जोग, प्रभाकर गणेश
प्रभाकर गणेश जोग यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव बेलापूर इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर व पुण्यात झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. वडिलांच्या अकस्मात निधनानंतर अवघ्या बाराव्या वर्षी अनेक छोटीमोठी कष्टाची कामे करून त्यांनी अर्थार्जन केले आणि नादारीमध्ये शिक्षण पुरे केले. ते गायन-वादनही शिकले. तसेच व्हायोलिनची साथ करून त्यांनी पैसेही मिळवले. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड असल्याने त्यांनी गजाननबुवा जोशी व नारायणराव मारुलकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. थोरले बंधू वामनराव यांच्याकडून त्यांनी व्हायोलिनचे शिक्षण घेतले. गायन-वादनाचे स्वरांकन (नोटेशन) करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती.
त्यांची आकाशवाणी, नागपूर केंद्रावर ‘व्हायोलिन-वादक’ म्हणून नियुक्ती झाली होती. कीर्तनकार नावडीकरांनी जोगांना पुण्यात आश्रय दिला, आर्थिक साहाय्य केले. त्यानंतर जोगांनी मालती पांडे, कालिंदी केसकर, गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकरांच्या गायनाला, तर नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्यांच्या कार्यक्रमांना व्हायोलिनची साथ केली.
एस.पी.महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांची व्हायोलिनवादनाची साथ चालू होती. महाविद्यालयाच्या संमेलनाच्या वेळी जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेल्या सुमधुर गाण्यांना ‘वन्समोअर’ मिळाला. ही गाणी समोरच राहणारे सुधीर फडके यांच्या कानावर पडली. त्यांचे वादन आवडल्याने बाबूजींनी जोग यांना भेटायला बोलावले. जलद व अचूक स्वरांकन लिहिण्याच्या कौशल्यामुळे बाबूजींनी त्यांना साहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले.
आकाशवाणी, पुणे केंद्र निर्मित ग.दि. माडगूळकर व बाबूजींच्या अजरामर ‘गीतरामायणा’च्या निर्मितीत (१९५५-५६) जोग यांचा मोठा सहभाग होता. पुण्यातील जोगांच्या घरातच गायक-वादकांच्या तालमी घेणे, स्वरांकन करणे, व्हायोलिनची साथ करणे अशी कामे रात्रंदिवस चालायची. दर आठवड्याला सकाळी ८-४५ वाजता गाणे प्रत्यक्ष सादर होत असे. ‘चला राघवा चला’ हे गीत विख्यात नट चंद्रकांत गोखले यांनी गायलेले होते. हे गीत जोग यांनी स्वत: स्वतंत्रपणे स्वरबद्ध केलेले होते. एचएमव्ही कंपनीच्या एल.पी. रेकॉडर्समध्येसुद्धा जोग यांनी स्वरांकन करून व्हायोलिनची साथ केलेली आहे.
आकाशवाणी, पुणे केंद्रात, संगीतकाराची ‘बी’ ग्रेड मिळाल्यावर त्यांनी अनेक गीते, संगीतिका स्वरबद्ध केल्या. ‘ब्रह्मकुमारी अहिल्या’ ही त्यांची पहिली संगीतिका होय. त्यांनी मासिक गीतासाठी आपल्या पत्नी नीला यांच्या आवाजात गदिमांचे ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे गीत स्वरबद्ध करून सादर केले. नंतर याच गीताची मालती पांडे बर्वे यांच्या स्वरातली जोगांची पहिली ध्वनिमुद्रिका (१९५६) प्रकाशित होऊन लोकप्रिय झाली.
जोग हे स्वरांकन जलद करून देत असल्याने सुधीर फडक्यांनी राजा परांजपे यांच्या ‘ऊनपाऊस’या चित्रपटापासून सहायक संगीत दिग्दर्शक म्हणून जोग यांची निवड केली. बाबूजींबरोबरच्या अनुभवांची शिदोरी त्यांना यशस्वी संगीतकार बनण्यात उपयोगी पडली. त्यांनी ती जोपासली, वाढवली आणि आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. ‘फडके सुवर्णयुगाचे साक्षीदार’ बनण्याचे भाग्य त्यांना मिळाले. बाबूजींच्या ‘गीतरामायणा’च्या जाहीर कार्यक्रमात १९५८पासून त्यांनी ५००च्यावर प्रयोगांत तबलावादक अण्णा जोशी यांच्यासह जोगांनी व्हायोलिनची साथ केली व लोकांची दाद मिळवली. माहिती घेऊन, अभ्यासून त्यांनी आपल्या संगीतासाठी स्वत:ची नोटेशनची शैली निर्माण केली. कोणत्याही गाण्याचे, चालीचे ते चटकन स्वरांकन करत. त्यामुळे पं. भीमसेन जोशी त्यांना ‘टीपकागद’ असे म्हणत.
अनेक दिग्गज संगीतकारांकडे त्यांनी व्हायोलिन गीतवादक (साँग व्हायोलिनिस्ट) म्हणून काम केले. त्यांनी १९६२ मध्ये मुंबईत येऊन कारकीर्दिला सुरुवात केली. संगीत दिग्दर्शक मदनमोहन, जयदेव, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, उषा खन्ना, रवींद्र जैन यांबरोबरच नवीन पिढीतले अन्नू मलिक, नदिम-श्रवण, राजेश रोशन यांबरोबरही त्यांनी काम केले. ‘व्हायोलिन गीतवादक’ म्हणून त्यांनी ३५ वर्षे सतत काम केले. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मन्ना डे असे दिग्गज गायक, तसेच सुधीर फडके, स्नेहल भाटकर, कल्याणजी-आनंदजी, सज्जाद हुसेन यांच्यासारख्या श्रेष्ठ संगीतकारांसाठी जोगांनी वादन केले.
जोग यांनी २२ चित्रपटांचे स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘दाम करी काम’, ‘सतीचं वाण’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘आंधळा मारतो डोळा’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘कैवारी’ इ. अनेक चित्रपटांत त्यांनी संगीत दिलेले आहे.
जोगांचे मित्र, विख्यात अरेंजर, हार्मोनियम वादक शामराव कांबळे आणि प्रभाकर जोग यांनी ‘बिरबल माय ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन ‘श्याम-प्रभाकर’ या नावाने केले.
त्यांनी ‘स्वर आले दुरुनी’, ‘प्रिया आज माझी’ (सुधीर फडके), ‘कोटी कोटी रूपे तुझी’ (सुरेश वाडकर), ‘वृंदावनात माझ्या’ (माणिक वर्मा) ही भावगीते-भक्तिगीते स्वरबद्ध केली.
‘‘अरे, गाण्याच्या साथीला बसले की स्वर सगळेच वाजवतात; पण तू स्वरांबरोबर व्यंजनही वाजवतोस, आहेस कुठे!’’ अशी दाद रसिकाग्रणी रामूभैया दाते यांच्याकडून मिळवणारे, तसेच ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे गीत व्हायोलिनवर ऐकल्यानंतर, ‘‘माणूस केवळ पराधीन नसतो, तर तो स्वराधीनही असतो याची अनुभूती आज आपण घेतली,’’ असे गौरवोद्गार पु.ल. देशपांडे यांनी प्रभाकर जोग यांच्याबद्दल काढले होते.
जोग यांना ‘चुडा तुझा सावित्रीचा’, ‘चांदणे शिंपीत जा’ आणि ‘कैवारी’ या चित्रपटांतील शास्त्रीय संगीतावर आधारित स्वररचनेबद्दल ‘सूरसिंगार, मुंबई’ या संस्थेचे तीन पुरस्कार ‘सरस्वती’, ‘मियाँ तानसेन’ आणि ‘स्वामी हरिदास संगीत पुरस्कार’, प्राप्त झाले आहेत. तसेच अरुण मेमोरियल फाउण्डेशन, मुंबई यांचा शारदा गौरव पुरस्कार इ. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
अशा या महान व्हायोलीनवादकाचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.