वाकडे, महादेव विष्णू
महादेव ऊर्फ बाळासाहेब विष्णू वाकडे उपाख्य स्वामी माधवनाथ यांचे वडील विष्णुपंत व माता राधाबाई हे अत्यंत सश्रद्ध धार्मिक होते. हे कुटुंब कोकणातील ‘कोकबन’ या गावातील होते.
बाळासाहेबांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावात व पुढील शिक्षण मुरुड—जंजिरा, कल्याण येथे झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर ते गावी परतले. पुढील शिक्षणाचा विचार सुरू असताना पितृछत्र हरपले. तेथून कुटुंबाची वणवण सुरू झाली. उदरनिर्वाहासाठी बाळासाहेब पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात येऊन टेलरिंगचा कोर्स करून त्यांनी शिवणकाम करून कुटुंबाची उपजीविका केली. प्रथम ते सोमवार पेठेत राहत होते. पुढे ते भागेश्वरी निवास, सदाशिव पेठ येथे राहण्यास आले. ‘कोकबन’ येथे बाळासाहेबांच्या घरासमोर सरदार तेंडुलकरांचे घर होते. त्यांची कन्या सरोजिनी तेंडुलकर व महादेव यांची लहानपणापासून मैत्री होती. या मैत्रीचे रूपांतर पुढे पती—पत्नीच्या नात्यात झाले. सरोजिनीचे वडील लवकरच निवर्तल्यामुळे आजोबा व काका यांच्या संस्कारात ही कन्या वाढली होती. विवाहानंतर सरोजिनीचे सौ. सरल हे नाव झाले. सरलने बाळासाहेबांना अखेरपर्यंत साथ दिली. या घरातील सर्वांचा परिचय असल्याने त्यांना या घरात जड गेले नाही. या संसारवेलीवर चार अपत्ये झाली.
त्यांनी शिवणकामावर उपजीविका करता करता ‘ब्यूटी क्लॉथ सेंटर’ हे दुकान सदाशिव पेठेत सुरू केले. त्याचाही उत्तम जम बसला. बाळासाहेब कडक शिस्तीचे होते. वेळ पाळण्याचीही त्यांची शिस्त होती. ते व्यवहारही दक्षतेने करीत असत. हे सर्व करताकरता अध्यात्माची आवड असल्याने ती ही साधना सुरू होती. त्यांचे वाचन दांडगे होते. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’प्रमाणे त्यांनी धन मिळवले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि अचूक निर्णयक्षमतेचा होता. बाळासाहेबांनी गृहस्थाश्रम केला; पण प्रपंच हा परमार्थोन्मुख केला. प्रारंभीच्या काळात ते घरातील लोकांना धर्मग्रंथ वाचून दाखवीत असत. त्यांत ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत या धर्मग्रंथांचे ते वाचन करीत असत. त्यातून त्यांनी श्रीज्ञानेश्वरीचा प्रसार केला आणि पुढे श्री स्वामी स्वरूपानंद मंडळ निर्माण करून अध्यात्म-ज्ञानाचा प्रसार केला.
माधवनाथ महाराजांनी रोजच्या प्रवचनसेवेने शुद्ध परमार्थाचे ज्ञान समाजाला दिले. ‘मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे ॥’ या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी समाजाला ज्ञानामृताचा बोध प्रदान केला. या माध्यमातून १९—२० ग्रंथांची निर्मिती झाली आहे. या अक्षरवाङ्मयातून आत्मप्रचितीचा अनुभव घडत आहे.
कर्मकांडाच्या कसरती करण्यापेक्षा भावपूर्ण अंत:करणाने भगवंताला जरी हाक मारली, तरी सेवा भगवद्चरणी रुजू होते, यावर भर देत त्यांनी समाजात साधकांना प्रेरणा दिली. पुढे अनेक संतांच्या भेटी झाल्या; पण मग सन १९६८ साली नाथ संप्रदायाच्या स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रह दिला व प्रथम शिष्य केले. पू. स्वरूपानंदांनी १५ ऑगस्ट १९७४ रोजी देह सोडला. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना ‘स्वामी माधवनाथ’ हे नाव दिले व त्यानंतर नाथ संप्रदायाची सर्व सूत्रे बाळासाहेब म्हणजेच स्वामी माधवनाथांच्या हाती दिली. त्यांनी ती आयुष्यभर सांभाळली.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हे कार्य पुढे सुरु आहे. स्वामी माधवानंद (स्वरूपयोग प्रतिष्ठान) आणि स्वामी मकरंदनाथ (श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ) हे माधवनाथांचे शिष्य त्यांचे कार्य पुढे चालवीत आहेत.
— डॉ. अजित कुलकर्णी /आर्या जोशी