Skip to main content
x

जैन, चंद्रमोहन बाबूलाल

ओशो रजनीश

    भारतीय रहस्यवादी गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेले, आचार्य रजनीश किंवा भगवान रजनीश म्हणजेच ‘ओशो’ यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा गावात आजोळी झाला. त्यांचे मूळ नाव चंद्रमोहन बाबूलाल जैन. वडील बाबूलाल कापडाचे व्यापारी होते. आईचे नाव सरस्वती. लहानपणी, सातव्या वर्षी आजोळी असताना त्यांनी आजोबांचा मृत्यू पाहिला, चुलत बहिणीचा विषमज्वराने झालेला मृत्यू पाहिला. या घटनांनी त्यांच्या बालमनावर ओरखडा पडला आणि ते मृत्यूविषयक चिंतन करू लागले. ते प्रतिदैववादी बनू लागले. संमोहनात त्यांना रस वाटू लागला.

     गदरवारा येथील घरी परतल्यानंतर व तेथील शाळेत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९५५ मध्ये तत्त्वज्ञानात बी.ए. आणि १९५७ साली सागर विद्यापीठातून तत्त्वज्ञानातील एम.ए.केले. रायपूर संस्कृत कॉलेजात त्यांना अध्यापकाची नोकरी मिळाली; परंतु त्यांच्या विचारांनी मुलांवर प्रतिकूल परिणाम होईल म्हणून त्यांची बदली करण्यात आली. पुढे १९५८ पासून ते जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले. विद्यापीठात शिकवतानाच त्यांनी समांतरपणे आपला विचार प्रसाराच्या दौऱ्याची आखणी सुरू केली आणि ‘आचार्य रजनीश’ या नावाने भारतभर, जगभर व्याख्याने देऊ लागले. समाजवादाने केवळ दारिद्य्राचेच समाजीकरण होईल आणि महात्मा गांधी हे दारिद्य्राची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, अशी वादग्रस्त मते ते मांडू लागले. मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे असे ते म्हणत.

     पारंपरिक भारतीय धर्म मृतवत आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अशी जहरी टीका रजनीश ओशो करू लागले. त्यांच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे अनुयायी त्यांना जगभरातून मिळाले. यात सामान्य नागरिकांपासून कलावंत, साहित्यिक, उद्योगपती, राजकारणी असे सर्व थरांतील लोक होेते.

     ‘लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात’ या त्यांच्या निष्कर्षावर समाजमनातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यांना ‘सेक्स गुरू’ असेही म्हटले जाऊ लागले. ‘संभोगातून समाधीकडे’ या व्याख्यानमालेनंतर त्यांना ही उपाधी दिली गेली. त्यांनी १९७० मधील एका ध्यान शिबिरात ‘डायनॅमिक मेडिटेशन’ पद्धत प्रथम सुरू केली. त्याच वर्षी मुंबई सोडून जबलपूरला गेल्यानंतर २६ सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी संन्याशांचा पहिला वर्ग स्थापन केला. ओशोंच्या सचिव म्हणून काम करणाऱ्या धनवान लक्ष्मी ठाकरसी कुरुवा त्यांच्या पहिल्या शिष्या होत. त्यांनी ओशोंना पुन्हा मुंबईत आणून वुडलॅण्ड्स अपार्टमेंटमध्ये निवासस्थान दिले. तिथे त्यांना पाश्चात्त्य अनुयायी मिळाले. तोवर ते आचार्य रजनीश हे नाव सोडून ‘भगवान श्री रजनीश’ म्हणून वावरू लागले.

     मुंबईच्या हवामानामध्ये त्यांना मधुमेह, दमा या व्याधी जडल्या, म्हणून ते आपल्या शिष्या मां योग मुक्ता म्हणजे कॅथरीन बेनिझिलीस यांच्या मदतीने १९७४ मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कातील जागेत राहू लागले. पुढे १९८१ पर्यंत ते तेथे शिकवीत राहिले. पुढे याच जागेवर ‘ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्र’ उभे राहिले. तसेच ध्वनिचित्रण, मुद्रण, कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने बनविण्याचे केंद्र आज त्या जागेत आहे. ‘ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंट’मधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ज्ञ आणि ध्यानाच्या माध्यमातून उपचाराची सेवा देणारे केंद्र तिथे कार्यरत आहे.

     ओशो १९८१ साली अमेरिकेत स्थलांतरित झाले, परंतु तेथेही ते वादग्रस्त ठरले. अमेरिकेतील ओरेगन येथे त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला कम्यून त्यांच्या शिष्यांमध्ये ‘रजनीशपुरम’ म्हणून प्रसिद्ध पावला. या नावाला अधिकृत मान्यता नव्हती. पुढे अल्पावधीतच स्थानिक रहिवाशांशी मतभेद सुरू झाले. ते इतके विकोपाला गेले, की रजनीश यांना अमेरिका सोडावी लागली. त्याचबरोबर, २१ देशांनी त्यांना प्रवेश नाकारला, त्यामुळे ते पुन्हा पुण्यात आले. याच दरम्यान  त्यांना पाठीच्या मणक्यांचाही आजार जडला. १९८७ साली पुण्यात आल्यानंतर त्यांनी आजारपण सांभाळून संध्याकाळची व्याख्याने सुरू केली. त्यांनी १९८८ पासून ‘झेन’ तत्त्वज्ञानावर अभ्यास सुरू केला. याच काळात त्यांनी आपणांस ‘ओशो रजनीश’ हे नाव लावून घेतले.

     जैन, बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती, हसिदी अशा धर्मांवर, परंपरांवर, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवादांवर, तसेच उपनिषद, वेद, गुरुग्रंथसाहिब अशा धार्मिक, आध्यात्मिक विषयांवर रजनीश यांनी  प्रभावी आणि प्रसंगी वादग्रस्त, धाडसी भाष्य केले. ‘‘प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्ध आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो,’’ हे रजनीश यांचे सांगणे होते. आपण धार्मिक शिक्षक नाही, असे ते म्हणत. रजनीश यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या आयुष्यात जगभर हजारो व्याख्याने दिली. लेखन केले. येशूच्या शिकवणीवर ‘द मस्टर्ड सीड’, ‘कम, फॉलो टू यू’; ताओ विचारांवरील ‘द एम्प्टी बोट’, ‘ताओ : द थ्री ट्रेझर्स’; गौतम बुद्धावर ‘द धम्मपद’, ‘द हार्ट सूत्र’, ‘द डायमंड सूूत्र’; झेन विचारांवरील ‘नीदर दिस नॉर दॅट’, ‘नो वॉटर नो मून’, ‘द ग्रस ग्रेज बाय इटसेल्फ’, ‘द सर्च’ इ., तसेच सूफींवरील ‘अन्टिल यू डाय’, ‘जस्ट लाइक दॅट’, ‘उनियो मिस्टिका’; बाऊल फकिरांवरील ‘द बिलव्ह्ड’, संत कबीरावरील ‘द डिव्हाइन मेलडी’, ‘द पाथ ऑफ लव्ह’ इ.; पतंजली योगावरील ‘योगा : दी अल्फा अ‍ॅण्ड दी ओमेगा’, तसेच ध्यानावरील ‘द बुक ऑफ सिके्रट्स’, ‘द रिबेल’, तसेच तंत्रावरील ‘तंत्र : द सुप्रीम अंडरस्टॅण्डिंग’, ‘द तंत्र व्हिजन’ अशा विविध विषयांवरील शेकडो ग्रंथ लिहिले. आपल्या रहस्यवादी विचारसरणीतही त्यांनी ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सर्जनशीलता, तसेच विनोद या विषयांना महत्त्व दिले. हे बंडखोर विचारांचे आध्यात्मिक गुरू पुण्यातील आश्रमातच निधन पावले. तेथेच रजनीश ओशो यांची रक्षा जतन करून ठेवण्यात आली आहे.

संदीप राऊत

जैन, चंद्रमोहन बाबूलाल