरच्या पदवी-परीक्षेच्या जरा आधी त्यांची प्रकृती बिघडली. विशेषत: त्यांच्या डोळ्यांमध्ये जणू अधूपणा आला. त्यामुळे डॉक्टरांच्या आदेशानुसार त्यांना भारतात परत येऊन एक वर्षभर सक्तीची, संपूर्ण विश्रांती घ्यावी लागली. प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा इंग्लंडला गेले आणि १८६७मध्ये मिडल् टेम्पलमधून बॅरिस्टर झाले. वर म्हटल्याप्रमाणे बॅरिस्टर होणारे ते पहिले भारतीय होत.

       मुंबईला परत आल्यावर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेतील सर्व बॅरिस्टर वकील इंग्रज होते. वकिलीत यशस्वी होण्यास तय्यबजींना अजिबात वेळ लागला नाही. सुरुवातीपासूनच, सर्व प्रकारचे खटले यशस्वीपणे चालविणारे निष्णात वकील म्हणून त्यांचे नाव झाले. मुंबईबाहेरचे, विशेषत: काठेवाड भागातले खटले त्यांच्याकडे मोठ्या संख्येने येत असत. ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याआधी गुजरातमधील सचिन या संस्थानाच्या नबाबाच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या विरुद्धच्या एका फौजदारी खटल्यात तय्यबजी यांनी आरोपीतर्फे अत्यंत कौशल्याने युक्तिवाद करून खटला जिंकला होता.

      वकिलीबरोबरच तय्यबजी यांनी मुंबईच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. १८७६मध्ये स्थापन झालेल्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे ते एक संस्थापक सदस्य होते. आपले बंधू कमरुद्दीन तय्यबजी यांच्या बरोबर त्यांनी ‘सरमिया-ए-जमात-ए-सुलेमानी’ ही आणखी एक संस्था स्थापन केली. १८८०मध्ये ते या संस्थेचे सचिव, तर १८८२मध्ये अध्यक्ष झाले. त्याआधी १८७३मध्ये आणि १८७८मध्ये असे दोन वेळा ते मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. १८८२ ते १८८६ पर्यंत ते मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १८८५मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. तय्यबजी पहिल्यापासून काँगे्रसमध्ये सक्रीय होते. दोनच वर्षांत, १८८७मध्ये मद्रास येथे भरलेल्या काँग्रेसच्या तिसर्‍या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी तय्यबजी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. यावरून काँग्रेसमधील त्यांचे स्थानही स्पष्ट होते.

       जून १८९५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून तय्यबजींची नियुक्ती झाली. वर म्हटल्याप्रमाणे ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश आणि अर्थातच पहिले मुस्लिम न्यायाधीश. तोपर्यंतचे सर्व बॅरिस्टर न्यायाधीश इंग्रज होते; तर एक तात्पुरते आणि तीन कायम असे जे चार भारतीय न्यायाधीश तोपर्यंत झाले होते, त्यांच्यापैकी कोणीही बॅरिस्टर नव्हते. दुसरे म्हणजे, १८६२मध्ये उच्च न्यायालय स्थापन झाल्यापासून १८९५पर्यंत एकच भारतीय व्यक्ती न्यायाधीश असावी, असा जणू संकेत किंवा अलिखित नियम बनून गेला होता, तो तय्यबजींच्या नेमणुकीमुळे मोडला.

      मुंबईच्या वकीलवर्गात आणि मुंबईच्या एकंदर सार्वजनिक जीवनात तय्यबजी यांनी जे श्रेष्ठ स्थान मिळविले होते, त्याच्यावर त्यांच्या न्यायाधीशपदाने जणू कळस चढविला. ज्याप्रमाणे अल्पावधीतच ते एक प्रथितयश वकील बनले होते, त्याचप्रमाणे अल्पावधीतच एक उत्तम न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती झाली. वकिलांशी ते अतिशय चांगुलपणाने वागत, परंतु त्याचवेळी ते परखड आणि निर्भीड होते. ते स्पष्टवक्ते आणि तापटही होते, परंतु त्यांच्याकडून आपल्याला यथायोग्य न्याय मिळेल, याबद्दल तरुण, कनिष्ठ वकीलही नि:शंक असत.

      आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत न्या. तय्यबजी यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले. त्यापैकी कसोजी इस्सर विरुद्ध जी.आय.पी.रेल्वेकंपनी (म्हणजे आजची मध्य रेल्वे) या खटल्यातील निकाल हा त्यांचा एक उत्तम निकाल मानला जातो.

       मुंबई शहराचे सार्वजनिक जीवन उंचावण्यात आणि मुंबईला भारतीय राजकारणाचे केंद्र बनविण्यात न्या.तय्यबजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्या.रानडे यांचे समकालीन असलेले न्या.तय्यबजी त्यांच्याप्रमाणेच उदारमतवादी आणि राष्ट्रवादी होते.

        न्या.तय्यबजी यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय न्यायाधीश! ऑगस्ट १९०६मध्ये ते इंग्लंडला गेले असताना, दुसर्‍यांदा अशाच प्रकारे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून सूत्रे घेण्यासाठी ते लंडनहून मुंबईला येण्यास निघण्याच्या तयारीत होते, परंतु हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाले.

- शरच्चंद्र पानसे / डॉ. विजय देव

तय्यबजी, बद्रुद्दीन