Skip to main content
x

जाधव, तुकाराम वसंतराव

     १९८५मध्ये  श्रीनगर-लेह महामार्गावर ‘जोझी ला’ विभागात एकशे सत्तेचाळिसाव्या कि.मी.जवळ हिम काढण्याच्या कामावर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रतिकूल हवामानात अद्ययावत यंत्रांच्या मदतीने हे काम सुरू होते. २३ मार्चला  जाधव आणि कॅप्टन रस्तोगी हे दोघे  काम करत असताना त्यांच्या यंत्रावर बर्फाचा कडा कोसळला. आणि त्यांच्यासह ते यंत्र काही फूट बर्फाखाली दबले गेले. तेव्हा प्रचंड दमलेले असतानादेखील त्यांनी वेळ न दवडता बर्फामधून आपली सुटका तर करून घेतलीच पण शिवाय ते मौल्यवान आणि महाग यंत्र बाहेर काढण्यासही  सुरुवात केली.  त्यात यशस्वी ठरल्यावर लगेचच  स्वतःची  पर्वा न करता पुन्हा हिम हटवण्याच्या कामालादेखील  सुरुवात केली.

     काही दिवसांनंतर म्हणजे २९ मार्च १९८५ रोजी ११९२ व्या कि.मी.जवळ बावीस तास सलग काम करून जाधव यांनी आपल्या श्मिड्ट यंत्राद्वारे एकोणीस मीटर उंच आणि दोनशे दहा मीटर लांब उतरता असणारा बर्फाचा कडा फोडला. ९ एप्रिल १९८५ रोजी १०९१ व्या कि.मी.जवळ हिम हटविण्याच्या मोहिमेदरम्यान काम करताना त्यांचे काही सहकारी बर्फाखाली दबले गेले होते. त्या  सहकार्‍यांंना  त्यांनी बर्फातून बाहेर काढले आणि बर्फाखाली दबलेले बर्फ हटविण्याचे महाग यंत्रसुद्धा त्यांनी बर्फाच्या ढिगाखालून बाहेर काढले. त्याच वेळी थकवा आणि ताण यांनी ग्रस्त आपल्या सहकार्‍याला खांद्यावर टाकून आपला तळ गाठला. या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले. ३० नोव्हेंबर १९९५ रोजी ते सैन्यामधून निवृत्त झाले.

     - रूपाली गोवंडे

जाधव, तुकाराम वसंतराव