Skip to main content
x

जोगळेकर, आशा अनंत

शा अनंत जोगळेकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नंदिनी नाना जोशी यांचा जन्म त्यांच्या आजोळी, वाईला झाला. त्यांचे आजोबा डॉ. ह.भ.प. दत्तोपंत पटवर्धन राष्ट्रीय कीर्तनकार होते व वडील नाना जोशी सांगली संस्थानात वकील होते. त्यांनी सांगलीला साबणाचा कारखाना काढला होता. आजोबांप्रमाणेच आशा जोगळेकर यांच्या आई सुरेखा जोशी यांना कीर्तन करण्याची आवड होती. गांधीहत्येनंतर जेव्हा साबण कारखाना बंद झाला, तेव्हा याच गुणांच्या जोरावर आईने नाटकांत कामे करण्यास सुरुवात केली.

नंदिनीला लहानपणापासूनच नृत्य, गायन, चित्रकला, अभिनय या सार्‍या कलांमध्ये विशेष रस होता व चार वर्षांची असतानाच तिने कार्यक्रमांना सुरुवात केली. सांगली संस्थानचे राजगवई नानासाहेब गोडबोले यांच्याकडे ती शास्त्रीय संगीत शिकत होती. गणपती उत्सवात, मेळ्यांमध्ये, नाटकांत ती समरसून काम करत असे. सांगली संस्थानाच्या आसपासच्या मिरज, कोल्हापूरसारख्या शहरांत ‘गायन-नृत्य-अभिनयादी कलांमध्ये निपुण बालकलाकार’ म्हणून तिची ख्याती पसरली. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘महाराष्ट्र कर्नाटक नृत्यस्पर्धे’त नंदिनीने पारितोषिक मिळवले. तिच्या नृत्याची कीर्ती ऐकून सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाने तिचा कार्यक्रम आयोजित केला आणि कवी प्रा. गिरीश यांच्या हस्ते नंदिनीचा सत्कारही झाला.

गांधीहत्येच्या वेळी झालेल्या दंग्यांमुळे जोशी कुटुंब पुण्यात आले. नंदिनी जोशी (आशा जोगळेकर) सुगम संगीत, चित्रकला, शिवणापासून ते टंकलेखनापर्यंत सर्व काही शिकल्या. नृत्यात हव्या असलेल्या निर्दोषपणाच्या, अचूकतेच्या ध्यासाचे बीज इथेच दिसून येते.

घरच्या परिस्थितीमुळे अर्थार्जन करणे गरजेचे होते. त्यांचे मामा विख्यात गायक, संगीतकार सुधीर फडके यांनी त्यांना टंकलेखिकेची नोकरी दिली. पु.भा. भावे, गदिमांसारखे दिग्गज पटकथालेखनाच्या चर्चेसाठी बाबूजींकडे येत असत तेव्हा त्यांना वेळोवेळी चित्रपटात काम करण्यासंबंधी विचारत असत. वयाच्या सतराव्या वर्षी आशा जोगळेकरांना पु.ल. देशपांडे यांच्याबरोबर ‘अंमलदार’ नाटकात नायिकेचे काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा पु.लं.नी स्वत: त्यांची गाणी बसवली होती.

चित्रपटांसाठी सतत विचारणा होऊनही ‘चित्रपटात काम करावयाचे नाही’, असा फार महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आणि वयाच्या सतराव्या वर्षी अनंत जोगळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अनंत यांनी त्यांच्या कलासाधनेला पूर्ण पाठिंबा दिला. अनंत जोगळेकरांची सार्वजनिक बांधकाम खात्यामधील नोकरी बदलीची होती. जेव्हा त्यांची चंद्रपूरला बदली झाली, तेव्हा दोन मुलांची आई असलेल्या आशा जोगळेकरांनी पुन्हा नृत्यसाधना सुरू करण्याचे ठरविले.

पुण्याला एक/दोन महिने राहून पं. रोहिणी भाटे यांच्याकडून त्या नृत्याचे शास्त्रशुद्ध धडे गिरवू लागल्या. रोहिणी भाटे उन्हाळ्यात कानपूरला जात, तेव्हा त्यांच्या आज्ञेने जयश्री कीर्तने यांच्याकडे त्या शिकू लागल्या. त्याच वेळी बाळासाहेब गोखले यांचे शिष्य हिरालाल जैन त्यांना आठवड्यातून दोन दिवस घरी येऊन शिकवत असत. त्या नियमाने, निष्ठेने शिकत आणि शिकलेल्या तोड्यांचा चंद्रपूरला जाऊन कसून रियाझ करत. याप्रमाणे सलग सहा वर्षे नृत्यशिक्षण घेतल्यावर १५ ऑगस्ट १९६३ रोजी त्यांनी ‘अर्चना नृत्यालया’ची स्थापना केली. पुढे मुंबईला बदली झाल्यावर ‘अर्चना नृत्यालय’ मुंबईत सुरू झाले.

मुंबईला येताच पं. नटराज गोपीकृष्ण, त्यांच्या पत्नी सावित्रीदेवी, पं. लच्छू महाराजांच्या पत्नी श्रीमती रमादेवी यांच्याकडे त्यांनी नृत्यसाधना सुरू केली. आशा जोगळेकर लय, ताल, अंगसंचालन, भावप्रदर्शन  मनापासून शिकत आणि अतिशय प्रभावीपणे सादर करत. गुरू गोपीकृष्णांबरोबर त्यांनी कार्यक्रमही केले. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी अशा तर्‍हेने त्यांचे खरे नृत्यशिक्षण चालू झाले. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्या ‘नृत्यविशारद’ झाल्या. दिग्गजांचे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थिनींनाही लाभावे म्हणून त्यांनी पं. तीरथराम आजाद, पं. रोहिणी भाटे, पं. बिरजू महाराज यांची शिबिरे वेळोवेळी आयोजित केली. पं. रोहिणी भाटे यांची तंत्रशुद्धता व पं. बिरजू महाराजांचे लास्य त्या वेचत राहिल्या आणि आपली शैली अधिकाधिक परिपूर्ण व्हावी म्हणून त्या प्रयत्नशील राहिल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाच्या ‘संभवामि युगे युगे’ या नृत्यनाट्यातील त्यांची द्रौपदीची भूमिका नावाजली गेली. गोवा हिंदू असोसिएशनच्या हिंदी आणि मराठी ‘शाकुंतल’मधील नटी आणि अप्सरेचे कामही रसिकांना भावले. त्यांनी याचे ७०-७५ प्रयोग केले. त्यांनी १९८४ मध्ये ‘अर्चना नृत्यालया’तर्फे ‘ऋतुरागदर्शन’ हा कार्यक्रम बसवला. त्याचे अनेक प्रयोग झाले.

त्यांच्या आजवरच्या सुमारे तीन हजार शिष्यांपैकी १५० जणांनी नृत्याला व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या शिष्यपरंपरेत अभिनेत्री, कन्या अर्चना जोगळेकर, स्मृती तळपदे, मंजिरी देव, रंजना फडके, उर्मिला कानेटकर अशा  सर्वजणी आणि मयूर वैद्य नृत्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.

आशा जोगळेकर मुंबईच्या ‘नर्तक मिलन’ या संस्थेच्या दहा वर्षे कार्यवाह होत्या. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पारितोषिक निवड समितीवर नृत्य परीक्षक म्हणून त्या काम करतात. ‘सूरसिंगार’, मुंबईच्या ‘कल के कलाकार’ संमेलनाच्या परीक्षक मंडळावर त्या पंधरा वर्षाहून अधिक काळ काम पाहिले. त्यांना १९७८ पासून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळावर परीक्षक म्हणून आमंत्रित केले जात असे . अर्चना नृत्यालयाच्या शिष्यवर्गाचे भारतात सर्वत्र, तसेच जर्मनी, आइसलँड, अमेरिकेतही अनेक कार्यक्रम झाले आहेत.

‘लास्य अकादमी’तर्फे सत्कार (२००३), ‘गणेश कल्चरल अकादमी’तर्फे ‘कृतार्थ कलाजीवन’ पुरस्कार (२००४), ‘सूरसिंगार संसदे’तर्फे ‘शारंगदेव’ फेलोशिप (२००८), पं. बिरजू महाराजांच्या ‘कलाश्रम’, मुंबईतर्फे सत्कार (२०१०), ‘सेवाभारती’, मुंबईतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार (२०१०), ‘श्रीमती हिराबाई झवेरी आणि श्रीमती श्यामला माजगावकर स्मृती’ पुरस्कार (२०११) असे विविध सत्कार, सन्मान आशा जोगळेकर यांना लाभले आहेत.

          — सुषमा जोशी

जोगळेकर, आशा अनंत